आर्थर रोडवरील मुंबई मध्यवर्ती कारागृहात मुंबई महापालिकेच्या वतीने लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले असून, पहिल्याच दिवशी १६९ कैद्यांचे लसीकरण मंगळवारी करण्यात आले आहे. आवश्यक ओळखपत्र नसलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या सूचना
देशभरात कोविड–१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर लस घेण्यासाठी नागरिकांना सरकारने विहित केलेले ओळखपत्र सादर करावे लागते. परंतु ज्या व्यक्तींकडे कोणत्याही प्रकारची आवश्यक ती ओळखपत्र नाहीत, असे काही नागरिकही आढळत आहेत. यामध्ये बेघर व्यक्ती, साधू-संत, कारागृहातील बंदीवान, सुधारगृहात राहणाऱ्या व्यक्ती, मानसिक आरोग्य केंद्रांमध्ये राहणारे नागरिक, वृद्धाश्रमात राहणारे ज्येष्ठ नागरिक, रस्त्याच्या कडेला राहणारे याचक आदी प्रकारातील काही नागरिकांकडे प्रसंगी ओळखपत्र नसल्याचे निदर्शनास आले. अशा नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारातील नागरिकांकडे ओळखपत्र नसल्यास त्यांच्याशी संबंधित शासकीय विभाग, संघटना, बिगर शासकीय संस्था इत्यादींच्या सहकार्याने अशा नागरिकांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी सविस्तर मार्गदर्शक असे निर्देश देखील केंद्र सरकारद्वारे निर्गमित करण्यात आले आहेत.
(हेही वाचाः घाटकोपर, मुलुंडच्या गृहसंकुलातील ७ हजार नागरिकांचे लसीकरण)
आर्थर रोड तुरुंगात लसीकरण
त्यानुसार मुंबई मध्यवर्ती(आर्थर रोड) कारागृहातील सुमारे २४२ कैद्यांचे लसीकरण यापूर्वी टप्प्या-टप्प्याने कस्तुरबा रुग्णालयात करण्यात आले होते. या २४२ बंदीवानांकडे विहित ओळखपत्र होते. मात्र, ओळखपत्र नसलेल्या कैद्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन आणि केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्याने मध्यवर्ती कारागृहातच स्वतंत्र लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रात वैद्यकीय व इतर मनुष्यबळासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या केंद्राद्वारे आवश्यक शासकीय ओळखपत्र नसलेल्या १६९ बंदीवानांना मंगळवारी लस देण्यात आली. त्यासाठी मुंबई प्रोजेक्ट या बिगर शासकीय संस्थेच्या माध्यमातून हे लसीकरण राबववण्यात आले.
यापुढेही होणार लसीकरण
कारागृहातील पात्र कैद्यांना लस मिळत असल्याने, कारागृहात कोविड–१९ संसर्ग फैलावास अटकाव करणे शक्य होणार आहे. तसेच कैद्यांना बाहेर रुग्णालयात नेऊन लसीकरण करुन घेण्यासाठी पोलिस यंत्रणेवर येणारा ताण देखील वाचणार आहे. मुंबई मध्यवर्ती कारागृहातील पात्र कैद्यांना यापुढेही आवश्यकतेनुसार लस देण्याबाबतची कार्यवाही वेळोवेळी मध्यवर्ती कारागृह लसीकरण केंद्रामार्फत केली जाणार आहे.
(हेही वाचाः आता ४५ वर्षांवरील व्यक्तींचेही थेट लसीकरण!)
Join Our WhatsApp Community