गृहरक्षक दलाचे पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. परमबीर सिंग यांच्यावर मुंबई आणि अकोला येथील दोन पोलिस अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर क्रिकेट बुकी आणि बांधकाम व्यवसायिक यांच्यासह कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांनी देखील परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे.
छाब्रियांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
दिलीप छाब्रिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरुन सीआययुचे तत्कालीन प्रभारी सचिन वाझे याने खंडणी मागितली, असा आरोप छाब्रिया यांच्या मार्फत त्यांच्या कंपनीचे कायदेविषयक काम बघणाऱ्या कंपनीने केला आहे.
(हेही वाचाः दिलीप छाब्रियांचा ४० कोटींचा घोटाळा )
वाझेने केली होती अटक
डीसी अवंती कार प्रकरणी कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांना जानेवारी २०२१ मध्ये सीआययुचे तत्कालीन प्रभारी सचिन वाझे याने अटक केली होती. आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली होती, असा आरोप छाब्रिया यांनी केला होता.
काय आहे आरोप?
दिलीप छाब्रिया यांच्या कंपनीचे कायदेविषयिक काम पहाणाऱ्या एका कंपनीने छाब्रिया यांच्या वतीने मुख्यमंत्री, राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, गृहमंत्री, पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्त यांच्याकडे परमबीर सिंग यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला आहे. या अर्जात त्यांनी परमबीर सिंग यांच्या इशाऱ्यावरुन माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करुन, सीआययुचे तत्कालीन प्रभारी सचिन वाझे याने आपल्याकडे खंडणी स्वरुपात मोठी रक्कम मागितली होती, असा आरोप तक्रार अर्जात करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community