मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील चार जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले असून केवळ एकाच जागेवर भाजपाचा आणि एका जागेवर अगदी काठावरच शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. मात्र, या सहा पैकी चार जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले असून यामध्ये काँग्रेसने मुंबईत खाते खोलतानाच उबाठा शिवसेनेचे तीन उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे मुंबईत महाविकास आघाडीचे चार उमेदवार निवडून आल्याने मुंबई ठाकरेंची असल्याचे बोलले जात असले तरी या विजयाचे श्रेय एकगठ्ठा मुसलमानांच्या मतांना जात असून मुंबई ही ठाकरेंची राहिलेली नसून मुंबई मुसलमानांची बनल्याचे दिसून येत आहे. (Lok Sabha Election Result)
मुंबईमध्ये मागील २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे तीन आणि भाजपाचे तीन खासदार निवडून आले होते. परंतु यावेळी महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेनेचे चार आणि काँग्रेसचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते, तर शिवसेनेचे तीन आणि भाजपाचे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पण या निवडणुकीत उत्तर मुंबईतून भाजपाचे पियुष गोयल, उत्तर पश्चिममधून अगदी काठावर शिवसेनेचे रविंद्र वायकर, उत्तर मध्य मुंबईतून महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या प्रा. वर्षा गायकवाड, उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उबाठा शिवसेनेचे संजय दिना पाटील, दक्षिण मध्य मुंबईतून उबाठाचे अनिल देसाई आणि दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत हे विजयी झाले आहे. (Lok Sabha Election Result)
या निवडणुकीत सहा पैकी उबाठा शिवसेनेचे तीन आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आले असून महाविकास आघाडीच्या चार उमेदवारांच्या विजयात मुस्लिम मतदारांचे योगदान मोठे मानले जात आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उबाठा शिवसेनेचे अरविंद सावंत हे ५२ हजार ६७३ मतांनी निवडून आले आहे. या मतदारसंघात मुंबादेवी आणि भायखळा विधानसभा क्षेत्रातील मुस्लिमांची मते ही सावंत यांच्या पारड्यात झुकल्याने महायुतीचा उमेदवाराचा पराभव झाला आहे.
(हेही वाचा Lok Sabha Election Result : उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला पुन्हा केले मोठे)
तर दक्षिण मध्य मुंबईत उबाठा शिवसेनेचे अनिल देसाई हे ५३ हजार ३८४ मतांनी विजयी झाले आणि राहुल शेवाळे यांना पराभव झाला. परंतु यामध्ये माहिम, धारावी आणि अणुशक्ती व वडाळा या भागातील मुस्लिम मतांच्या जोरावर देसाई यांचा विजय सुकर झाला.
तर उत्तर मध्य मुंबईमधून महाविकास आघाडीच्यावतीने काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या केवळ १६ हजार ७११ मतांनी विजयी झाल्या आहेत. या मतदारसंघात ऍड. उज्ज्वल निकम हे १८ व्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. परंतु त्यानंतर मुस्लिम पट्टयांतील ईव्हीएम मशिन खुल्या केल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. यामध्ये वांद्रे पूर्व भागांतील बेहराम पाडा, खेरनगर, भारतनगर, चांदिवली, कलिना या भागांमधील मतदान झाल्याने गायकवाड यांना सुमारे ६० हजारांहून अधिकची मताधिक्य कापून तब्बल १६ हजार मतांनी विजय मिळवता आलेला आहे. तर उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे रविंद्र वायकर हे केवळ ४८ मतांनी पराभूत झाले. या मतदारसंघात रविंद्र वायकर यांना उबाठा शिवसेनेच अमोल किर्तीकर यांनी घाम आणला होता. परंतु रविंद्र वायकर यांना प्रत्येक वेळी विजयापासून लांब नेण्याचा प्रयत्न अंधेरी पश्चिम, दिंडोशी, जोगेश्वरी पूर्व या भागांमधील मुस्लिम मतांमुळे झाला होता. (Lok Sabha Election Result)
सर्वांत महत्वाचे म्हणजे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाचे मिहिर कोटेचा यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात असतानाच मानखुर्द शिवाजीनगर येथील मुस्लिमांनी उबाठा शिवसेनेचे उमेदवार संजय पाटील यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले. या केवळ एकाच विधानसभा मतदारसंघातून संजय पाटील यांना १ लाख १६ हजार ०७२ मते मिळाली तर मिहिर कोटेचा यांना केवळ २८ हजार १०१ मते मिळाली. त्यामुळे तब्बल ९० हजारांहून अधिकची मते केवळ या मुस्लिम पट्टयातून मिळाली. त्याखालोखाल भांडुप सोनापूर, घाटकोपर पश्चिम भागातील भागातील मुस्लिम भागातून अधिक मतदान झाले आहे.
त्यामुळे उत्तर मुंबई वगळता पाच लोकसभा मतदारसंघात मुस्लिमांनी उबाठा शिवसेनेचे उमेदवार निवडून दिले असून मुंबई ही ठाकरेंची असल्याचा दावा करणाऱ्या उबाठा शिवसेनेकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मुंबई ही आता मुस्लिमांचीच असल्याचे काँग्रेसच्या एक आणि उबाठा शिवसेनेच्या तीन उमेदवारांच्या विजयावरून स्पष्ट होत आहे.