Vanchit Bahujan Aghadi ला का मिळाली किंचित मते?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रकाश आंबेडकर यांनी एक वेगळा पॅटर्न राबवला होता यामध्ये मुस्लिमांच्या एमआयएम पक्षाबरोबर मागासवर्गीय समाजाची मोट बांधण्यात आली होती.

269
सुरुवातीला महाविकास आघाडी बरोबर जाण्यासाठी इच्छूक असलेल्या वंचित बहुजन आघाडीने नंतर स्वतःची वेगळी चूल मांडली. वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लोकसभा लढवत असल्यानं, याचा फटका भाजपाविरोधी पक्षांना, म्हणजेच महाविकास आघाडीतल्या पक्षांना बसेल, अशी शंका व्यक्त करण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष निकालात तसं काहीही दिसून आलेलं नाही. वंचितनं लढवलेल्या कुठल्याही मतदारसंघात वंचितच्या उमेदवाराला अशी मतं मिळाली नाहीत, ज्यामुळे महाविकास आघाडीला फटका बसेल. त्यामुळेच वंचितला (Vanchit Bahujan Aghadi) किंचित मते मिळाली असे म्हणावे लागेल.

संविधान बदलू शकते, अशी भीती निर्माण झाली 

असं सगळं असलं, तरी वंचित बहुजन आघाडीची इतकी पिछेहाट नक्की का झाली? याचे प्रमुख कारण म्हणजे भारतीय जनता पक्षानं ‘४०० पार’चा नारा दिल्यानंतर विरोधी पक्षांनी ‘भाजपा ४०० हून अधिक खासदार संविधान बदलण्यासाठी मागतंय’ असा प्रचार केला. हा प्रचार अनेक ठिकाणी परिणाम करताना दिसला. ‘भाजप संविधान बदलू शकते’ ही भीती दिसून आली. ही भीती प्रामुख्यानं अनुसूचित जातीच्या मतदारांमध्ये अधिक प्रकर्षानं होती. वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) कोर मतदार हा मागासवर्गीय समाजातून येतो. जो घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांना फार मानतो. त्यामुळेच या प्रचाराचा योग्य परिणाम हा महाविकास आघाडीला झाला.
देशभरात संविधान बचाव हे परसेप्शन मांडण्यात काँग्रेस आणि इंडि आघाडीला यश मिळाले. देशभरात निवडणुका सुरू झाल्यानंतर संविधान बदलण्यासाठीच ४०० जागांची गरज असल्याचा प्रचार मागासवर्गीय समाजात मोठ्या प्रमाणात रुजवला गेला आणि एनडीए सरकार जर आलं तर मोदी संविधान बदलतील अशी भीती दाखवण्यात आली. या प्रचाराचे प्रशिक्षण मोडण्यात भाजप तसेच एनडीएला फार उशीर झाला होता. त्यामुळे मागासवर्गीय समाजाची जी मते वंचित बहुजन आघाडीकडे जातात ती यावेळेस आपोआप महाविकास आघाडीकडे वळलेली दिसून येतात. एकीकडे काँग्रेस संविधान बचावाची मोहीम ठळकपणे राबवत होती आणि दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी त्याच काँग्रेससोबत आघाडी करताना वाद होतील, अशी वक्तव्य करत होती. या काळात अनुसूचित जातीच्या मतदारानं लोकसभा निवडणुकीतली आपली भूमिका कायम केली आणि ती आता निकालातून समोर आली.

यंदा एमआयएम बरोबर नसण्याचा देखील फटका पडला 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रकाश आंबेडकर यांनी एक वेगळा पॅटर्न राबवला होता यामध्ये मुस्लिमांच्या एमआयएम पक्षाबरोबर मागासवर्गीय समाजाची मोट बांधण्यात आली होती. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील जवळपास दहा ते अकरा जागांवरती वंचित बहुजन आघाडीमुळे (Vanchit Bahujan Aghadi) काही उमेदवार देखील पडले होते. तर काही लोकसभा मतदारसंघांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते देखील वंचित बहुजन आघाडीला मिळाली होती. परंतु यावेळेसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएम बरोबरची असलेली युती देखील होऊ न शकल्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या मतांमध्ये मोठी घट दिसून आली. त्यातच मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये देखील वंचितने आपले उमेदवार उभे केले होते आणि ते विशेषतः मुस्लिम समाजाचे असावे असा देखील प्रयत्न केला होता, परंतु त्याचा फारसा फायदा झालेला दिसत नाही. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे बोलायचे झाले तर यंदा वंचितला या ठिकाणी देखील कोणताच फायदा झाला नाही.तिथे संदिपान भुमरे (शिवसेना), इम्तियाज जलील (एमआयएम), चंद्रकांत खैरे (शिवसेना-उबाठा) आणि अफसर खान (वंचित) अशी चौरंगी लढत झाली. यात भुमरे आणि जलील यांच्यात खरी लढत झाली असली, तरी अफसर खान यांनी ४० हजारच्या वर मतं मिळवली.

आंबेडकरांचे अनियमित राजकारण 

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचं राजकारण अनियमित आहे. निवडणूक ते निवडणूक असं राजकारण करून निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी पूर्णवेळ राजकारण आवश्यक असतं. तसंच, संघटनात्मक पातळीवरही वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) कमकुवत आहे. केवळ आरोप करून संघटना मजबूत होते नसते. त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी तयार करावी लागते. ती केलेली दिसून येत नाही. हे देखील वंचितच्या अपयशाचे महत्त्वाचे कारण दिसून येते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.