राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता करावी लागणार नाही. त्यासाठी महामंडळाने ‘युपीआय’ प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्व वाहकांसाठी ईटीआयएम (ॲन्ड्राईड तिकीट इश्यू मशिन) उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रवासावेळी रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआर कोड अशा डिजिटल पेमेंटचा वापर करून तिकीट काढता येईल.
कॅशलेस व्यवहाराच्या दृष्टीकोनातून एस.टी. महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकिट काढण्यासाठी फोन पे, गुगल पे यासारख्या युपीआय पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वाहकांकडील इटीआयएमवरील ‘क्युआर कोड’द्वारे प्रवाशांना तिकिटाचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य आहे. अर्थात, प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत, तसेच सुट्या पैशासाठी वाहकासोबत होणारे वाद कायमचे मिटले आहेत. या सहज आणि सुलभ तिकीट प्रणालीला प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला असून, जानेवारीत प्रतिदिन केवळ साडेतीन हजार तिकीटे युपीआयव्दारे काढली जात होती. त्यामध्ये मे महिन्यापर्यंत पाचपट वाढ होऊन प्रतिदिन सरासरी २० हजार ४०० तिकिटे काढली जात आहेत.
(हेही वाचा – Tree Plantation : नवी मुंबईच्या जैवविविधतेत भर घालणाऱ्या ५ हजारांहून अधिक देशी वृक्षरोपांची लागवड)
खिशात रोख रक्कम नसतानाही काढता येईल तिकीट
प्रवाशांनी प्रवासात नेहमी वाहकाकडे युपीआय तिकिटाची मागणी करावी. जेणेकरून सुट्या पैशावरून होणारे वादविवाद टाळले जातील. सहाजिकच आपला प्रवास सुखकर व समाधानकारक होईल. युपीआय पेमेंटव्दारे क्युआर कोडच्या माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये तिकीट विक्री सुरू केली आहे. त्याचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
फायदे
– ‘महिलांना ५० टक्के तिकीट’ योजनेमुळे लालपरीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठी वाढ
– बसमधील सर्व वाहकांकडे ईटीआयएम उपलब्ध
– तिकीट काढण्यासाठी फोन पे, गुगल पे यासारख्या युपीआय पेमेंटची सुविधा
– वाहकांकडील ॲंड्राईड तिकीट मशिनवरील ‘क्युआर कोड’द्वारे देता येतील तिकिटाचे पैसे
हेही पहा –
Join Our WhatsApp Community