MTNL Cable : जमीन खोदून केबल चोरली, कितीचा माल लागला हाती, वाचा…

1832
MTNL Cable : जमीन खोदून केबल चोरली, कितीचा माल लागला हाती, वाचा...

मुंबईत भुरट्या चोरांना आता लोकांची घर फोडून चोरी करण्यात यश येत नसल्यामुळे आता या चोरांनी जमीन खोदून पैसे लुटण्याची नवीन शक्कल लढवली आहे. आजवर आपण सार्वजानिक ठिकाणांवरील रेलिंग, तसेच स्ट्रीट फर्निचर चोरण्याच्या घटना ऐकल्या असतील. परंतु आता चोरांची नजर आता जमिनीखालील तारखंड अर्थात केबल्सवर पडली आहे. जमिनी खालील चालू केबल्स खोदून काढण्याचा प्रकार माटुंगा परिसरात घडला असून या चोरांनी चक्क १०३ मीटर लांबीची वाहिनी चोरुन या वाहिनीतील ६ लाख ७८ हजार रुपयांचे तांबे विकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जमिनी खालील केबल्सही आता सुरक्षित राहिल्या नाहीत. (MTNL Cable)

एमटीएनएलची सेवा पाडली बंद

माटुंगा (पूर्व) परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील पदपथ खोदून अज्ञातांनी केबल चोरून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. दादर, माटुंगा परिसरातील एमटीएनएल ग्राहकांना सेवा देण्यासाठी एमटीएनएलने मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील पदपथाखालून वाहिनी (केबल) टाकली आहे. एमटीएनएलकडे ग्राहकांच्या दूरध्वनी सेवा खंडित झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होऊ लागल्या तेव्हा शोध घेतला असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील बस थांब्याजवळ अज्ञातांनी पदपथ खोदून १०३ मीटर लांबीची वाहिनी चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. या वाहिनीतील ६ लाख ७८ हजार रुपयांचे तांबे अज्ञातांनी चोरून नेले आहे. याबाबत महानगरपालिकेने दिनांक १७ मे २०२४ रोजी पोलिसांत तक्रार केली तर, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) यांनी माटुंगा पोलिस ठाण्यात ३० मे २०२४ रोजी गुन्हा दाखल केला आहे. या अनधिकृत खोदकामातून मुंबई महानगरपालिका आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. (MTNL Cable)

(हेही वाचा – Muslim : नसिरुद्दीन शाह यांनी मुसलमानांना सुनावले; म्हणाले, त्यांना शिक्षणापेक्षा हिजाबची चिंता)

पोलिसात तक्रार अर्ज दाखल

या प्रकरणाबाबत मुंबई महानगरपालिकेने तत्पूर्वीच म्हणजे १७ मे २०२४ रोजी पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला आहे. महानगरपालिकेच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, असे तक्रार अर्जात म्हटले आहे. तसेच ११ जून २०२४ रोजी पुन्हा एकवार याप्रकरणी पोलिसांना पत्र पाठवून माटुंगा परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व इतर आसपासच्या मार्गांवर रात्री पोलिस गस्त वाढवावी, असे देखील या अर्जात महानगरपालिकेच्या एफ उत्तर विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांनी नमूद केले आहे. (MTNL Cable)

अनधिकृत खोदकाम केल्याचे आढळून आल्यास…

पावसाळा सुरू झाल्याने स्थानिकांची गैरसोय टाळण्यासाठी हे पदपथाचे पुनर्भरणाचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणाची महानगरपालिकेने गंभीर दखल घेतली आहे. आपापल्या विभागात अशा प्रकारे कुठे अनधिकृत खोदकाम केल्याचे आढळून आल्यास त्वरित पोलिसात तक्रार करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने सर्व विभागीय कार्यालयातील सहायक आयुक्तांना दिले आहेत. याच अनुषंगाने मुंबई महानगरातील इतर सर्व प्राधिकरणांनाही महानगरपालिकेने कळविले आहे. (MTNL Cable)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.