Lok Sabha Election Result : फडणवीस, शिंदे, ठाकरे, पवारांचे राजकीय भवितव्य ठरविणारा निकाल

आता कुणाच्या राजकीय जीवनाला ‘नवी उभारी’ मिळते आणि कुणाचे ‘अस्तित्व धोक्यात’ येते की एका बाजूला वाढीव मतांची टक्केवारी आणि दुसऱ्याच्या पारड्यात ‘विजयाची पताका’ फडकते, याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

170
  • सुजित महामुलकर

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा (Lok Sabha Election Result) दिवस जस-जसा जवळ येऊ लागला तशी देशातल्या विशेषतः राज्यातील राजकीय नेत्यांची धाकधूक वाढली आहे. येत्या ४८ तासात देशात पुन्हा एकदा मोदी सरकार बसेल, अशी विरोधकांनाही खात्री आहेच. राज्यात मात्र चित्र वेगळे असू शकते. राज्यात महायुतीतील प्रमुख नेते भाजपाचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अजित पवार त्याचबरोबर महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (शरदचंद्र पवार) गटाचे प्रमुख शरद पवार तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचे राजकीय भवितव्य ठरवणारी वेळ काही तासांवरच येऊन ठेपली आहे. आता कुणाच्या राजकीय जीवनाला ‘नवी उभारी’ मिळते आणि कुणाचे ‘अस्तित्व धोक्यात’ येते की एका बाजूला वाढीव मतांची टक्केवारी आणि दुसऱ्याच्या पारड्यात ‘विजयाची पताका’ फडकते, याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

९६ टक्के मतदार शांत

दोन दिवसांपूर्वी एका राजकीय नेत्याशी बोलत असताना त्यांनी एक तर्क सांगितला. एका लोकसभा मतदारसंघात सरासरी साधारण २० लाख मतदार संख्या धरली आणि ६० टक्के मतदान झाले, असे मानले तर सुमारे १२ लाख मतदारांनी मतदानात भाग घेतला. या १२ लाखांमध्ये फार तर ३५-४० हजार लोक अमूक एक उमेदवार चांगला आणि त्यालाच सगळ्यांनी मतदान केल्याची ओरड गावभर, समाजमाध्यमांवर करतात. यावरून जनमत कोणाकडे आहे, कोण निवडून येईल, याबाबत एकूणच जनतेत आणि माध्यमांमध्ये एक चित्र उभे केले जाते. मात्र १२ लाखात ओरड करणाऱ्यांची संख्या टक्केवारीत सांगायची झाली तर कमाल २-२.५ टक्के, तर कोणतीही प्रतिक्रिया न देता आपल्या कामाशी काम ठेवणारे ९६-९७ टक्के मतदार शांत बसून निकालाची वाट पाहत बसतात.

(हेही वाचा Lok Sabha Elections Exit Poll : महाविकास आघाडीत सर्वाधिक नुकसान ‘शिवसेना उबाठा’चे, काँग्रेस फायद्यात)

‘गरजनेवाले कभी बरसते नही’

हे सांगण्याचं तात्पर्य इतकंच की, ‘गरजनेवाले कभी बरसते नही’. या लोकसभा निवडणूक निकालानंतर (Lok Sabha Election Result) अनेक मतदारसंघात असे धक्कादायक चित्र निश्चितच दिसेल आणि पुन्हा ‘असा निकाल कसा लागू शकतो?’ यावरून नवी ओरड सुरू केली जाऊ शकते. मग कुणी ‘ईव्हीएम’वर खापर फोडेल तर कुणी ‘पैशाचे वाटप झाले’ अशी बोंब ठोकेल, तर आधीच करांच्या ओझ्याखाली पिचलेल्या सर्वसामान्यांचा दूरान्वयेही संबंध नसलेल्या ‘ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स’ अशा यंत्रणांनाही यात ओढले जाईल.

शरद पवारांसाठी अस्तित्वाची लढाई

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पक्ष नेतृत्वावरून रस्सीखेच असली तरी खऱ्या अस्तित्वाची लढाई ही शरद पवार यांची आहे. विशेषतः बारामतीत एकवेळ अजित पवार यांच्या उमेदवार सुनेत्रा पवार हरल्या तरी अजित पवार पुढे लढू शकतात. मात्र शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना पराभव पत्करावा लागला तर शरद पवार यांनी अख्खे पवार कुटुंब मैदानात उतरवूनही आपल्याच बालेकिल्ल्यात जिंकता आले नाही, हा शिक्का कधीही न पुसण्यासारखा कायम चिकटून राहील. एकनाथ शिंदे यांना अजित पवार यांच्या तुलनेत भाजपाने अधिक जागा दिल्यामुळे अजित पवार नाराज आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. पण याचा अजित पवार यांना एक फायदा असा झाला की त्यांचे स्वतःचे केवळ दोनच उमेदवार निवडणूक रिंगणात होते, असा युक्तिवाद करण्यास वाव आहे, शिवाय अधिकृत उमेदवार कमी (चार) असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता अधिक आहे. यांचा राजकीय फायदा भविष्यात निश्चित होऊ शकतो.

फडणवीस ‘पुन्हा येणार’?

असो… पण या निकालावर (Lok Sabha Election Result) राज्यातील बड्या नेत्यांच्या विश्वासार्हतेचा कस लागणार आहे. यातील काही नेत्यांपैकी एक म्हणजे देवेंद्र फडणवीस. भाजपाचा राज्यातील प्रमुख चेहेरा. पक्षांतर्गतच नव्हे तर राजकीय विरोधक असणाऱ्या शरद पवार यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याला त्यांच्याच डावपेचाने जेरीस आणणारे फडणवीस सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर ‘पुन्हा येतील’ का? हे ठरवणारा हा निकाल असू शकतो.

शिंदे यांचे भवितव्य काय?

एकनाथ शिंदे यांनी लोकसभा जागा वाटपात भाजपाकडून १५ जागा १३ खासदारांच्या पाठिंब्यावर खेचून घेतल्या खऱ्या, पण त्यातील किती उमेदवारांचा ‘धनुष्यबाण’ अचूक निशाणा साधतो, यावर शिंदे यांच्या आयुष्यात राजकीय वनवास येतो की ठाकरे आडनाव नसतानाही शिवसेनेचे मुख्य नेते यावरून ‘प्रमुख’ नेते म्हणून उपाधी मिळते, याचाही निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(हेही वाचा Muslim धर्मांधांनी नाल्यात उभारला बेकायदेशीर मदरसा)

गणित निकालावर अवलंबून

वंचित बहुजन आघाडीची जादू या लोकसभा निवडणुकीत फारशी चालली नाही, असे चित्र जरी वर-वर दिसत असले तरी काही ठिकाणी वंचितमुळे महाविकास आघाडी उमेदवारांना ‘विजायाला’ मुकावे लागले तर आश्चर्य वाटू नये. महाविकास आघाडी नेत्यांनी वंचितला दुर्लक्षित केल्याची किंमत काही प्रमाणात मोजावी लागेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचे आगामी विधानसभेचे गणित या निकालावर अवलंबून असेल.

ठाकरेंची मशाल पेटणार की विझणार?

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याही अस्तित्वाचा प्रश्न हा निवडणूक निकाल (Lok Sabha Election Result) सोडवण्यास मदत करेल. उद्धव ठाकरे यांनी २०१९ ला भाजपाशी फारकत घेऊन कॉँग्रेस-राष्ट्रवादीशी ‘हात’मिळवणी केली. तसेच पक्ष फुटला पण हट्ट नाही सुटला, ही त्यांची भूमिका जनतेला योग्य वाटली की नाही? या कोड्याचं उत्तरदेखील येत्या ४ जूनला मिळेल. ठाकरे यांनी महाविकास आघाडीत सर्वाधिक २१ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, त्यातील किती मशाली पेटतील आणि किती विझतील, यावर बरंच काही अवलंबून असेल.

मनसे यापुढे कुणासोबत?

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर प्रथमच एखाद्या युतीला सक्रिय पाठिंबा जाहीर केल्याने येत्या विधानसभेला महायुतीसोबत जायचे की आघाडीसोबत, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी लोकसभेचा निकाल नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, अशी दाट शक्यता आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.