Pothole : यंदा खड्डा भरताना महापालिका काय घेणार काळजी, जाणून घ्या!

413
Pothole : यंदा खड्डा भरताना महापालिका काय घेणार काळजी, जाणून घ्या!
संपूर्ण मुंबईत जास्त पावसाच्या कालावधीत रस्त्यांवरील खड्डे बुजविताना, प्राप्त तक्रारी लक्षात घेऊन कमीत कमी वेळेत खड्डे बुजविता येतील अशा रितीने मार्गांचा क्रम आखावा, खड्डे बुजविताना चौकोनी आकारात मास्टिकद्वारे खड्डे व्यवस्थित भरावेत, आदी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत. तसेच खड्डा भरताना वेड्यावाकड्या आकारात भरला जाणारा नाही यादृष्टीने खबरदारी घेण्याची दक्षता घेण्याच्या सूचनाही बांगर यांनी दिल्या आहेत. (Pothole)
मुंबई महानगरातील पावसाळापूर्व तयारीचा भाग म्हणून रस्त्यांच्या कामांशी संबंधित बाबींचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बांगर यांनी बुधवारी (५ जून २०२४) सायंकाळी महानगरपालिका मुख्यालयात बैठकीतून आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. मुंबईतील नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही गैरसोईंना सामोरे जावे लागू नये म्हणून खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवून काम करावे, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी यापूर्वीच दिले आहेत. तसेच रस्त्यांची सुरू असलेली कामे ही १० जून पर्यंत पूर्ण करण्यासह वाहतूक योग्य सुरक्षित स्थितीत आणण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या सर्व कार्यवाहीचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बांगर हे सातत्याने आढावा घेत आहेत. (Pothole)
पावसामुळे रस्त्यांवर तयार होणाऱ्या खड्ड्यांच्या तक्रारींचा निपटारा शक्यतो २४ तासांमध्ये करणे ही यंत्रणा म्हणून जबाबदारी घ्यावी. पावसाळा कालावधीत मुंबईतील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्ते विभाग आणि इतर सर्व संबंधित यंत्रणा सक्षमपणे आणि एकसंघपणे कार्यरत आहे, याचा अनुभव आपल्या कामकाजातून नागरिकांना आला पाहिजे, त्यासाठी सर्व संयंत्रे आणि साहित्याची उपलब्धता राहील याची खातरजमा करा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. दरम्यान, महानगरपालिकेकडून प्रगतिपथावर असलेले रस्ते वाहतूक योग्य स्थितीत आणण्याच्या दृष्टीने सर्व कामे  १० जून २०२४ पर्यंत पूर्ण करावीत, याचा पुनरूच्चारदेखील  बांगर यांनी केला. (Pothole)

मास्टिक कुकर संयंत्रांवर जीपीएस

या बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती घेतल्यानंतर बांगर म्हणाले की, रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी विभागनिहाय प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण ७२ मास्टिक कुकर उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्व मास्टिक कुकर संयंत्रांवर जीपीएस लावून त्याआधारे संयंत्रांच्या उपलब्धततेवर लक्ष ठेवले जाईल. त्यासाठी डॅशबोर्डची निर्मिती करण्यात येत आहे. (Pothole)

२४ विभागांमध्ये ७२ मास्टिक कुकरचा वापर
प्रत्येक विभागात ९ मीटरपेक्षा अधिक रूंदीच्या रस्त्यासाठी २ मास्टिक कुकर आणि ९ मीटरपेक्षा कमी रूंदीच्या रस्त्यांसाठी १ मास्टिक कुकर याप्रमाणे २४ विभागांमध्ये ७२ मास्टिक कुकरचा वापर करावा. नोंदणी प्रक्रिया करून मास्टिक कुकरसह सर्व संयंत्रांची यादी तयार करावी, अशा सूचना त्यांनी रस्ते विभागाला दिल्या. (Pothole)
मास्टिक कुकरवर जीपीएस लावून त्याचा डॅशबोर्ड तयार होणार
सर्व विभागातील मास्टिक कुकर हे सुस्थितीत तसेच वापरासाठी उपलब्ध असावेत, याची खातरजमा विभागीय पातळीवर करण्यात यावी. तसेच सर्व मास्टिक कुकरला लवकरात लवकर जीपीएस यंत्रणा बसवण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही बांगर यांनी दिल्या. त्याचप्रमाणे सर्व संबंधित कंत्राटदारांना सूचना करून मास्टिकचे उत्पादन व उपलब्धतता, आवश्यक तेव्हा व आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा होईल, यासाठी आत्तापासूनच खातरजमा करून ठेवावी. तसेच खड्डे बुजवण्याची कामे करताना विविध विभागांनी आपसात समन्वय व नियोजन राखावे. एखाद्या विशिष्ट विभागात अतिरिक्त मास्टिक कुकर आवश्यक असल्यास अन्य विभागातून मास्टिक कुकर पासून वापर करण्याची मुभा असेल, असेही त्यांनी सांगितले. (Pothole)
तर महापालिका खड्डे भरतील, पण..
संपूर्ण पावसाळा कालावधीत कोणत्याही यंत्रणेला रस्ते खोदकाम करण्याची परवानगी देता येणार नाही. परंतु, वीज, गॅस, पाणी यासारख्या अत्यावश्यक गरजांच्या कामांसाठी गरजेनुसारच रस्ते खोदकामाची परवानगी देण्यात यावी. त्यातही संबंधित  यंत्रणेकडून त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतरही त्यांनी खड्डा बुजवलेला नाही, असे आढळल्यास महानगरपालिकेने स्वतःहून तो खड्डा भरून रस्ता सुस्थितीत (सेफ स्टेज) उपलब्ध करून द्यावा आणि त्या दुरूस्तीचा खर्च संबंधित यंत्रणेकडून घ्यावा, अशा सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत. (Pothole)
या क्रमांकावर करा खड्ड्यांच्या तक्रारी 
मुंबईच्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी नागरी मदतसेवा क्रमांक १९१६, समाजमाध्यमे, व्हॉट्सएप चॅटबॉट, पॉटहोल फिक्सिंग एप्लिकेशन तसेच दुय्यम अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक इत्यादी विविध पर्याय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सर्व माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तसेच विभागनिहाय शोधण्यात आलेल्या खड्डे बुजवण्याची कार्यवाही शक्यतो २४ तासात पूर्ण करण्यात यावी, असेही ते म्हणाले. (Pothole)
मुंबईत सुमारे १४५ ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू
मुंबई महानगरात सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी बहुतांश कामे पूर्णत्वाकडे आहेत, तर काही कामे प्रगतिपथावर आहेत. यामध्ये मुंबई शहर भागात २४ ठिकाणी, तसेच पूर्व उपनगरात ३२ ठिकाणी तर पश्चिम उपनगरामध्ये ८७ ठिकाणी कामे सुरू आहेत. यातील बहुतांश रस्ते दिनांक ७ जून २०२४ पासून वाहतूकीसाठी उपलब्ध होतील. तर उर्वरीत काही रस्ते दिनांक १० जूनपर्यंत वाहतूकीसाठी खुले होतील, अशी माहिती  बांगर यांनी दिली आहे. (Pothole)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.