State Monsoon Session : मंत्रिमंडळ विस्तार, पंतप्रधान शपथविधीमुळे राज्याचे पावसाळी अधिवेशन लांबणीवर!

152
State Monsoon Session : मंत्रिमंडळ विस्तार, पंतप्रधान शपथविधीमुळे राज्याचे पावसाळी अधिवेशन लांबणीवर!
  • सुजित महामुलकर

राज्यातील पावसाळी विधिमंडळ अधिवेशन १० जूनपासून सुरू करण्याचे नियोजन असले तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रात मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येईल आणि नरेंद्र मोदी यांचा शपथविधी १० जूनला होण्याची शक्यता आहे. तसेच जूनमध्ये ४ विधान परिषद जागांसाठी निवडणूक होत आहे. दरम्यान शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल याची शक्यता आहे. मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आमदारांना किमान एका तरी अधिवेशनात मंत्री म्हणून बसण्याची संधी मिळावी, अशा विविध कारणांनी राज्याचे पावसाळी अधिवेशन महिनाभर पुढे ढकलण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (State Monsoon Session)

लोकसभा निकाल एनडीएच्या बाजूने?

देशात शनिवारी १ जूनला शेवटच्या टप्प्यातील मतदान झाले आणि ४ जूनच्या निकालाची देशवासियांना प्रतीक्षा लागली आहे. ४ जूनचा निकाल भाजपा आणि एनडीएच्या बाजूने लागेल असे देशभरात वातावरण असल्याने भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या शपथविधीचा कार्यक्रम नियोजित करण्यात आल्याचे समजते. हा शपथविधी १० जूनला होण्याची शक्यता असल्याने राज्यातून प्रमुख नेते शपथविधीसाठी दिल्लीला जाणार असण्याची शक्यता लक्षात घेऊन अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. (State Monsoon Session)

(हेही वाचा – Water cut : रेस कोर्स मधील जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती, गुरुवार आणि शुक्रवार ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद)

विधान परिषद निवडणूक

राज्यात दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदार संघाच्या, अशा ४ विधान परिषद जागांसाठी, २६ जूनला निवडणूक होणार आहे. सध्या उमेदवार निश्चिती तसेच पुढील प्रक्रियांना वेग येणार असल्याने प्रमुख राजकीय नेते त्यात व्यस्त असतील. (State Monsoon Session)

मंत्रिमंडळ विस्तार

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार गेल्या वर्षभरापासून रखडला असल्याने पावसाळी अधिवेशनापूर्वी हा विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मंत्रिमंडळात १४ जागा रिक्त असून त्यातील किमान १२ जागा भरल्या जातील त्याचप्रमाणे काही मंत्र्यांचे खातेबदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही इच्छुक आमदारांना किमान एका अधिवेशनात तरी मंत्री म्हणून बसण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. (State Monsoon Session)

शेवटचे अधिवेशन?

राज्याच्या विधानसभेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असून त्याआधी ऑक्टोबर २०२४ मध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे जुलैमधील अधिवेशन हे कदाचित या विधानसभेचे अखेरचे अधिवेशन ठरू शकेल, अशी शक्यता असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात काही इच्छुक आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळेल, असे सांगण्यात आले. (State Monsoon Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.