- वंदना बर्वे
अठराव्या लोकसभेत भारतीय जनता पार्टीने रालोआचे सरकार स्थापन केले आहे आणि कॉंग्रेस मुख्य विरोधी पक्ष म्हणून अस्तित्वात आला आहे. हे खरं असलं तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालाने या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना आवर घालण्याची ताकद क्षेत्रीय पक्षांना दिली आहे. (Lok Sabha Election 2024)
संसदेचे अधिवेशन येत्या २४ जूनपासून सुरू होणार आहे. अशात, कोणता पक्ष किती ताकदवर आहे? याची गोळाबेरीज होणे स्वाभाविक आहे. भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले आहे. तर, कॉंग्रेस लोकसभेतील मुख्य विरोधी पक्ष बनला आहे. मागील दहा वर्षांपासून लोकसभेतील मुख्य विरोधी पक्षाचे पद रिक्त होते. परंतु, आता या जागेवर कॉंग्रेस बसणार आहे. भाजपा सत्ताधारी पक्ष आणि कॉंग्रेस मुख्य विरोधी पक्ष बनला असला तरी क्षेत्रीय पक्ष या दोन्ही पक्षांना सहज नमवू शकतात असे चित्र सध्या लोकसभेचे आहे. देशात पाच राष्ट्रीय पक्ष आहेत. भाजपा, कॉंग्रेस, आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष. यातील कॉंग्रेस आणि भाजपाला सोडले तर उर्वरित तिन्ही पक्षांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला आहे. (Lok Sabha Election 2024)
क्षेत्रीय पक्षांच्या अंगात मात्र बारा हत्तींचे बळ संचारले आहे. तेलगु देसम पक्ष आणि संयुक्त जनता दलाने पाठिंबा दिला नाही तर भाजपा केंद्रात सरकार स्थापन करू शकत नाही. अर्थात सरकार बनविणे आणि ते टिकून राहणे क्षेत्रीय पक्षांच्या मर्जीवर अवलंबून आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा जेडीयू आणि तेदेपा हेच केवळ क्षेत्रीय पक्ष मजबूत झाले आहेत असे अजिबात नाही. तर जवळपास ४० क्षेत्रीय पक्षांची उपस्थिती लोकसभेत निर्णायक ठरणार आहे. १८ व्या लोकसभेत चार राष्ट्रीय पक्षांनी ३४६ जागा जिंकल्या आहेत. यात भाजपा २४० आणि कॉंग्रेसच्या ९९ जागांचा समावेश आहे. परंतु, हे दोन्ही पक्ष या संख्याबळावर सरकार स्थापन करू शकत नाही. क्षेत्रीय पक्षांचा पाठिंबा मिळाल्याशिवाय राष्ट्रीय पक्षांना स्वबळावर काहीही करता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Sanjay Nirupam: मातोश्री – २ फॅक्टरीचे मालक उद्धव ठाकरे, तर संजय राऊत…, संजय निरुपम यांची जहाल टीका)
जेडीयू आणि तेदेपामुळे भाजपा शक्तीशाली पक्ष झाला आहे तर समाजवादी पक्ष आणि द्रमुक या पक्षांमुळे इंडी आघाडी बळकट झाली आहे. १८ व्या लोकसभेत तब्बल ४१ राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतील. या ४१ पैकी भाजपा, काँग्रेस, आप आणि सीपीआयएम या चार राष्ट्रीय पक्षांनी ३४६ किंवा ६४ टक्के जागा मिळाल्या. राज्यनिहाय क्षेत्रीय पक्षांचा विचार केला तर समाजवादी पक्षाचे नाव अग्रभागी घ्यावे लागेल. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सपाने ८० पैकी ३७ जागांवर विजय नोंदविला आहे. खासदारांच्या बाबतीत सपा यूपीतील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. २०२९ च्या निवडणुकीत सपाचे फक्त दोन खासदार निवडून आले होते. २०२४ मध्ये हा आकडा ३७ वर पोहचला आहे. (Lok Sabha Election 2024)
मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने १२ जागा जिंकल्या आहेत. २०१९ च्या तुलनेत जेडीयूचा परफॉर्मंस कमकुवत म्हणावा लागेल. कारण २०१९ मध्ये जेडीयूने १६ जिंंकल्या होत्या. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) राज्यातील २५ पैकी १६ जागा जिंकून नवीन इतिहास रचला आहे. २०१९ मध्ये तेदेपाचे केवळ तीन खासदार निवडून आले होते. २०२४ च्या निवडणुकीत १० पेक्षा जास्त जागा जिंकणारा तेदेपा हा आंध्र प्रदेशातील एकमेव पक्ष होय. वायएसआर काँग्रेस (४), भाजपा (३) आणि जनसेना पक्ष (२) जागा जिंकली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने राज्यातील ४२ पैकी २९ जागांवर विजय मिळविला आहे. महत्त्वाचे म्हणजे इंडी आघाडीचा घटक पक्ष असला तरी टीएमसीने यावेळेस कोणत्याही पक्षाशी आघाडी केली नव्हती. २०१९ मध्ये टीएमसीचे २२ खासदार निवडून आले होते. (Lok Sabha Election 2024)
(हेही वाचा – Using Multiple SIMs : एकापेक्षा जास्त सिमकार्ड वापरली तर अतिरिक्त भूर्दंड पडणार नाही, ट्रायचं स्पष्टीकरण)
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) ने ३९ पैकी २२ जागा जिंकल्या आहेत. मागच्या निवडणुकीत २३ खासदार निवडून आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली आहे. याउलट, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (उबाठा) नऊ आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागा मिळाल्या आहेत. याशिवाय, रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांच्या नेतृत्वातील लोकजन शक्ती पक्षाला या निवडणुकीत शंभर टक्के जागा मिळाल्या आहेत. लोजपाने पाच जागा लढविल्या होत्या आणि पाचही जागा जिंकून आल्या आहेत. लोजपा हा रालोआचा घटक पक्ष आहे. (Lok Sabha Election 2024)
राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या राजद (४), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी मार्क्ससीट (४), आम आदमी पक्ष (३), इंडियन मुस्लिम लीग (३), झारखंड मुक्ती मोर्चा (३), जनसेना पार्टी (२), सीपीआय (२), जेडीएस (२), व्हीसीके (२), सीपीआई (२), रालोद (२), जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (२) जागा मिळाल्या आहेत. देशातील १७ असे पक्ष आहेत ज्यांचा केवळ एक खासदार निवडून आला आहे. यात युनायटेड पिपल्स पार्टी, असाम गण परिषद, हिंदुस्थानी अवाम मोर्चा, केरळ कॉंग्रेस, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी, एनसीपी, व्हॉईस आफ दी पिपल पार्टी, झोराम पिपुल मुव्हमेंट, शिरोमणी अकाली दल, राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी, भारत आदिवासी पार्टी, सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा, एमडीएमके, आझाद समाज पार्टी (कांशीराम), अपना दल, एजेएसयू आणि एआयएमआयएमचा समावेश आहे. याशिवाय सात खासदार अपक्ष निवडून आले आहेत. लोकसभेत ५४३ जागा आहेत. यातील चार राष्ट्रीय पक्षांचे ३४६ खासदार निवडून आले आहेत. उर्वरित १९७ खासदार हे लहान लहान क्षेत्रीय पक्षांचे आहेत. याचा अर्थ असा की, १८ व्या लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा अंकुश या क्षेत्रीय पक्षांच्या हातात राहणार आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community