Veer Savarkar: हिंदुस्थान हिंदुत्वनिष्ठांचे राष्ट्र!

197
Veer Savarkar: हिंदुस्थान हिंदुत्वनिष्ठांचे राष्ट्र!

डॉ. गिरीश पिंपळे

स्वातंत्र्यवीर सावरकरांची (Veer Savarkar) दृष्टी अतिशय व्यापक होती. त्यामुळे त्यांनी हिंदुराष्ट्राचा विचार करताना सर्वप्रथम अखिल मानवजातीचा विचार केला आहे. ‘जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हासही वाटते. पण आपण परिस्थितीनुसार व्यवहार केला पाहिजे.’ असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. आपल्या हिंदुत्व या ग्रंथात त्यांनी हिंदू शब्दाची सर्वसमावेशक अशी व्याख्या केली आहे. त्यामुळे रूढ अर्थाने ज्यांना हिंदू समजले जाते त्यांच्या शिवाय शीख, बौद्ध, जैन, लिंगायत असे सगळे समाज हिंदुराष्ट्राचे घटक आहेत असे ते मानत होते. या सर्व घटकांनी आपसात उत्तम संबंध जोपासावेत असे सावरकर सांगत असत. ‘हिंदुस्थानात हिंदूंचे पूर्वज राहिले आणि वाढले. त्यांची सर्व पवित्र स्थाने याच पुण्यभूमीत आहेत. त्यांना जिवंत राहायला आणि मरायलाही या देशाबाहेर दुसरी जागा नाही. म्हणून हिंदुस्थान हे हिंदुत्वनिष्ठांचे राष्ट्र आहे.’ इतक्या स्पष्ट शब्दांत त्यांनी आपले विचार लोकांसमोर ठेवले आहेत. (Veer Savarkar)

(हेही वाचा – ४ जूनला भाजपा आणि एनडीएचा विजय निश्चित; Amit Shah यांचा विश्वास)  

दुसऱ्या एका ठिकाणी सावरकर म्हणतात- ‘वैदिक काळापासून निदान पाच हजार वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या एकात्म असा गट घडवून आणीत होते. त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता पावता जे फळ आले ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज सबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू आणि पुण्यभू मानीत असलेले असे हिंदुराष्ट्र होय. हिंदुराष्ट्र हे काही पावसाळ्यातील कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही. तो निव्वळ कागदी खेळ नाही किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडविलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते याच भूमीतून वर आलेले आहे नि या भूमीतच त्याची मुळे खोल आणि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा अथवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरिता म्हणून काही तरी शोध लावलेला नाही, तर आपली उत्तर सीमा सांभाळणाऱ्या हिमालयाप्रमाणे ते एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे.’

भविष्यकालीन हिंदुराष्ट्र कसे असावे याचे सावरकरांनी रंगविलेले चित्र मोठे आकर्षक आहे. उज्जयनीला त्यांनी या राष्ट्राची राजधानी कल्पिलेली आहे. ‘नवे’ म्हणजे आधुनिक भाऊसाहेब पेशवे, विक्रमादित्य प्रचंड सैन्य घेऊन शत्रूवर चालून जात आहेत आणि पूर्वी झालेल्या पराभवाचा वचपा काढत आहेत. कुणी लंडनवर धडक मारली आहे तर कुणी पॅरीस गाठले आहे. त्यामुळे सर्व जगात हिंदुराष्ट्राचा दरारा निर्माण झाला आहे. भारतीय विमानांचे थवेच्या थवे आकाशात उंच उंच उडत आहेत आणि आपल्या प्रचंड नौका पूर्व आणि पश्चिम समुद्रात खडा पहारा देत आहेत अशी कल्पना त्यांनी केली आहे. ज्ञान, कला, वाणिज्य, विज्ञान, वैद्यक अशा विविध क्षेत्रांत हजारो हिंदू व्यक्तींनी जागतिक उच्चांक गाठावेत अशी त्यांची तीव्र इच्छा होती. या सगळ्या लेखाच्या शेवटी सावरकर म्हणतात- ‘अरे, मनोराज्येच करायची तर अशी काहीतरी करा.’ १ ऑगस्ट १९३९ या दिवशी सावरकरांचे पुण्यात मंत्रमुग्ध करणारे एक भाषण झाले. त्याचा समारोप करताना त्यांनी काढलेले उद्गार हृदय हेलावून टाकणारे होते– ‘वटवृक्षाचे बीज मोहरीहूनही लहान असते. पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो. मलाही एक वल्गना करू द्या! माझे गाणे गाऊ द्या! या जगात आपल्याला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढच्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल.’

(हेही वाचा – Pune Car Accident: धंगेकरांनी उघड केली हफ्त्याची टक्केवारी)

हे भाषण १९३९ सालचे आहे. पुढे अनेक घडामोडी घडल्या. देशाची फाळणी झाली. त्यांच्या कल्पनेतील हिंदुराष्ट्र जसेच्या तसे अस्तित्वात आले नाही पण एका हिंदूबहुल राष्ट्राची निर्मिती झाली. त्यांनी त्या परिस्थितीचा स्वीकार केला. पुढच्या काळात त्यांनी आपला देश सैनिकी दृष्टीने बलवान व्हावा यासाठी सातत्याने आग्रह धरला. आपला देश इतका मोठा आहे की त्यासाठी एक कोटीचे खडे सैन्य असले पाहिजे अशी सूचना केली. १९५३ साली केलेल्या एका भाषणात त्यांनी भारताने अण्वस्त्रे निर्माण करावीत असे जोरदार प्रतिपादन केले. दुसऱ्या एका प्रसंगी बोलताना त्यांनी ‘वेळप्रसंगी अशोकचक्राने सुदर्शनचक्राची भूमिका पार पाडावी’ अशी अत्यंत मार्मिक सूचना केली. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी आपल्या संसाराची राखरांगोळी केली, प्रसंगी रक्त सांडले, प्राणाचे बलिदान दिले याची त्यांना धगधगती जाणीव होती. त्यामुळे अशा या अनमोल स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आपल्या देशाने बलवान असले पाहिजे अशी त्यांची तळमळ होती. (Veer Savarkar)

(लेखक सावरकर विचारांचे अभ्यासक आहेत)

 

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.