लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष महाविकास आघाडीने खोट्या नरेटिव्हद्वारे जनतेची दिशाभूल करून दलित, आदिवासी समाजाची मते मिळवली. हा अपप्रचार खोडून काढण्यासाठी आणि मतदारांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी भाजपाने मोहीम हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात भाजपाचे ४८ नेते जनतेत जाऊन जनतेच्या मनातील गैरसमज दूर करणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (१४ जून) यासंदर्भात माहिती दिली. (Chandrashekhar Bawankule)
लोकसभा निवडणुकीत भाजपाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. या अपयशाची करणे जाणून घेण्यासाठी तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यासाठी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दादर येथील कार्यालयात भाजपा नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षाने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. विरोधकांना उघडे पाडून आगामी विधानसभा निवडणुकीत तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नव्या जोमाने काम करून महायुती प्रचंड मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. (Chandrashekhar Bawankule)
आजच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत पक्षाचे नेते, कार्यकर्ते घरोघरी जाऊन मविआ इंडी आघाडीचा खोटा प्रचार जनतेपर्यंत नेऊन मतदारांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोदी सरकारने गेल्या १० वर्षांत जातपात, धर्म या पलिकडे जाऊन केलेला सर्वसमावेशक विकास, आगामी पाच वर्षात मोदी सरकारचे विकसित भारताचे लक्ष्य जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत. याशिवाय पक्षाकडून नवमतदार नोंदणी अभियानही हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. (Chandrashekhar Bawankule)
(हेही वाचा – MHADA Mumbai Board : म्हाडाच्या मुंबईतील १७३ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी येत्या २७ जून रोजी ई-लिलाव)
भाजपा-एनडी सरकार वचनबद्ध
संविधानाला सर्वोच्च मानत संविधानासमोर नतमस्तक होऊन भाजपा-एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता विकसित भारत घडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे वारंवार सांगितले होते. विरोधकांनी खोटेनाटे पसरवून मागास आणि दलितांच्या मनात भय पसरवले. मात्र आता कुठल्याही प्रकारचे भय त्यांच्या मनात नसल्याचे बावनकुळे म्हणाले. संकल्पपत्रातील प्रत्येक आश्वासनाच्या पूर्तीसाठी महायुती आणि भाजपा-एनडी सरकार वचनबद्ध आहे. हा विश्वास जनतेच्या मनात पुन्हा नव्याने निर्माण करण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, नेता आणि मंत्री पुढील काळात झटणार असल्याचेहीत्यांनी सांगितले. (Chandrashekhar Bawankule)
दरम्यान, वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या नोंदींमध्ये असलेल्या चुका दुरुस्त करण्याची गरज आहे. ज्या सरकारच्या काळात चुकीच्या नोंदी करून वक्फला जमिनी देण्यात आल्या त्या नोंदी दुरुस्त करण्यासाठी निधी देण्यात आला आहे. ज्यांच्या जमीनी आहेत त्यांना त्या परत मिळाल्या पाहिजेत. चुकीच्या नोंदी दुरुस्त झाल्या पाहिजेत अशीच सरकारची भूमिका असावी, असेही बावनकुळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. (Chandrashekhar Bawankule)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community