संपूर्ण देशात सध्या कोरोनाचे संकट असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी बऱ्याच दिवसानंतर भाष्य केले आहे. जे काही जगावर संकट आलं त्याची कोणालाच कल्पना नव्हती. फक्त आपणच चुकीच्या अंगाने हाताळलं असं नाही, अमेरिका आणि युरोपमधील देशांकडूनही चुका झाल्या. फक्त ते लवकर वठणीवर आले, पण आपण अजूनही आलो नाही. मागच्यास ठेच पुढचा शहाणा तसं आपल्याकडे झाले नसल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. आम्ही निवडणुका, कुंभमेळा, राजकारणात गुंतलो होतो, अशी टीका देखील राज ठाकरे यांनी यावेळी केली. लोकसत्ताकडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवाद मालिकेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अखेर मुद्द्यावर भाष्य केले. आपला देश अलर्ट राहिला नाही. आपले राजकारणी, सत्ताधारी अलर्ट राहिले नाहीत. त्यामुळे २०२० पेक्षा २०२१ भयानक आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे, ते म्हणाले.
(हेही वाचाः पंतप्रधान मोदींची दुसरी टर्म : लोकप्रियतेला लागली घसरण! )
भातखळकरांविषयी केला गौप्यस्फोट
भाजपचे नेते आणि मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या आमदार अतुल भातखळकरांविषयी राज ठाकरे यांनी या मुलाखतीत गौप्यस्फोट केला. आमदार अतुल भातखळकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत येण्यासाठी माझ्याकडे आले होते. मी नितीन गडकरींना फोन केला आणि त्यांना भाजपमध्ये राहायला सांगितले होते, असे राज ठाकरे म्हणाले. भाजपचेच एक लोखंडे म्हणून होते, तेही माझ्याकडे तिकीटासाठी आले होते. त्या दोघांनाही मी सांगितलं की, असे करू नका. ज्या पक्षात इतकी वर्ष वाढलात, राग आला म्हणून असे करू नका. आहात तिथेच रहा, हा वेडपटपणा करू नका. हे सांगत असताना अजून दोन माणसं तिथे होती, त्यांच्यासमोर हे सांगितले. साक्षीदार म्हणून त्यांना उभं करू शकतो. हे असं घडत असतं. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातही अनेक लोक सोडून गेले. सोडून जातात तेव्हा ते एकटे असतात. जे सोडून गेले त्यांच्याबरोबर माझा महाराष्ट्रसैनिक नाही गेला, असे राज म्हणाले.
(हेही वाचाः मेट्रो- २,७ चाचणी शुभारंभ! प्रकल्पाचे जनक फडणवीसांना नाही निमंत्रण! )
लोकांना नेमकं काय हवं?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी मनसेला मतदान होत नसल्याबाबत खंत व्यक्त केली. आम्ही नाशिकमध्ये खूप कामे केली. 5 वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, पाणी प्रश्न मिटवला. हे चांगले आहे की वाईट? लोकांनी साथ दिली तर हुरुप येतो. लोकांना नेमके हवे काय? इतरांसारखंच वागायचे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. लोक कामाची अपेक्षा करतात, पण मतदान दुसऱ्याला करतात. त्यामुळेच वर्षानुवर्षे तेच प्रश्न राहतात. गटार तुंबली, रस्ते तसेच, प्रश्न तेच, वर्षानुवर्षे तसेच सुरू राहते. समाजाने काम केले तर शाबासकी द्यावी, काम नाही करणार त्याला बाजूला करावे, हे जेव्हा घडेल तेव्हा सर्व काही व्यवस्थित होईल, असे ते म्हणाले.
भारतातील निवडणुका प्रतिकांवर होतात
माझ्या सहकार्यांचे काम आहे. पक्ष म्हणून नेता ओळखला जातो. भारतात निवडणुका प्रतिकांवर होत असतात. लोकांनी मोदींना पाहून मतदान केले तर बाळासाहेबांना पाहून सत्ता दिली, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच देशात जो लाट निर्माण करतो, तो जिंकतो. तसेच सध्या कोरोनाच्या लाटेवर सगळे स्वार असल्याची टीका देखील त्यांनी केली.
(हेही वाचाः मोदींनी 7 वर्षांत ‘अच्छे दिन’ साठी काय केलं?)
केंद्र-राज्य वादावर काय म्हणाले राज?
केंद्राला महाराष्ट्र नेहमीच आव्हान वाटत राहिलेला असून, आजही महाराष्ट्राला डावलले जात आहे का? यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, आधीच्या महाराष्ट्रासोबत तसं वागणं समजू शकतो, कारण महाराष्ट्र तसा होता. आजच एकूण पाहता केंद्राने तसं वागण्याची गरजच नाही. ही वेळ केंद्र आणि राज्याने हातात हात घालून लोकांसाठी काम करण्याची असून, वाद घालण्याची नाही. राजकीय तर नाहीच नाही. गेल्या काही महिन्यांत मी मोदींना, मुख्यमंत्र्यांना लिहिलेली पत्रं, मुख्यमंत्र्यांशी केलेली चर्चा राज्याच्या हिताची होती आणि तेच मी सांगण्याचा प्रयत्न केला. मी कुठेही विरोधी पक्षात आहे सांगण्यासाठी गेलो नव्हतो किंवा तशी भूमिकाही निभावली नाही. आज लोकांना संकटातून बाहेर काढणं गरजेचं असून, बाकीचं राजकारण गेलं तेल लावत, असे राज म्हणाले.
बांग्लादेशवर राज ठाकरेंची टीका
भारतात जाऊ नका असे चित्र जगात निर्माण झाले आहे. बांग्लादेशने आपल्याला बॉर्डर बंद केल्याचे सांगावे. बांग्लादेशच्या सीमेवरुन हजारो लोक आपल्याकडे आले. ज्यांना आपल्याला अजून काढता येत नाही, तो भाग वेगळाच. पण तो देश भारतासाठी सीमा बंद आहे असे सांगतो, अशी टीका देखील राज ठाकरे यांनी यावेळी केली. यांच्याकडून निघणारी माणसे आम्ही पोसायची आणि हे संकटात तुम्हाला सीमा बंद असल्याचे सागंणार. त्यांनी सीमा उघडली तरी जाणार कोण, असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
(हेही वाचाः राज ठाकरे भावुक… कार्यकर्त्यांच्या घरी पाठवले पत्र!)
Join Our WhatsApp Community