विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबईत रेल्वेच्यावतीने गारेगार प्रवासासाठी वातानुकुलित लोकल सेवा (AC Local) सुरु करण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात याचे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांऐवजी फुकट्या प्रवाशांमुळे आधी प्रवाशी त्रस्त झाले आहे. या फुकट्या प्रवाशांना रोखण्यात तिकीट तपासनीस अपयशी ठरत असतानाच आता दुसऱ्या बाजुला बाल फेरीवाले आणि भिकाऱ्यांच्या वाढत्या प्रस्थामुळे प्रवाशी अजुनही बेहाल झाले आहेत. त्यामुळे एसी लोकल नक्की कुणासाठी? अधिकृत पास तिकीट धारकांसाठी की फुकट्या प्रवाशांसह बाल फेरीवाले आणि भिकाऱ्यांसाठी का असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.
मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या सेवेत डिसेंबर २०१७ पासून वातानुकूलित लोकल दाखल झाल्या असून पश्चिम रेल्वे सोबतच आता मध्य रेल्वेतही या लोकल आता दाखल होऊ लागल्या आहेत. आतापर्यंत पश्चिम रेल्वेमध्ये सुमारे ९६ लोकलच्या फेऱ्या होत आहेत. तर मध्य रेल्वेत लोकलच्या फेऱ्या ६६ एवढ्या झाल्या आहेत. टप्प्या टप्प्याने मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या (AC Local) फेऱ्यांची संख्या वाढवली जात असली तरी या लोकलमधील प्रवाशांची नियमित कडक तपासणीही टीसी यांच्याकडून होत नाही. परिणामी टीसींच्या नियमित तपासणीच्या अभावी फुकटे आणि फर्स्ट क्लास तसेच जनरल तिकीटधारक बिनधास्तपणे एसी लोकलमधून प्रवास करत आहेत. त्यामुळे एसी लोकल (AC Local) आता गर्दीने भरुन धावू लागल्या आहेत.
(हेही वाचा – पतीला भ्रष्टाचार करण्यापासून न रोखणे पत्नीचा दोष; High Court ने सुनावली १ वर्षांची शिक्षा)
चर्चगेट, दादरहून सुटणाऱ्या संध्याकाळ आणि रात्री वेळेत आणि विरार आणि बोरीवलीमधून सकाळच्या वेळेत सुटणाऱ्या एसी लोकलमध्ये अधिकृत तिकीट आणि पासधारकांच्या तुलनेत फुकट्या प्रवाशांचीच अधिक घुसखोरी होत असून या गर्दीच्यावेळी तिकीट तपासनीसही लोकमध्ये येत नसल्याने फुकट्या प्रवाशांचे चांगले फावत आहे. फुकट्या प्रवाशांमुळे अधिकृत तिकीटधारकांचे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या वाढत्या गर्दीमुळे एसी लोकलचे (AC Local) तिकीट तथा पासधारकांना उभ्याने तथा गर्दीत चिरडत प्रवास करावा लागत आहे. पासधारकांना एसी लोकलमध्ये (AC Local) फुकट्या प्रवाशांमुळे गर्दीचा सामना करावा लागत आहे,
तिथे दुसरीकडे बाल फेरीवाले आणि भिकाऱ्यांच्या त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. एसी लोकलमध्ये भिकारी आणि फेरीवाल्यांना प्रवेश बंदी असतानाही बालकांचा वापर करत फेरीवाल्यांकडून आपला व्यावसाय करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वस्तूंच्या विक्रीसाठी छोट्या बालकांचा वापर केला जात असतानाही रेल्वे पोलिस तथा आरपीएफ यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. बाल फेरीवाल्यांवर पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात जात नसल्याने याचा फायदा घेत इतरही फेरीवालेही आता एसी लोकलमध्ये बिनधास्तपण व्यवसाय करताना दिसत आहेत. त्यामुळे या एसी लोकल (AC Local) नक्की कुणासाठी असा प्रश्न उपस्थित होवू लागला असून जनरल तिकीट आणि फर्स्ट क्लासच्या तुलनेत अनेक पटीने जास्त पैसे मोजूनही रेल्वेकडून प्रवाशांना चांगल्याप्रकारची सुविधा मिळत नसल्याने एकप्रकारचा संतापच प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे.
(हेही वाचा – Dadar Railway Station : दादरचे फलाट छताविना, चटके खाणाऱ्या प्रवाशांवर आता पावसाळात भिजण्याची वेळ)
एसी लोकलच्या (AC Local) प्रवाशांच्या म्हणण्यानुसार दादरच्या फलाट क्रमांक ५ वरून ९ वाजून १९ मिनिटांनी विरार एसी लोकल सुटते. परंतु पूर्वी या लोकलमध्ये वांद्रे आणि अंधेरीतील प्रवाशांना बसता येईल अशाप्रकारे ही लोकल रिकामी असायची. परंतु आता ही लोकल दादरमध्येच भरली जाते आणि त्यामुळे वांद्रे आणि अंधेरीतील प्रवाशांना केवळ गर्दीत उभे राहण्याची वेळ येते. विशेष म्हणजे याच फलाटावर तिकीट तपासनीस यांचे कार्यालय असून याच ठिकाणांहून लोकल भरत असतानाच टीसींना आतमध्ये शिरुन फुकट्यांवर दंडात्मक कारवाई करून तसेच पोलिसांच्या माध्यमातून फेरीवाले व भिकारी यांना अटकाव करण्याची हिंमत दाखवली जात नाही,याबाबत प्रवाशांकडून संताप व्यक्त होताना दिसत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community