राज्यात सर्वात जास्त जागा जिंकूनही भाजपला सत्ता बनवण्यात अपयश आले. त्यानंतर नाथा भाऊंसारखा मोठा नेता राष्ट्रवादीमध्ये गेला. एकनाथ खडसेंनी पक्ष सोडताना, थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. एकनाथ खडसे नुसतेच बाहेर पडले नाहीत, तर मुक्ताईनगर आणि जळगावमध्ये त्यांनी भाजपला एकावर एक धक्के देण्यास सुरुवात केली. त्याचमुळे आता जळगावमध्ये भाजपची वाईट अवस्था होऊ नये, म्हणून आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे. सोमवारी शरद पवार यांची भेट घेतल्याने दिवसभर वातावरण गरम असताना आज थेट एकनाथ खडसेंच्या घरी जात सदिच्छा भेट दिली.
पक्ष सोडल्यानंतर नाथाभाऊंच्या घरी पहिल्यांदाच
एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर आज पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस नाथा भाऊंच्या घरी गेले. देवेंद्र फडणवीस हे सध्या जळगावच्या दौऱ्यावर आहेत. मुक्ताईनगरमधून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने थैमान घातले होते. यात केळी बागांसह घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे खडसेंच्या घरी सदिच्छा भेट दिली.
📍Visited Muktainagar Covid hospital this morning and discussed #COVID19 situation with health officials.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 1, 2021
My colleagues @girishdmahajan, MP @khadseraksha tai were present too. pic.twitter.com/QznwjQr1xZ
(हेही वाचाः पवार-फडणवीस भेटीमागे दडलंय काय?)
नाथा भाऊ मुंबईत
देवेंद्र फडणवीस हे नाथा भाऊंच्या घरी जरी गेले असले, तरी एकनाथ खडसे हे सध्या मुंबईत आहेत. त्यामुळे यावेळी त्यांनी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांची भेट घेऊन पक्ष बांधणीवर चर्चा केली.
खडसेंचे काय होते फडणवीसांवर आरोप?
एकनाथ खडसे यांनी 23 ऑक्टोबर 2020 रोजी भाजपला रामराम ठोकून, राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस यांनीच आपल्याला त्रास दिला, अक्षरश: पक्षातून बाहेर पडण्यासाठी भाग पाडले, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. काही मिळाले, नाही मिळाले याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले होते. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला, असे देखील खडसे म्हणाले होते.
(हेही वाचाः पवारांनी फडणवीसांना सत्तेचा मंत्र दिला असेल, पण…! काय म्हणाले संजय राऊत? )
Join Our WhatsApp Community