Paris Olympic 2024 : रुद्रांक्ष पाटील प्रकरणात अभिनव बिंद्राचा रायफल असोसिएशनला पाठिंबा

Paris Olympic 2024 : रुद्रांक्षने भारतासाठी ऑलिम्पिक कोटा जिंकला, पण निवड चाचणीत तो अपयशी ठरला.

155
Paris Olympic 2024 : रुद्रांक्ष पाटील प्रकरणात अभिनव बिंद्राचा रायफल असोसिएशनला पाठिंबा
  • ऋजुता लुकतुके

रायफल नेमबाज रुद्रांक्ष पाटीलला ऑलिम्पिक संघातून डावलल्यावरून सध्या क्रीडा क्षेत्रात वाद निर्माण झाला आहे. पण, या प्रकरणात १० मीटर एअर रायफलमध्ये वैयक्तिक सुवर्ण पटकावलेला अभिनव बिंद्राने भारतीय रायफल असोसिएशनची बाजू घेतली आहे. रुद्रांक्षने दोन वर्षांपूर्वी नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पदक मिळवून १० मीटर एअर रायफल प्रकारात ऑलिम्पिक पात्रता मिळवली. पण, नेमबाजी प्रकारात खेळाडूने जिंकलेला कोटा किंवा पात्रता ही देशाला मिळते. त्या जागेवर कुणाला ऑलिम्पिकला पाठवायचं याचा निर्णय देशातील खेळाची मध्यवर्ती संघटना घेते. (Paris Olympic 2024)

यंदा भारतीय रायफल असोसिएशनने अलीकडेच नवी दिल्लीत ऑलिम्पिकच्या संघ निवडीसाठी चाचणी स्पर्धा भरवली होती. आणि या स्पर्धेत रुद्रांक्ष संदीप सिंग आणि अर्जुन बबुता यांच्या पाठोपाठ तिसरा आला. पहिल्या दोन खेळाडूंचीच ऑलिम्पिकसाठी निवड होणार होती. त्यामुळे कोटा जिंकूनही रुद्रांक्षची ऑलिम्पिक खेळण्याची संधी हुकणार आहे. १० मीटर एअर रायफल या प्रकारातच अभिनवने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकलं होतं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅमेजमेंट संस्थेच्या वार्षिक पदवीदान समारंभासाठी अभिनव मुंबईत होता. तिथे त्याने पत्रकारांशी गप्पा मारल्या आणि पूर्वनिर्धारित पद्धत कायम ठेवल्याबद्दल रायफल असोसिएशनची बाजू उचलून धरली. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – T20 World Cup, Nassau County Cricket Stadium : न्यूयॉर्कमधील नसॉ काऊंटीच्या क्रिकेट स्टेडिअमवर जेव्हा बुलडोझर फिरला)

‘निवड चाचणी घेणार हे आधीच ठरलं होतं आणि चीनसह इतरही अनेक देश हीच पद्धत अवलंबतात. त्यामुळे भारतात झालं ते अयोग्य नाही. ज्यांची निवड झाली नाही, ते नाराज होणं स्वाभाविक आहे. पण, आधी ठरलेल्या पद्धतीवर कायम राहणंच अशावेळी योग्य ठरतं,’ असं अभिनव म्हणाला. ‘आधी ठरलेली प्रक्रिया पार पडली नसती, तरीही लोक उलटं बोललेच असते. त्यापेक्षा असोसिएशनने पूर्वनिर्धारित पद्धतीप्रमाणेच निर्णय घेतला हे चांगलंच झालं. निवड समितीने त्यासाठी स्पर्धा भरवली. त्यांनी नुसती निवड केलेली नाही. त्यामुळे झालेल्या गोष्टीबद्दल फार बोलणं योग्य नाही,’ असं शेवटी अभिनव म्हणाला. शिवाय यंदा १५ जणांचं नेमबाजांचं पथक पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे आणि नेमबाजांकडून अधिक पदकांचीही अपेक्षा असेल, असं त्याने बोलून दाखवलं. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.