-
सचिन धानजी
रेसकोर्स येथे प्रत्येकी १ हजार ४५० व्यासाच्या तानसा (पूर्व) व तानसा (पश्चिम) या प्रमुख जलवाहिन्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येत असून या दोन्ही जलवाहिनी सध्या पाणी गळती होत असल्याने बंद ठेवण्यात आल्या आहेत. जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिनी टाकणे कठीण असल्याने १४५० मिमी व्यासाच्या तानसा पूर्व आणि तानसा पश्चिम जलवाहिन्यांचे पुनर्वसन आणि मजबुतीकरण खड्डे विरहित तंत्रज्ञानाद्वारे करण्यात येत असून ज्यामध्ये जलवाहिन्यांचे आतून संरचनात्मक अस्तर अर्थात स्ट्रक्चरल लायनिंग करण्यात येणार आहे. ज्यामध्ये जलवाहिनीचे आयुष्य आणखी ४० वर्षांनी वाढणार आहे. (Tansa Water Pipeline)
मुंबईच्या पाणीपुरवठ्याच्या जाळ्यात अनेक जुन्या जलवाहिन्या आहेत. अतिशय जुन्या असल्याने गंजामुळे या जलवाहिन्या दिवसेंदिवस खराब होत आहेत. त्यामुळे या जलवाहिन्यांची वारंवार गळती होते व यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असतो. तसेच यामुळे मौल्यवान पाणी भरपूर प्रमाणात वाया जात असते. या गळत्या वारंवार होत असल्याने आपण एका ठिकाणी दुरुस्त केल्यावर दुसऱ्या कमकुवत ठिकाणी गळती निर्माण होत असते. अश्या प्रकारच्या वारंवार होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते व दुरूस्ती आणि देखभाल खर्चही वाढतो. काही ठिकाणी यामुळे नागरिकांना दूषित पाणी जाण्याची शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठी या जुन्या जलवाहिन्या बदलण्याची गरज असते. (Tansa Water Pipeline)
(हेही वाचा – AC Local : एसी लोकल नक्की कुणासाठी? फुकट्या प्रवाशांसह फेरीवाले, भिकाऱ्यांचा वावर वाढता वाढता वाढे)
काही प्रकरणांमध्ये नवीन पाईप लाईन टाकून जलवाहिन्या बदलणे नितांत आवश्यक असले, तरी वाहनांचा अरुंद रस्ता, वाहतुकीचा ताण, बांधकामे किंवा अतिक्रमण किंवा उच्च दाबाच्या विद्युत केबल, महानगर गॅस लाइन, दूरध्वनी केबल किंवा इतर दळणवळणाच्या केबल आदी भूमिगत सुविधांमुळे ते करता येत नाही अशा ठिकाणी दुरुस्तीवर होणारा खर्च व वाया जाणारे मनुष्यबळ टाळण्याकरिता आणि गळतीमुळे प्रचंड प्रमाणावर वाया जाणारे अमूल्य पाणी वाचविण्याकरिता जुन्या जलवाहिन्यांचे पुनर्वसन आणि मजबुतीकरण करणे आवश्यक बनले आहे. (Tansa Water Pipeline)
माहीम जल बोगद्यामधून निघणाऱ्या या १४५० मिमी व्यासाच्या तानसा पूर्व आणि तानसा पश्चिम जलवाहिन्या या रेसकोर्स जल बोगद्यामध्ये येऊन सध्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. या जल वाहिन्या पुढे डी विभागातील नाना चौकपर्यंत जातात. पण या दोन्ही जल वाहिन्या रेसकोर्सच्या परिसरामध्ये गळती असल्याकारणाने बंद करून ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सध्या डी विभागाचा पाणीपुरवठा रेसकोर्स जल बोगद्यामधून निघणा-या १६५० मिमी व्यासाच्या दुस-या जलवाहिनीमधून तात्पुरत्या स्वरूपात चालू ठेवला आहे. सदर १६५० मिमी व्यासाची जलवाहिनी रेसकोर्स परिसराबाहेर, १४५० मिमी व्यासाच्या तानसा पूर्व आणि तानसा पश्चिम यांना जोडण्यात आलेली आहे व त्याद्वारे डी विभागाचा पाणीपुरवठा केला जातो. सदर जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिनी टाकणे कठीण असल्याने १४५० मिमी व्यासाच्या तानसा पूर्व आणि तानसा पश्चिम जलवाहिन्यांचे पुनर्वसन आणि मजबुतीकरण खड्डे विरहित तंत्रज्ञानाद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Tansa Water Pipeline)
(हेही वाचा – Dadar Railway Station : दादरचे फलाट छताविना, चटके खाणाऱ्या प्रवाशांवर आता पावसाळात भिजण्याची वेळ)
या जल वाहिन्यांचे पुनर्वसन आणि मजबुतीकरण करण्याचे खड्डे विरहित तंत्रज्ञान उपलब्ध आहे. ज्यात जलवाहिन्यांचे आतून संरचनात्मक अस्तर अर्थात स्ट्रक्चरल लायनिंग करण्यात येते. त्यामुळे या जलवाहिनी गंजण्याची शक्यता कमी असते आणि पाणी वाहून नेण्याची क्षमताही अबाधित राहते. यासाठी खड्डाही खणावा लागत नसल्याने पर्यायाने पर्यावरण आणि मालमत्तेची हानी टाळता येते. त्यामुळे या तंत्रनाच्या आधारे जुन्या बंद ठेवण्यात आलेल्या जलवाहिनी सुस्थितीत करण्यासाठी सुमारे ४६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी महापालिकेने विरगो स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड केली आहे.
या कंपनीच्या माध्यमातून येत्या गुरुवारी ६ जून रोजी रेसकोर्समधील या जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. ज्यामध्ये या जलवाहिनीच्या वॉलच्या ठिकाणी कॅपिंग करून पाणीपुरवठा बंद करून जलवाहिनी आयसोलेटेड करण्यात येत आहे. पाण्याचा प्रेशर अधिक असल्यामुळे व्हॉल्वमधून अधिक पाणी वाहून जाते, त्यामुळे या जलवाहिनी पूर्णपणे रिकाम्या करून हे काम हाती घेण्यात येत आहे. यामध्ये सीआयपीपी या तंत्राचा अंतर्गत भागातून वापर करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community