IPS Officer च्या निवासस्थानावर ईडीचे छापे; १५० कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त

6077

अंमलबजावणी संचालनालयाने २६३ कोटी रुपयांच्या ‘इन्कम टॅक्स रिटर्न’ घोटाळ्या प्रकरणी राज्यातील एका आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या (IPS Officer) कुलाबा येथील शासकीय निवासस्थानी घेतलेल्या झडती दरम्यान ईडीच्या हाती १५० कोटीं रुपयांच्या किमतीच्या मालमत्तेची कागदपत्रे लागली, ईडीकडून ही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. या आयपीएस अधिकाऱ्याचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांना गेल्या आठवड्यात ईडीने २६३ कोटींच्या इन्कम टॅक्स घोटाळा प्रकरणी अटक केली होती. झडती दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या कागदपत्रात वरळीतील दोन मोठ्या फ्लॅटसह मुंबई आणि ठाण्यातील सुमारे चौदा फ्लॅटची कागदपत्रे सापडली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सापडलेल्या मालमत्तेची एकूण किंमत सुमारे १५० कोटी रुपये आहे. मालमत्तेचे दस्तऐवज अनेक व्यक्तींच्या नावावर नोंदवलेले आहेत, या व्यक्तींच्या नावावर ही बेनामी मालमत्ता असू शकते, असा संशय ईडीला आहे. २६३ कोटी रुपयांच्या इन्कम टॅक्स रिटर्न घोटाळा प्रकरणी चव्हाण यांना २० मे रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली होती. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचे (IPS Officer) पती चव्हाण यांनी आरोपींपैकी एक राजेश बत्रा याला कर प्रकरणात सवलत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि त्याच्याकडून १२ कोटी रुपये घेतले होते.

(हेही वाचा Mumbai Hill Area : मुंबईतील दरडींची ४६ ठिकाणे अतिधोकादायक, रहिवाशी तात्पुरत्या पर्यायी पक्क्या घरांमध्ये जाणार का?)

यापूर्वी या प्रकरणात तानाजी मंडल अधिकारी, भूषण पाटील, न्यायालयीन कोठडीत असलेले राजेश शेट्टी आणि ईडीच्या कोठडीत असलेले राजेश ब्रिजलाल बत्रा या चार आरोपींना अटक करण्यात आली होती. अंमलबजावणी संचालनालयाने तानाजी मंडल अधिकारी आणि इतरांविरुद्ध टीडीएस रिफंड घोटाळा सीबीआय, दिल्ली यांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत नोंदवलेल्या गुन्हयाच्या आधारे तपास सुरू केला. राजेश ब्रिजलाल बत्रा आणि पुरुषोत्तम चव्हाण हे नियमित संपर्कात होते आणि हवाला व्यवहार आणि बेकायदेशीरपणे मिळवलेले पैसे (गुन्ह्याची रक्कम) वळविण्यासाठी संबंधित माहिती एकमेकांशी शेअर करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
मालमत्तेच्या कागदपत्रांशिवाय ईडीने परकीय चलन आणि मोबाईल फोनही जप्त केले आहेत. पुरुषोत्तम चव्हाण याने पुरावे नष्ट करून तपासात अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले.

चव्हाण यांना २० मे रोजी अटक करून मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले असता, त्यांनी २७ मेपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची कोठडी दिली. यापूर्वी या प्रकरणात, आतापर्यंत १६८ कोटी रुपयांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची ओळख पटवून त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या पुरुषोत्तम चव्हाण यांची सोमवारी ईडी कोठडी संपली असता त्याला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने चव्हाण याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.