महापालिकेने केले बंद, पण खासगी रुग्णालयात लसीकरणाला गर्दी

मुंबईकरांची मोफत पेक्षा पैसे देऊन लस घेण्याचीच अधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे.

186

मुंबई महापालिकेच्या वतीने सध्या मोफत लसीकरण राबवले जात असले, तरी खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क आकारुन होणाऱ्या लसीकरणाचेच प्रमाण अधिक आहे. महापालिकेकडून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण बंद असले, तरी खासगी रुग्णालयांमध्ये या वयोगटातील व्यक्ती पैसे देऊन लस घेण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुंबईकरांची मोफत पेक्षा पैसे देऊन लस घेण्याचीच अधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे.

खासगी रुग्णालयांत सशुल्क लसीकरण

मुंबई महापालिकेतर्फे फ्रंट लाइन वर्कर, आरोग्य विभागातील कर्मचारी यासह ४५ ते ६० वर्षे व त्यापुढील व्यक्तींचे लसीकरण केले जात आहे. या सर्वांचे लसीकरण महापालिकेकडून मोफत केले जाते. मात्र, १ मे पासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार कस्तुरबा, बीकेसी, राजावाडी, कुपर, सेव्हन हिल्स आणि बीकेसी जंबेा कोविड सेंटर आदी ठिकाणी १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण केंद्र सुरू होते. परंतु काही दिवस हे लसीकरण केंद्र सुरू केल्यानंतर ते बंद करण्यात आले. दुसरीकडे खासगी रुग्णालयांना स्वत:च्या लसींची खरेदी करुन लसीकरण करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत खासगी रुग्णालयांच्यावतीने लसींची खरेदी करुन प्रत्येक लसीकरता शुल्क आकारुन लसीकरणाची प्रक्रिया पार पाडली जात आहे.

सर्वाधिक लसीकरण

आजच्या घडीला खासगी रुग्णालयांच्यावतीने ८६ केंद्रांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण केले जात आहे. या सर्व रुग्णालयांमधील लसीकरणाची क्षमता ३५ हजार असली, तरी ३१ मे रोजी या सर्व खासगी रुग्णालयांमध्ये एकाच दिवशी ५६ हजार ३६५ व्यक्तींचे लसीकरण पार पडले होते. जेव्हापासून महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद पडले, तेव्हापासून ९ ते १० हजार लसीकरण करत या केंद्रांमध्ये सरासरी ३३ हजार लसीकरण केले जात आहे.

मागील आठ दिवसांमधील खासगी रुग्णालयांमधील १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण

१ जून २०२१: ३३०९९ (एकूण लसीकरण : ४८,३८७)

३१ मे २०२१: ५६,३६५ (एकूण लसीकरण : ८६,८८७)

३० मे २०२१: लसीकरण नाही

२९ मे २०२१: ३१,३२२ (एकूण लसीकरण : ५५,८४३)

२८मे २०२१: २०,४५४ (एकूण लसीकरण : ४३,१८१)

२७ मे २०२१ः १८,६७६ (एकूण लसीकरण : ४१,१३०)

२५ मे २०२१: १०,०५१ (एकूण लसीकरण : ३४,२६५)

२४ मे २०२१: ९,०७८ (एकूण लसीकरण : २५,२११)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.