पोलिस अधिकाऱ्याने जीवाची पर्वा न करता एका सराईत गुन्हेगार महिलेला पळून जाताना पकडल्याची थरारक घटना दादर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या गुन्हेगार महिलेने पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याच्या प्रयत्नात थेट रेल्वे रुळावर उडी घेतली, त्याच वेळी कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल येत असल्याचे बघून दादर रेल्वे पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुळावर उडी घेऊन या महिला आरोपीला रुळावरून बाजूला करून तिला ताब्यात घेतले. ही थरारक घटना फलाट क्रमांक ४ वरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
रिटाला शुक्रवारी नेरुळ येथून ताब्यात घेतलेले!
रिटा संतोष कुमार सिंह (३८) असे या गुन्हेगार महिलेचे नाव आहे. रिटा ही सराईत खंडणीखोर गुन्हेगार संतोष कुमार सिंह उर्फ बबलू ठाकूर याची पत्नी आहे. संतोष कुमार सिंह याच्यावर दादर रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणी, जबरी चोरी सारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्याला २७ मे रोजी दादर रेल्वे पोलिस ठाण्याचे सपोनि.अर्जुन घनवट यांनी आपल्या पथकासह पाठलाग करून मुलुंड टोलनाका या ठिकाणी अटक केली होती. संतोष कुमारच्या अटकेनंतर त्याच्या गुन्ह्यात त्याची पत्नी रिटा हीचा देखील तेवढाच सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर दादर रेल्वे पोलिसांच्या पथकाने रिटाला शुक्रवारी नेरुळ येथून ताब्यात घेऊन दादर रेल्वे पोलिस ठाण्यात आणण्यात येत होते.
(हेही वाचा : संभाजी राजेंना पंतप्रधानांची भेट महत्वाची! संजय राऊतांचे वक्तव्य )
…आणि प्राण वाचले!
दादरच्या फलाट क्रमांक ४ वर असलेल्या दादर रेल्वे पोलिस ठाण्याच्या काही मीटर अंतरावरच रिटाने कल्याणच्या दिशेने जाणारी फास्ट ट्रेन येत असल्याचे बघून पळून उडी मारून पळून जाण्याच्या प्रयत्नात रेल्वे रुळावर उडी टाकली, मात्र तिचा पाय रुळात अडकून ती रुळावर आडवी पडली, तिला उठता येत नसल्यामुळे ती मृत्यूला आपल्यासमोर येत असल्याचे बघत असतानाच दादर रेल्वे पोलिस ठाण्याचे सपोनि.अर्जुन घनवट यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुळावर उडी टाकली आणि रिटाला रेल्वे रुळापासून बाजूला आणले. हा प्रसंग बघणाऱ्या मोटरमन यांनी पोलिस अधिकारी याला बघून इमर्जन्सी ब्रेक दाबून ट्रेन जाग्यावर थांबवली. ट्रेनची गती कमी असल्यामुळे ट्रेन जाग्यावर थांबल्यामुळे पोलिस अधिकारी आणि सराईत गुन्हेगार महिला रिटा हिचे प्राण वाचले. हा सर्व थरार फलाट क्रमांक चार वर असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सपोनि.अर्जुन घनवट या पोलिस अधिकारी यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धाडस दाखवून एका महिला आरोपीचे प्राण वाचवल्यामुळे पोलिस दलाकडून तसेच सर्व स्तरातून त्याचे कौतुक करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community