लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन ४८ तास उलटत नाही, तोच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यांनी लोकसभा निकालाच्या आधी देशात ३० लाख कोटी रुपयांच्या शेअर बाजार घोटाळा मोदी आणि शहा यांनी केला, असा आरोप केला. मात्र त्यानंतर माजी मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्या आरोपाचा खणखणीत प्रतिवाद केला. तसेच देशाचा राहुल गांधींवर भरवसा नाही, ते देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, गुंतवणूकदारांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप गोयल यांनी केला.
काय म्हणाले राहुल गांधी?
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी लोकांना लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लावली. पण ४ जून रोजी काय होणार? निवडणुकीचे निकाल काय येणार? हे त्यांना माहिती होते. त्यानंतर शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात खाली पडले. हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे, ३ लाख कोटींचे नुकसान झाले, त्यामुळे याच्या चौकशीसाठी संसदीय संयुक्त समिती स्थापन करावी, असे राहुल गांधी म्हणाले.
काय म्हणाले पीयूष गोयल?
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत, त्यामुळे राहुल गांधी अस्वस्थ झाले आहेत, त्यामुळे ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. मोदी सरकारच्या काळात शेअर बाजारात ऐतिहासिक वाढ नोंदवली गेली आहे, त्याचा फायदा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मिळत आहे. शेअर बाजारात भारतीय गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात शेअर बाजारातील गुंतवणूकदार आहेत, असे पीयूष गोयल (Piyush Goyal) म्हणाले.
- १० वर्षांपूर्वी, यूपीए सत्तेत असताना, २०१४ मध्ये देशाचे मार्केट कॅप ६७ लाख कोटी रुपये होते. आज त्याचे मार्केट कॅप ४१५ लाख कोटी रुपये आहे. त्यात ३४८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ज्या दिवशी एक्झिट पोल जाहीर झाले, त्या दिवशी परदेशी गुंतवणूकदारांनी चढ्या भावाने खरेदी केली आणि भारतीय गुंतवणूकदारांनी त्याचा फायदा घेतला, असे पीयूष गोयल (Piyush Goyal) म्हणाले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आश्वासन दिले आहे की, आपली आर्थिक व्यवस्था वेगाने विकसित होत आहे. वेगवेगळ्या वेळी बदल होत असताना, इक्विटी मार्केटमध्ये बदल होत राहतात. गेल्या १० वर्षात आमचे मार्केट कॅप $३ ट्रिलियन पेक्षा जास्त वाढले आहे. भारताचे इक्विटी मार्केट जगातील ५ मोठ्या देशांमध्ये सामील झाले आहे, असे पीयूष गोयल (Piyush Goyal) म्हणाले.
- राहुल गांधी यांनी निवडणुकीत प्रचाराच्या वेळी महिलांना वर्षाला 1 लाख रुपये देण्यात येणार असे म्हटले होते, आता कॉँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांत कर्नाटक, तेलंगणा येथे महिलाला रांगा लावत आहेत, त्यांना आता पैसे द्यावेत, असेही पीयूष गोयल म्हणाले.