मंदिरांमध्ये (Hindu Temple) भाविकांकडून जो प्रसाद अर्पण केला जातो त्या प्रसादात अनेकदा वर्ज्य असलेले पदार्थ मिसळले जात असल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. यामुळे हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. या गैरप्रकाराच्या विरोधात व्यापक स्वरूपात प्रसाद शुद्धी चळवळ उभी करण्यात आली आहे. त्यासाठी आता प्रसाद विक्रेत्यांना ते वितरित करत असलेल्या प्रसादाच्या शुद्धतेचे प्रमाण देऊन ओम प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. तशी संकल्पना समस्त हिंदू संघटना आणि संत-महंतांच्या माध्यमातून अस्तित्वात आली आहे. या चळवळीची सुरुवात नाशिक येथून होणार आहे. विशेष म्हणजे चळवळीच्या शुभारंभाआधीच १३ प्रमुख हिंदू धार्मिक संघटनांनी या प्रमाणपत्राला पाठिंबा दिला आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरापासून सुरुवात
या प्रसाद शुद्धी चळवळीच्या अंतर्गत प्रसाद विक्रेत्यांना ओम प्रमाणपत्राचे वितरण करण्याची सुरुवात शुक्रवार, 14 जूनपासून नाशिकमधील श्री त्र्यंबकेश्वर मंदिरापासून (Hindu Temple) होणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले धार्मिक क्षेत्र आहे. येथे देशभरातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. मंदिराबाहेर प्रसादाची अनेक दुकानं असून या दुकानांमधील प्रसादात भेसळ किंवा कोणत्याही वर्ज्य पदार्थाचा वापर होत नाही ना याची पाहणी केली जाणर आहे. सर्व व्यवस्थित असलेल्या दुकानांना ‘ओम प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे. ज्यायोगे भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचणार नाही.