मागील काही वर्षांपासून मेट्रो रेल्वेच्या सुरु असलेल्या कामांमुळे आणि एमएमआरडीएकडून (MMRDA) कायमच दुर्लक्षित झालेल्या अनुक्रमे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर मागील वर्षांपासून खड्डयांच्या शापातून पापमुक्त होत आहेत. मात्र, हे दोन्ही द्रुतगती महामार्ग महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर पुढील काळात योग्यप्रकारे देखभाल करण्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना सुचवण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन आयआयटी मुंबईची मदत घेत आहे. त्यामुळे या दोन्ही द्रुतगती महामार्गाच्या देखभालीवर आयआयटी मुंबईची नजर राहणार असून त्यांच्या पुढील अहवालानुसारच या दोन्ही मार्गाची देखभाल केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, पश्चिम द्रुतगती महामार्गाचे ३१ टक्के आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील १९ टक्के एवढ्या क्षेत्रफळाच्या डागडुजीचे काम पूर्ण झाल्याची माहिती मिळत असून यंदाच्या पावसाळ्यात सेवा रस्त्यांवर विशेष लक्ष दिले जात असल्याचीही माहिती मिळत आहे. (Western and Eastern Expressway)
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एम.एम.आर.डी.ए (MMRDA) यांच्या ताब्यातून पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग हा मुंबई महापालिकेला या रस्त्याची सुधारणा आणि देखभाल करण्याच्या दृष्टिकोनातून ०३ ऑक्टोबर २०२२ ला हस्तांतरित करण्यात आला. तब्बल २७.८५ किलोमीटर लांबीच्या व ४२ मीटर रुंदीचा पश्चिम द्रुतगती महामार्ग, तर १८.६ किलोमीटर असून ६० मीटर रुंद असा शीव ते मुलुंड हा पूर्व द्रुतगती महामार्ग आहे. या दोन्ही मार्गांवरील पावसाळ्यापूर्व व पावसाळ्यातील खड्डे भरण्यासाठी, खराब भागाचा विकास करण्यासाठी तसेच सेवा रस्ते, पदपथ यांची देखभाल, गटारांवरील झाकणे आदी कामांसाठी दोन्ही मार्गांसाठी एकाच ठेकेदाराची नियुक्ती केली. (Western and Eastern Expressway)
तब्बल २७.८५ किलोमीटर लांबीच्या व ४२ मीटर रुंदीच्या पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पावसाळ्यापूर्वीची प्रतिबंधात्मक देखभाल पावसाळ्यात दरम्यान या रस्त्याची कामे पूर्ण करून वाहतूक सुरळीत राखण्याच्या दृष्टिकोनातून दोन वर्षांच्या कालावधी के.आर कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड-कोणार्क आणि आर अँड बी या संयुक्त भागीदारीतील कंपनीची निवड केली आहे. या पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या कामांसाठी विविध करांसह १३१ कोटींमध्ये केले जात आहेत. तर मुंबईतील मुलुंड ते शीव हा पूर्व द्रुतगती महामार्ग १८.६ किलोमीटर असून ६० मीटर रुंद आहे. पावसाळ्यात या महामार्गावर खड्डे पडू नये यासाठी मागील वर्षी दोन वर्षांकरता के आर कंस्ट्रक्शन कंपनीची निवड केली. या मार्गावरील खड्डे तथा खराब भागांची सुधारणा करण्यासाठी विविध करांसह ९३ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. (Western and Eastern Expressway)
(हेही वाचा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आमचे मायबाप, काय म्हणाले Chandrakant Patil…)
यामध्ये पुर्व द्रुतगती महामार्गावरील १९ टक्के क्षेत्रफळाचे काम पूर्ण झाले आहे तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर ३१ टक्के एवढया क्षेत्रफळाच्या डागडुजीचे काम करण्यात आले आहे. या दोन्ही द्रुतगती महामार्ग अंतर्गत डागडुजी करण्यात आलेल्या क्षेत्रफळा व्यतिरिक्त उर्वरीत रस्त्यांच्या भागामध्ये मोठ्याप्रमाणात क्रॅक्स, रटिंग, पृष्ठभागामध्ये असमानता दिसून येते. त्यामुळे या भागाची पावसाळ्यापूर्वी डागडुजी करणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यामध्ये या भागांमध्ये मोठ्याप्रमाणात खड्डे पडण्याची शक्यता आहे. हे दोन्ही महामार्ग प्रमुख रस्ते आहे आणि या रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे यावर रहदारी असते. तसेच व्हीआयपी आणि विविध सेलिब्रेटी या रस्त्यावरुन वारंवार जात असतात. या द्रुतगती महामार्गाच्या सद्यस्थिती व इतर तांत्रिक बाबी तपासून कमीत कमी खर्चामध्ये मुंबईच्या वातावरणाशी व रहदारी अनुकूल तसेच वारंवार होणारे चरीकाम या सर्व बाबींचा अभ्यास करून देखभाल तथा सुधारणा करण्यासाठी योग्य ती पद्धत सुचवण्यासाठी आयआयटी मुंबईचे डॉ. धर्मवीर सिंग यांची नियुक्ती केली आहे. या दोन्ही द्रुतगती महामार्गाची देखभाल तथा सुधारणा करण्यासाठी दीर्घकालीन उपाय बाबतचा अहवाल डॉ. धर्मवीर सिंग हे महापालिकेला सादर केला आहे, त्यानुसार याची देखभाल करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Western and Eastern Expressway)
याबाबत अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मागील पावसाळ्यात पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील मुख्य रस्त्यावरील कामे पार पडली असून या पावसाळ्यापूर्वी सेवा रस्त्यांवरील खराब भागांची सुधारणा तथा देखभाल करण्याच्या कामांना गती दिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित कंत्राटदारांची दोन वर्षांकरता नेमणूक करण्यात आल्याने यंदा विशेषत: सेवा रस्त्यांवरील खड्डे दुरुस्ती आणि खराब भागांची सुधारणा यावर अधिक भर दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Western and Eastern Expressway)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community