कोरोनात जनता घरात, राजकारणी मात्र मोकाट! आमदार लांडगेंचा धिंगाणा! 

मोदी सरकाराला ७ वर्षे पूर्ण झाली, म्हणून त्याच्या निषेधार्थ काँग्रेसने राज्यभर निदर्शने करून गर्दी जमवून कोरोना नियमांची ऐशी तैशी केली, तर दुसरीकडे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी मुलीच्या लग्नाच्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात गर्दी करून विनामास्क नाचून धिंगाणा घातला.

116

सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली, मात्र तरीही अजून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉक डाऊन १५ दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधीही लॉकडाऊन असतानाही राज्यकर्ते मात्र बिनधास्तपणे गर्दी करत आहेत, ३० मे रोजी मोदी सरकाराला ७ वर्षे पूर्ण होत आहेत म्हणून त्याच्या निषेधार्थ काँग्रेसने राज्यभर निदर्शने करून गर्दी जमवून कोरोना नियमांची ऐशी तैशी केली, तर दुसरीकडे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी मुलीच्या लग्नाच्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात गर्दी करून विनामास्क नाचून धिंगाणा घातला. त्यामुळे कोरोनात जनता घरात, राजकारणी मात्र मोकाट असे म्हणायची वेळ आली आहे.

काँग्रेसने जमवली गर्दी! 

राज्यभर आजही कडक लॉकडाऊन लागू आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कुणालाही बाहेर कारणाशिवाय फिरायला परवानगी नाही. तसेच राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तरीही सध्या फक्त राजकीय कार्यक्रम बिनधास्तपणे होत असल्याचे दिसून येत आहे. मोदी सरकारला ३० मे  रोजी ७ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने काँग्रेसने राज्यभर निदर्शने केली. त्यासाठी ठिकठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी जमवली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आवाहन केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

(हेही वाचा : आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मोर्च्यात व्यस्त! फडणवीसांचा आरोप)

आमदार लांडगे यांनी लग्न कार्यात जमवली गर्दी!

लग्न समारंभात आणि इतर सोहळ्यात २५ नागरिकांनाच उपस्थित राहण्याचे आदेश असताना भाजपचा आमदार महेश लांडगे स्वतःच्या मुलीच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात नियमाचे तीन तेरा वाजवले. पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे  बेफाम नाचतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांची कन्या साक्षी लांडगे यांच्या विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित कार्यक्रमात लांडगेंनी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत नृत्य केले. सोबतच माजी महापौर आणि अन्य राजकीय नेते देखील उपस्थित होते, मात्र यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यामुळे टीका होत आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगे यांचे येत्या 6 जून रोजी लग्न आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नातील मांडव टहाळ कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण करत आमदार लांडगे बेफाम होऊन नृत्य करताना दिसले. समर्थकांच्या खांद्यावर बसून लांडगेंनी नृत्याचा आनंद लुटला. याबाबत पोलिस प्रशासनाला कोणतीही माहिती अद्याप मिळाली नाही. त्यामुळे आता व्हिडिओ पसरल्यानंतर तरी पोलिस प्रशासन अशा बेबाबदार नेत्यांवर  कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आमदार लांडगेंसह ६० जणांवर गुन्हे!

आमदार महेश लांडगे यांच्यासह एकूण ६० जणांवर भोसरी पोलिस ठाण्यात कोरोना नियमांची पायमल्ली केल्याने १८८, २६९ व महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७(१) (३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.