Veer Savarkar : घरातून पाठिंबा मिळत असल्याने माझे हिंदुत्व अजुनही टिकून; विद्याधर नारगोळकर यांनी व्यक्त केली कृतज्ञता
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer Savarkar) १४१ व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराचे वितरण दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर सभागृहात रविवार, २६ मे रोजी करण्यात आले.
स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्राप्त झाल्याने हा पुरस्कार मला ज्यांच्या संस्कारामुळे मिळाला आहे, त्या माझ्या वडिलांना हा पुरस्कार समर्पित करतो, अशी भावना सावरकर विचार प्रचारकचे विद्याधर नारगोळकर यांनी व्यक्त केली. सावकरांचे विचार पुढे नेत असतानाच जे पहिले पुस्तक प्रकाशित केले, त्यासाठी पत्नीने स्वतःचे दागिने विकून पैसे दिल्याचे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता. मला घरातून पाठिंबा मिळत असल्याने माझे हिंदुत्व अजुनही टिकून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer Savarkar) १४१व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराचे वितरण दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर सभागृहात रविवार, २६ मे रोजी करण्यात आले होते. यावेळी बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरचे प्रमुख ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्यासह आयआयटी इंदूरचे डॉ. सुहास जोशी आणि ‘स्वातंत्र्यवीर’ चित्रपटाचे निर्माते, लेखक, अभिनेते रणदीप हुड्डा पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित होते. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्कार- २०२४’ सावरकर विचार प्रचारक संस्थेचे विद्याधर नारगोळकर यांना प्रदान करण्यात आला. बिहार राज्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना नारगोळकर यांनी मी हा पुरस्कार माझ्या वडिलांना समर्पित करतो, अशी भावना व्यक्त केली. माझे वडील सावरकरप्रेमी होते. आमच्या घरामध्ये सावरकरवाद आणि सावरकर यांच्या कार्याबाबत कायमच चर्चा होत असे आणि त्यांच्यामुळे आमच्या घराण्यावर, माझ्यावर असे संस्कार झाले. त्यामुळे हा पुरस्कार मी त्यांनाच समर्पित करतो, असे नारगोळकर म्हणाले.
पुण्यामध्ये मी असताना पुष्कळ लोकांचे हिंदुत्व मला मिळाले, श्री. पु .गोखले यांच्यामुळे मला निवडणुकीमध्ये पु. भा. भावेंची निवडणूक कशी लढवायची आणि त्यासाठी काय करायचे, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. एवढेच नाही, त्यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न केला होता तो कसा उधळायचा, तो हाणून पाडायचा हे सुध्दा मी श्री. पुं. यांच्याकडून शिकलो, अशा पुष्कळ गोष्टी आहेत, असेही नारगोळकर म्हणाले. मुंबईमध्ये खानविलकर, पंडित बखले, घारपुरे, माधवराव पाठक, बाळाराव सावरकर यांच्यामुळेही मी हिंदुत्व शिकलो. पंडित बखल्यांकडे त्या काळात टेपरेकॉर्डर होता, तो त्यांनी मला दिला होता. सावरकरांची (Veer Savarkar) त्यावेळी भाषणे होती ती मी टेपरेकॉर्डर डोक्यावर घेऊन फिरलो. महाराष्ट्र हिंडुन काढला, असेही ते म्हणाले. पंडित बखल्यांनी मला दोन वेळेला अखिल भारतीय हिंदु परिषदेसाठी दिल्लीला नेले होते. तिथे झालेली ही परिषद संपूर्ण भारतातील पहिली परिषद होती, तिथे राधाकृष्णन पण आले होते, याचीही आठवण त्यांनी जागवली.
पुण्यामध्ये दाते, नलावडे, गोखले, जावडेकर यांच्यासोबत मला काम मिळाले. त्यांच्याकडून मला संस्कार मिळाले आणि शेवटी म्हणजे विक्रमराव सावरकर यांच्याबरोबरच माझ्यावर बरेच हिंदुत्वाचे संस्कार झालेत. सिध्दीविनायक मंदिर जे आज दिसते तिथे ट्रस्टी अंतुले होते, त्यांच्या पत्नीच्या भावाला ट्रस्टी केले होते. त्यांच्या विरोधात विक्रमरावांनी निदर्शने केली होती, त्यात मीही होतो. त्यामुळे त्यांना तो निर्णय मागे घ्यावा लागला होता. त्यामुळे श्री सिध्दीविनायक मंदिर ट्रस्टीच्या अध्यक्षपदाचा अधिकार रणजित सावरकर यांचा आहे, असेही त्यांनी सांगितले. पाचगणीला एक ख्रिश्चन शाळा होती, ती अजुनही आहे. त्यांच्यासाठी विश्वासराव आणि माझ्या वडिलांनी कित्येक वेळा निदर्शने केली. बऱ्याच लोकांनी केली. आमच्या वडिलांनी वय वर्षे ७२ त्यांना रात्री उठवून पंचावरच न्यायचे. पाचगणीच्या घाटावरच त्यांना सोडायचे आणि ते चालत घरी यायचे, त्यावेळी काळे म्हणून जे गृहस्थ होते ते तिकीटाचे पैसे द्यायचे आणि ते मग घरी आणायचे अशा परिस्थितीतून आम्ही आलो आणि माझ्यावर हिंदुत्वाचे संस्कार यामुळेच असल्याचेही अनुभव कथन त्यांनी केले.
सावकरांवर (Veer Savarkar) मी जे पहिले पुस्तक प्रकाशित केले होते, तेव्हा माझ्या बायकोने आपले दागिने विकून पैसे आणून दिले. त्यानंतर मी पुस्तक काढले आहे. पुण्यात हजारो लोकांचा मोर्चा काढला होता, त्यात आमचे नायक मिलिंद एकबोटे यांना अटक केल्यानंतर मलाही अटक केली. अटकेनंतर मी जेव्हा घरातून निघालो तेव्हा बायको म्हणाली, ‘अप्पा, परत आला नाहीत तरी चालेल, पण हज हाऊस पुण्यात होता कामा नये’. हा मला घरातून पाठिंबा होता. म्हणून माझे हिंदुत्व अजुनही आहे, असे सांगत नारगोळकर यांनी काव्याच्या चार ओळींनी आपल्या भाषणाचा शेवट केला, ते म्हणाले,
जरी काढले हे डोळे, तरी वाट हिंदु राष्ट्राची दिसेल जरी कापली ही जिव्हा मंत्र हिंदुत्वच वदेल