Veer Savarkar : अंदमान हिंदुत्वाची कार्यशाळा

Veer Savarkar निश्चितच पूर्वीपासूनच हिंदुत्ववादी होते. पण अंदमानमध्ये (Andaman) त्यांच्या हिंदुत्व तत्वज्ञानाला मूर्त स्वरुप प्राप्त झाले असे म्हणावे लागेल.

204
Veer Savarkar : अंदमान हिंदुत्वाची कार्यशाळा
Veer Savarkar : अंदमान हिंदुत्वाची कार्यशाळा
जयेश शत्रुघ्न मेस्त्री

‘दहनस्थळी माझ्या मृत्यूनंतर जर माझ्या नावाची शिला लावणार असाल आणि तिच्यावर काही शब्द कोरणार असाल तर त्या शिलेवर ’स्वातंत्र्यवीर सावरकर’ यापेक्षा ’हिंदुसंघटक सावरकर’ असे शब्द कोरले गेल्यास ते मला अधिक आवडेल. कारण स्वातंत्र्यार्थ मी जे जे प्रयत्न केले ते ते हिंदुसंघटनेसाठी होते, समर्थ, संपन्न हिंदु राष्ट्रासाठीच होते, हिंदुस्थानासाठी होते.’ हे सावरकरांचं वाक्य त्यांच्या हिंदुत्वनिष्ठ विचारांची ग्वाही देतं. (Veer Savarkar)

सावरकर निश्चितच पूर्वीपासूनच हिंदुत्ववादी होते. पण अंदमानमध्ये (Andaman) त्यांच्या हिंदुत्व तत्वज्ञानाला मूर्त स्वरुप प्राप्त झाले असे म्हणावे लागेल. पुढे रचलेला हिंदुत्व हा ग्रंथ आणि राजकीय व सामाजिक पातळीवर उचलून धरलेला हिंदुत्वाचा झेंडा, याचं मूळ अंदमानात आहे. या अर्थाने अंदमान ही हिंदुत्वाची कार्यशाळा म्हणावी लागेल. अंदमानमध्ये सावरकरांनी शुद्धिकार्य ही महत्त्वाची चळवळ चालवली. पूर्वी अंदमानात हिंदू बंदिवान दबून राहत. मुस्लिमांची मक्तेदारी चालत असे. सावरकरांनी ही परिस्थिती बदलली. मुसलमान कैद्यांना कुराण बाळगण्यास अनुमती होती, मात्र हिंदुंना धार्मिक पुस्तके ठेवणे चोरी होती. कुणी रामायण वाचू लागले तर मुसलमान वॉर्डर व मिर्झा खान त्याला मारत असे. पण सावरकरांनी वरपर्यंत तक्रार केल्यामुळे हिंदू बंदिवानाला पुस्तक ठेवण्यास मोकळीक मिळाली.

(हेही वाचा – Veer Savarkar : ‘सावरकर पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढली’ – डॉ. सुहास जोशी)

कोणताही हिंदू परधर्मात जाऊ द्यायचा नाही हे सावरकरांनी निश्चित केलं. सावरकरांचं म्हणणं होतं की, चोर असला तरी हिंदू चोर हा मुसलमान चोराहून हिंदू संस्कृतीस कमी हानिकारक आहे. सावरकर जेव्हा अंदमानात आले, तेव्हा त्यांनी पाहिले की, साधारण दर १५ दिवसांनी एखादा बंदिवान हिंदु पंगत सोडून मुसलमानी पंगतीत जाऊन बसायचा. यामुळे सावरकर अस्वस्थ झाले. मुस्लीम जमादार, वॉर्डर वगैरे हिंदुंना बळजबरीने मुसलमान करीत. मुस्लीम वॉर्डर हिंदुंना कठीण काम देत, कठोर दंड देत. त्यांच्यावर खोटे खटले घालत आणि जर यातून मुक्तता हवी असेल तर मुसलमान व्हायला सांगितले जात असे. या छळाला कंटाळून हिंदू मुसलमान होत. सावरकरांनी हिंदू बंदीवानांना त्याविषयी समजावून सांगितले. मात्र हिंदुंची वृत्ती ’मला काय त्याचे?’ अशीच होती. शुद्धिकरणाला स्वकीय आणि परकीय देखील विरोध करायचे. परकीय म्हणायचे की अशा ‘नीच माणसांना हिंदू धर्मात घेऊन काय करणार?’ सावरकर त्यास उत्तर द्यायचे की, ‘अशा नीच माणसांना तुम्ही तरी का बाटवता? तुम्हाला ते चालतात, मग आम्हाला का चालू नयेत?’

सावरकर हिंदू कैद्यांना आवर्जून सांगत, ‘तुला चोरी, व्यसन सुटत नसेल तरी हिंदुत्व सोडू नकोस.’ त्यांनी बंदिवानांच्या मनावर बिंबवले की परधर्मात जाणे हे महापाप असते. त्याविषयीच्या दुष्परिणामांबद्दल त्यांना शिक्षित केले. सावरकरांनी हिंदूला बाटवणाऱ्या मुसलमानावर खटला भरला. म्हणून मुसलमान त्यांना त्रास देऊ लागले, त्यांच्यावर शारीरिक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. तुरुंगात दंगली झाल्या. पण सावरकर मागे हटले नाहीत. हळूहळू या चळवळीला जोर आला आणि इतर बंदिवान देखील भाग घेऊ लागले. परिणामस्वरूप सावरकरांनी धर्मांतरण बंद पाडले.

(हेही वाचा – Veer Savarkar : ‘भारताची सागरी सुरक्षा, आव्हाने, चिंता आणि पुढील वाटचाल’ हे पुस्तक म्हणजे वीर सावरकर यांना आदरांजली – बिग्रेडीयर हेमंत महाजन)

मिर्झा खानशी देखील सावरकरांना झुंज द्यावी लागली. मिर्झा खानने एका ब्राह्मण मुलाचा छळ करुन त्याला बाटवले. सावरकरांनी तक्रारी करुन हा प्रकार थांबवला. त्या बाटलेला ब्राह्मणाला हिंदू पंक्तीत घेईनात तेव्हा सावरकरांनी हिंदुंची मने वळवली. मारामाऱ्या करु शकणाऱ्या हिंदू बंदिवानांना सावरकरांनी हाताशी धरले होते. अशा एका बंदिवानाकरवी दोन मुलांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यात आले. आधी स्नान घातले, तुळस खायला दिली. गीता व रामायणातील श्लोक म्हणून हा शुद्धिकरण समारंभ पार पाडला गेला. ‘मुसलमान तुमच्या फुटाण्यांना शिवले तर ते फुटाणे जर मुसलमान होत असतील तर तुम्ही मुसलमानांच्या फुटाण्याला शिवल्याने ते फुटाणे हिंदू होतात का?’ असा प्रश्न भोळ्या हिंदूंना सावरकर विचारत. पुढे सावरकर म्हणत, ‘आपले फुटाणे त्यांच्या स्पर्शाने बाटत नाहीत तर आपल्या स्पर्शाने त्यांचे फुटाणे हिंदू होतात. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचे पाप मी माझ्या डोक्यावर घेतो. मात्र तुम्ही उपाशी मरु नका.’

मुसलमान हिंदूंना त्रास देण्यासाठी पहाटे बांग देत. मग सावरकरांच्या आज्ञेने शंख आणला गेला व हिंदू शंख फुंकू लागले. मुसलमानांनी विरोध करताच सावरकर म्हणाले, ‘शंखनाद हे आमच्या धार्मिक पूजेचे अंग आहे. तुम्ही बांग बंद करा, आम्ही शंखनाद बंद करतो.’ मुसलमानांना कसे हाताळायचे हे गांधींना कधीच कळले नाही. मात्र सावरकरांना चांगलेच ठाऊक होते. अंदमानमध्ये सावरकर जाण्यापूर्वी तिथे पठाणी राज्य होते. मात्र पठाणी राज्य नष्ट करुन सावरकरांनी तिथे टिचभर का होईना, पण हिंदू राज्य निर्माण केले. अंदमान ही हिंदुत्वाची कार्यशाळा होती. पुढे सावरकरांनी अखंड हिंदुस्थान हिंदूमय करुन टाकला. नरेंद्र मोदींना आज जे यश मिळत आहे. त्याची ठिणगी सावरकरांनी पेटवली होती. (Veer Savarkar)

(लेखक वीर सावरकर अभ्यासक आहेत.)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.