Coastal road: कोस्टल रोडचा दुसरा बोगदा येत्या मंगळवारी ११ जून पासून होणार वाहतुकीस खुला

224
Coastal road: कोस्टल रोडचा दुसरा बोगदा येत्या मंगळवारी ११ जून पासून होणार वाहतुकीस खुला
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वतीने बांधण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी असा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (Dharamvir, Swaraj Rakshak Chhatrapati Sambhaji Maharaj Mumbai Coastal Road) (दक्षिण) प्रकल्प ९० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाला असून प्रकल्पाची अंतिम टप्प्यातील कामे देखील वेगाने पूर्ण केली जात आहेत. या प्रकल्पातील मरीन ड्राइव्हपासून सुरु होणारा दुसरा भूमिगत बोगदा उत्तर दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या दृष्टीने सोमवार  १० जून २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) आणि विविध मान्यवर या मार्गावर पाहणी करणार आहेत. त्यानंतर लागलीच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. (Coastal road)
त्यानंतर, मंगळवारी ११ जून २०२४ पासून सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत म्हणजे १६ तासांच्या कालावधीसाठी हा मार्ग वाहतुकीला नियमितपणे खुला करण्यात येणार आहे. दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस या मार्गावर वाहतूक सुरु राहील. तर शनिवार व रविवार असे आठवड्यातील दोन दिवस प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्णत्वास नेणे सोयीचे व्हावे, यासाठी हा मार्ग बंद राहील. (Coastal road)

सोमवारी १० जून २०२४ रोजी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे हे स्वतः या उत्तरवाहिनी मार्गाची पाहणी करणार आहेत. उप मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजितदादा पवार, मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री  दीपक केसरकर (Guardian Minister Deepak Kesarkar), मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा, विविध लोकप्रतिनिधी, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी (Bhushan Gagrani), अतिरिक्त  आयुक्त (पूर्व उपनगरे) अमित सैनी यांच्यासह विविध मान्यवर या पाहणी दौऱ्यास उपस्थित राहणार आहेत.

आता प्रामुख्याने मरीन ड्राइव्ह परिसर ते हाजी अली परिसर असा उत्तर दिशेने प्रवासासाठी सुमारे ६.२५ किलोमीटर लांबीचा मार्ग खुला होत आहे. या मार्गामध्ये अमरसन्स उद्यान व हाजी अली येथील आंतरमार्गिकांचा वापर करता येणार आहे. या आंतरमार्गिकांवरुन उतरुन किंवा प्रवेश करुन वेगवेगळ्या भागांमध्ये जाणारी वाहतूक सुलभ होईल. प्रामुख्याने बॅरिस्टर रजनी पटेल चौकातून (लोटस जेट्टी) पुढे वरळी, वांद्रेच्या दिशेने तर वत्सलाबाई देसाई चौकातून (हाजी अली) पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे जाणारी वाहतूक सुलभ होईल.
-मरीन ड्राइव्ह येथून भूमिगत बोगदा मार्गाने प्रवेश केल्यानंतर अमरसन्स उद्यान आंतरमार्गिकेने बाहेर पडता येईल. तर, अमरसन्स उद्यान आंतरमार्गिकेने प्रवेश केल्यानंतर दक्षिण बाजूस मरीन ड्राइव्हकडे तर उत्तर बाजूस बॅरिस्टर रजनी पटेल चौक व वत्सलाबाई देसाई चौकाकडे जाता येईल.
-मरीन ड्राइव्ह येथून भूमिगत बोगदा मार्गाने प्रवेश केल्यानंतर हाजी अली येथील आंतरमार्गिकेवरुन बॅरिस्टर रजनी पटेल चौक (लोटस जेटी परिसर) येथून पुढे वरळी, वांद्रेकडे मार्गक्रमण करता येईल.
-मरीन ड्राइव्ह येथून भूमिगत बोगदा मार्गाने प्रवेश केल्यानंतर हाजी अली येथील आंतरमार्गिकेवरुन वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली चौक) येथून पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे मार्गक्रमण करता येईल.
–  तसेच उत्तर दिशेला प्रवास करणे अधिक सुलभ व्हावे याकरिता पुढील टप्प्यात बिंदूमाधव ठाकरे चौकापर्यंतचा किनारी रस्ता १० जुलै २०२४ पर्यंत सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्या दिशेने कामे सुरू आहेत. (Coastal road)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.