स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या दाव्यात विश्रामबाग पोलिसांनी तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यामध्ये राहुल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले आहे. (Veer Savarkar)
राहुल गांधी यांच्यावर पुणे पोलिसांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याचा आरोप करणारी तक्रार खरी असल्याचे म्हटले आहे. सावरकरांचे नातू सात्यकी यांनी एप्रिल २०२३ मध्ये राहुल गांधी यांच्याविरुद्ध आयपीसी कलम ४९९ आणि ५००अंतर्गत मानहानीचा खटला दाखल केला होता.
पुढची कारवाई ३० मे रोजी होणार…
याविषयी वीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला माहिती देताना सांगितले की, कलम २०२ अंतर्गत न्यायालयाने पोलिसांना पुरावे तपासणीचे आदेश दिले होते. त्याअंतर्गत सोमवारी, (२७ मे) पोलिसांनी त्यांचा अहवाल सादर केला आणि त्या तपासणी अहवालात त्यांनी असे नमूद केले आहे की, वीर सावरकरांची बदनामी राहुल गांधी यांनी केल्याचे आढळून आले आहे. न्यायालयासमोर हा अहवाल सादर करण्यात आला आणि आता न्यायालयाने पुढची कारवाई ३० मे रोजी करायचे ठरवले आहे. गेले वर्षभर आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत. सर्व सावरकरप्रेमींना यश मिळेल, अशी निश्चिती आता झालेली आहे.
राहुल गांधींचे आरोप काल्पनिक, खोटे आणि द्वेषपूर्ण
पुढे ते म्हणाले की, राहुल गांधींनी मार्च २०२३ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेले विधान चुकीचे आहे. आपल्या वक्तव्यात राहुल गांधी म्हणाले होते की, वीर सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, त्यांनी आणि त्यांच्या ५-६ मित्रांनी एकदा एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली होती आणि सावरकरांना आनंद झाला होता. याप्रकरणी सात्यकी यांनी एप्रिल २०२३ मध्ये पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात राहुल गांधींविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
सात्यकी सावरकर यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले होते की, अशी कोणतीही घटना आजवर घडली नव्हती आणि वीर सावरकर यांनी असे कुठेही लिहिले नव्हते. सात्यकी यांनी राहुल गांधींचे आरोप काल्पनिक, खोटे आणि द्वेषपूर्ण असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि २७ मे २०२४ रोजी त्यांचा तपास अहवाल न्यायालयात सादर केला.
कोणत्याही पुस्तकात अशा घटनेबद्दल लिहिलेले नाही
पोलिसांनी सांगितले की, आमच्या तपासात असे दिसून आले आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या कोणत्याही पुस्तकात अशा घटनेबद्दल लिहिलेले नाही; परंतु असे असतानाही राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणादरम्यान अशी टिप्पणी केली. पोलीस तपास अहवाल न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) अक्षी जैन यांच्या न्यायालयात सादर केल्याचे सात्यकी यांच्या वकिलाने सांगितले.
नेमका वाद काय ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मार्च २०२३ मध्ये लंडनमध्ये दिलेल्या मुलाखतीदरम्यान वीर सावरकरांवर भाष्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर न्यायालयाने विश्रामबाग पोलिसांना सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या पुराव्याची पडताळणी करून २७ मे २०२४ पर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. सादर केलेल्या अहवालानुसार आता न्यायालयाने पुढची कारवाई करायचे ठरवले आहे.
हेही पहा –