अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ता म्हणून अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे आणि नदीवर घाट बांधले किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला. महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ (Veraval) येथील सोमनाथाचे गझनीच्या महंमदाने उद्ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात, असे प्रतिपादन मनोज कुवर यांनी केले.
(हेही वाचा – Marriage Dress For Men: पुरुषांनी लग्नात काय घालावं? प्रश्नात पडलात? तर ‘हे’ नक्की वाचा)
भगूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या कार्यक्रमात जेष्ठ नागरिक संघांचे दादासाहेब देशमुख यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीस सुनील जोरे, मनोज कुवर यांनी पुष्पहार अर्पण केला. त्या वेळी ते बोलत होते.
कल्याणकारी शासक अहिल्यादेवी
मनोज कुवर (Manoj Kuvar) म्हणाले की, अहिल्यादेवींना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती. अहिल्यादेवींस सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे; परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला. अहिल्यादेवींनी जनतेच्या, रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्यादेवींच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्यादेवींनी दत्तक विधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला.
अहिल्यादेवींचे कलाप्रेम
महेश्वर येथील अहिल्यादेवींची (Ahilyabai Holkar) राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंत फंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्यादेवींनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीसुद्धा सुरू केली. वयाच्या ७० व्या वर्षी अहिल्याबाई होळकरांची प्राणज्योत निमाली. अहिल्यादेवी एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात, तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संतांचा दर्जा दिला, असे मनोज कुवर या वेळी म्हणाले.
या वेळी उपस्थित समूहाचे प्रशांत लोया, दीपक गायकवाड, प्रविण वाघ, निलेश हासे, संदेश बुरके, तसेच जेष्ठ नागरिक संघांचे सभासद उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community