पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील अपघाताची घटना ताजी असतानाच अजून एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. खराडी बायपास परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत २ तरुणांचा जागीच मृत्यू झाला, एकजण गंभीर जखमी झाला. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना सोमवारी, (२७ मे) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास खराडीतील जकात नाका चौकात घडली. आदिल शेख असे एका तरुणाचे नाव असून इतर दोघांचे नाव समजू शकलेले नाही.
(हेही वाचा – Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी, प्रवाशांनी खिडकीतूनच उड्या मारल्याचा VIDEO व्हायरल)
याप्रकरणी पोलिसांनी श्यामबाबू रामफळ गौतम या ट्रकचालकाला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवक मूळचे लातूरचे असून ते सध्या वाघोली येथे शिक्षण घेत होते. सोमवारी रात्री तिघेही दुचाकीवरून खराडी बायपास परिसरातील जकात नाका येथे सिग्नलवर थांबले होते. त्याचवेळी मालवाहतूक ट्रक वाघोलीतून पुण्याच्या दिशेने येत होता. दरम्यान, ट्रकचालक गौतम याने सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की दुचाकीस्वार काही मीटरपर्यंत फरफरटत गेले. या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमी तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं. सध्या एका तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून वैद्यकीय तपासणीसाठी ससून हॉस्पिटल रुग्णालयात नेण्यात आलं. घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community