BMC School : महापालिका शाळांमधील मुलांना यंदाही स्वत:च खरेदी करावी लागणार छत्री

430
BMC School : महापालिका शाळांमधील मुलांना यंदाही स्वत:च खरेदी करावी लागणार छत्री
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबई महापालिका शाळांमधील (BMC School) मुलांना मोफत शालेय वस्तूंचे वाटप महापालिकेच्यावतीने करण्यात येत असून याबाबतच्या शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुलांना रेनकोटचे वाटप करण्याच्या दृष्टीकोनातूच याची खरेदी केली जात असली तरी प्रत्यक्षात या शाळांमधील मुलांना छत्रीचे वाटप यंदा होणार नाही. प्रत्यक्ष छत्री ऐवजी यंदाही शाळेतील मुलांना छत्रीचे पैसे अदा केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मागील वर्षी छत्री खरेदीची प्रक्रिया वेळेत न झाल्याने मुलांना छत्री खरेदीकरता पैसे देण्यात आले होते, परंतु यंदा वेळेत प्रक्रिया होऊनही यासाठी कोणी कंत्राटदारच पुढे न आल्याने महापालिका शिक्षण विभागाने यंदाही मुलांना छत्री खरेदीचे पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. (BMC School)

मुंबई महापालिका शाळांमधील (BMC School) मुलांना शालेय वस्तूंसह पावसाळ्याकरता छत्री आणि रेनकोटचे वाटप केले जाते. इयत्ता पूर्व प्राथमिक ते इयत्ता सातवीच्या पर्यंतच्या मुलांना रेनकोटचे वाटप होते आणि इयत्ता आठवी ते दहावीच्या मुलांना दोन वर्षांकरता छत्रीचे वाटप केले जाते. यामध्ये पीव्हीसी रेनकोटचे वाटप केले जाते. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५, सन २०२५-२६ या दोन वर्षांकरता रेनकोट आणि छत्रीचे खरेदी करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया जून २०२३ रोजी निविदा मागवली होती. या निविदेमध्ये रेनकोटच्या पुरवठ्याकरता कंपनीची निवड करण्यात आली, परंतु छत्रीच्या खेरदीकरता कोणत्याही कंपनीची निवड करण्यात आली नाही. पूर्व प्राथमिक ते इयत्ता सातवी पर्यंतच्या मुलांसाठी पीव्हीसी रेनकोटची खरेदी करण्यासाठी लोटस कमर्शिअल्स या कंपनीची निवड करण्यात आली असून या रेनकोट खरेदीसाठी सुमारे साडेदहा कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रत्यक्षात आचारसंहितेअभावी याचे कार्यादेश देण्यात आले नसले तरी प्रशासनाच्या शब्दाखातर पात्र ठरलेल्या कंपनीने काही प्रमाणात या रेनकोटचा पुरवठा काही शाळांमध्ये करण्यास सुरुवात केली आहे. (BMC School)

(हेही वाचा – Lok Sabha Election मध्ये 4 बांगलादेशीयांना बोगस मतदान केल्याप्रकरणी अटक)

दरम्यान, इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात येणाऱ्या छत्री करता कोणतीही कंपनी पुढे न आल्याने महापालिका प्रशासनाने यंदा यासाठी छत्रीचे पैसे विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने प्रती छत्रीकरता ५६० रुपये एवढा दर अंदाजित केला होता. परंतु यासाठी एकही कंपनी पुढे आले नव्हते. शिक्षण विभागाने यासाठी एवढा दर अंदाजित केला असला तरी घनकचरा व्यवस्थापन विभागाकरता कमी दरात छत्री उपलब्ध झाल्याने मध्यवर्ती खरेदी विभागाने यासाठीचा दर कमी केला. त्यामुळे याला प्रतिसाद लाभला नाही. त्यानंतर महापालिकेने यासाठीचा दर वाढवण्याचा निर्णय घेतला, परंतु या एवढ्या कालावधीमध्ये छत्री उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने कंपन्यांनी यासाठी कोणतेही स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे अखेर प्रशासनाने रेनकोटची खरेदी करून छत्रीचे पैसे विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या मार्फतच याची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छत्रीची रक्कम निश्चित करून मुख्याध्यापकांना दिली जाणार आहे, आणि मुलांनी देयके सादर केल्यानंतर याचे पैसे अदा केले जातील अशी माहिती मिळत आहे. मागील वर्षी या शाळेच्या मुलांना २७० रुपये छत्री खरेदीकरता मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या माध्यमातून प्रशासनाच्यावतीने देण्यात आले होते. (BMC School)

छत्रीचे वाटप होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या

इयत्ता ८ वी ते १०वी (मुले) : ४२,६०६

इयत्ता ८ वी ते १०वी (मुली) : ४०,७१३

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.