मेक इन इंडियानंतर आता मेक फॉर वर्ल्ड’चा नारा

238

संपूर्ण देशात आज ७४ वा स्वातंत्र्यदिवस साजरा करण्यात आला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी आपल्याला आत्मनिर्भय व्हायचे आहे. त्याचवेळी आता ‘मेक इन इंडिया’च्या बरोबरीने आता ‘मेक फॉर वर्ल्ड’साठी उत्पादने बनवायची आहेत असे सांगत मेक फॉर वर्ल्डचा नारा त्यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले मोदी

देशात मोठया प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्यात वाढ करण्याची आवश्यकता आहे. कच्चा माल कधीपर्यंत जगामध्ये पाठवत राहणार ? त्यासाठी आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये योगदान द्यायचे आहे. एक काळ होता आपल्या देशात ज्या वस्तुंची निर्मिती व्हायची, त्याचे जगभरात कौतुक व्हायचे. आत्मनिर्भर म्हणजे फक्त आयात कमी करणे नव्हे, तर भारतात बनवलेल्या सामानाचे सर्वत्र कौतुक झाले पाहिजे.

‘वोकल फॉर लोकल’ जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. भारतात मोठया प्रमाणावर होणाऱ्या सुधारणा जग पाहत आहे. त्यामुळेच भारतात होणाऱ्या एफडीआय  गुंतवणूकीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. कोरोना संकटकाळातही भारतात मोठया प्रमाणावर एफडीआय  गुंतवणूक झाली आहे. आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे. कृषिक्षेत्रात भारत आत्मनिर्भर आहे. फक्त देशाचीच नव्हे तर अन्य देशांना सुद्धा कृषीमालाचा पुरवठा करु शकतो. विकास यात्रेत मागे राहिलेल्या देशातील ११० जिल्ह्यांना पुढे नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यांना बंधनातून मुक्त केले. माझ्या देशातील शेतकरी उत्पादन केल्यानंतर त्याल हवे तिथे तो विकू शकत नव्हता. आम्ही त्याला बंधनातून मुक्त केले. आता तो त्याला हव तिथे, त्याच्या अटीनुसार पिकवलेला कृषीमाल विकू शकतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे ते आत्मनिर्भर होतील.  आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे. आत्मनिर्भर होणे अनिवार्य आहे. जे कुटुंबासाठी आवश्यक आहे, ते देशासाठी आवश्यक आहे. भारत आत्मनिर्भर बनून दाखवेल. मला देशाच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. भारताने ठरवलं तर करुन दाखवतो. जगाला भारताकडून अपेक्षा आहेत, असे मोदी म्हणाले.

कोरोनाची लढाई जिंकायची

कोरोनाची लढाई आपणाला जिंकायची आहे. कोरोनाने सगळयांना रोखून धरले आहे. कोरोनाच्या कालखंडात कोरोना योद्धयांनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो. १३० कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने कोरोनावर विजय मिळवू शकतो, आत्मविश्वास त्यांनी देशावासियांना दिला. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करण्याचा आजचा दिवस आहे. सतत देशवासियांच्या सुरक्षेमध्ये असणाऱ्या लष्कर, निमलष्करी दल आणि पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. देशाचा आज ७४वा स्वातंत्र्यदिवस आहे. सलग सात वर्ष पंतप्रधान नरेंद्र लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करत आहेत. यावेळी देशाला संबोधित करताना त्यांनी आत्मनिर्भर भारतावर अधिक जोर दिला. आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, १३० कोटी देशवासियांसाठी मंत्र बनला आहे, असं म्हणत त्यांनी आत्मनिर्भर भारत बनवण्याकडे कल असल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे देशातील नागरिकांचं मनोबळ देखील वाढवलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 कोरोनाची लस कधी तयार होणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. देशाचे वैज्ञानिक प्रयोगशाळेत अखंडपणे तपस्या करत आहेत, संशोधन करत आहेत. भारतात एक नाही, दोन नाही तर तीन तीन लस तयार होत आहेत. त्यांची चाचणी होत आहे. त्यांना वैज्ञानिकांकडून परवानगी मिळाल्यानंतर तातडीने मोठ्या प्रमाणात उत्पन्न केलं जाईल. तसेच ही लस तयार झाल्यावर देशभरात वितरित करण्याचं प्लॅनिंग देखील तयार आहे.

देशाच्या आरोग्य क्षेत्रात आजपासून नॅशनल डिजीटल हेल्थ मिशनची सुरुवात आहे. ही भारतात मोठी क्रांती करेल. उपचारात खर्च कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल. यासाठी भारतातील प्रत्येकाला एक आरोग्य कार्ड देण्यात येईल. त्यात त्या नागरिकाच्या आरोग्याची सर्व माहिती त्या कार्डात असेल. या मिशनमुळे नागरिकांना मोठी मदत होणार आहे. त्यांना उपचार घेणं सोप होणार आहे.

मागील 5 वर्षात दीड लाख ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिकल फायबर पोहचलं आहे. उरलेल्या 1 लाख ग्रामपंचायतींनाही लवकरात लवकर ही व्यवस्था दिली जाईल. सर्व 6 लाखांपेक्षा अधिक गावांमध्ये ऑप्टिकल फायबरची सुविधा पोहचवली जाईल. हजारो किलोमीटरपर्यंत हे काम होईल. 1000 दिवसांमध्ये हे काम पूर्ण करु.

सायबरच्या क्षेत्रात अनेक धोकेही आहेत. त्यामुळे देशाच्या विकासावर, सामाजिक वातावरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या धोक्यांचा विचार करुन भारत सतर्कतेने नव्या व्यवस्था विकसित करत आहे. नवी सायबर सुरक्षा धोरण तयार केलं जात आहे. येणाऱ्या काळात या सायबर सुरक्षेत सर्वजण सोबत पुढे जाऊ.

देशाला इतका मोठा समुद्र किनारा आहे, 1300 बेटं आहे. निवडक बेटांच्या विकासावरही भर दिला जात आहे. अंदमान निकोबारला ऑप्टिकल फायबरने जोडलं जात आहे. लक्षद्विपला देखील अशाचप्रकारे इंटरनेटला जोडलं जाईल. चेन्नईत जसं वेगवान इंटरनेट आहे तसंच या बेटांवरही असेल.

173 जिल्हे असे आहेत जे इतर देशांच्या सीमेवर आहेत किंवा समुद्र किनारपट्ट्यावर आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये NCC ला प्रोत्साहन दिलं जाईल. त्यात एक तृतीयांश मुली असतील. त्यांना सैन्याचे वेगवेगळे विभाग प्रशिक्षित करतील. त्यांना सैन्यात भरती होण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळतील.

आगामी काळात भारतात ‘नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन प्रकल्प राबवला जाईल. याची भारताच्या भविष्यातील वाटचालीत महत्त्वाची भूमिका असेल. त्यासाठी 110 लाख कोटीपेक्षा अधिक खर्च केला जाईल.

देशाच्या विविध क्षेत्रात जवळपास 7 हजार प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या पायाभूत सुविधांना मोठी मदत होईल. या संकटाच्या काळात पायाभूत सुविधांवर काम केल्याने सर्वच घटकांना फायदा होणार आहे.

मुलींच्या लग्नाचं वय किती असावं याबाबत विशेष समिती तयार करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर तात्काळ त्यांच्या वयाबाबतही निर्णय घेतला जाईल.

भारत त्या निवडक देशांपैकी आहे जेथे जंगल वाढत आहे. भारताने प्रोजेक्ट टायगर, इलेफंट राबवले. येणाऱ्या काळात एशिअर लायनचा प्रकल्प राबवला जाईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.