शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी वरळी सी फेस शाळेत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी शनिवारी (१५ जून) रोजी स्वागत केले. गुलाब पुष्प देत, विद्यार्थ्यांचे आपुलकीने नाव विचारतानाच आयुक्तांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला. ‘विद्यार्थी प्रवेश पाडवा’ आणि ‘पहिले पाऊल’ या उपक्रमांचा शुभारंभ यानिमित्ताने महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते करण्यात आला. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या शालेय वस्तुंचे वाटपही यावेळी करण्यात आले. (BMC)
मुंबई महानगरपालिकेच्या वरळी सी फेस शाळा येथे पहिली इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश उत्सवाचे आयोजन शनिवारी (१५ जून) रोजी करण्यात आले होते. लहान मुलांचे औक्षण करून, गुलाब पुष्प देऊन यावेळी स्वागत करण्यात आले. शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी प्रवेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पालक वर्गासोबतही महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी संवाद साधला. (BMC)
अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपआयुक्त (शिक्षण) चंदा जाधव, शिक्षण अधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षण अधिकारी (माध्यमिक) राजू तडवी आदी यावेळी उपस्थित होते. तसेच वरळी सी फेस शाळेच्या मुख्याध्यापिका (प्राथमिक) (इंग्रजी माध्यम) बागेश्री केरकर, मुख्याध्यापिका (प्राथमिक) (मराठी माध्यम) नीशा म्हात्रे, मुख्याध्यापिका (माध्यमिक) (इंग्रजी माध्यम) वैशाली कासारे, मुख्याध्यापिका (माध्यमिक) (मराठी माध्यम) अरविंद पवार हेदेखील उपस्थित होते. (BMC)
वरळी सी फेस शाळेतील अभिनव आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये इनोव्हेशन लॅब, खगोलशास्त्र प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा आदी ठिकाणी महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी भेट दिली. प्रयोगशाळेत सुरू असणाऱ्या उपक्रमांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. तसेच शैक्षणिक संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी प्रयोगशाळेतील उपकरणांचा वापर हा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदतकारक ठरत आहे, याबाबत देखील विचारपूस केली. (BMC)
(हेही वाचा – Smart meter पासून सर्वसामान्यांची सुटका; सरकारकडून जनआक्रोशाची दखल)
अंतराळ क्षेत्रातील संकल्पना समजण्यास मदत…
इनोव्हेशन लॅबच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या प्रयोगाची विद्यार्थी वर्गाला नावीन्यपूर्ण संकल्पना समजून घेण्यासाठी मदत होत आहे, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तर खगोलशास्त्र प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना अंतराळ क्षेत्रातील संकल्पना समजण्यास होणारी मदत, त्यातून अंतराळ विषयक वाढणारी आवड, या क्षेत्रासाठीचा विद्यार्थ्यांचा कलही त्यांनी जाणून घेतला. (BMC)
प्रवेश पाडवा अंतर्गत विविध उपक्रम
शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या दिवशी ‘प्रवेश पाडवा’ आयोजित करण्यात आला होता. शाळेत पहिल्यांदाच प्रवेश केल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांचे मन रमावे यासाठी विविध उपक्रम प्रवेश पाडवा अंतर्गत राबविण्यात येतात. दैनंदिन जीवनातील गोष्टी शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाव्यात, हा देखील उपक्रमामागील उद्देश आहे. खेळण्याच्या माध्यमातून वस्तू मोजणे, अभ्यासासोबतच खेळांचा वापर आदी विविध उपक्रम यात समाविष्ट आहेत. आजपासून पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी हा प्रवेश पाडवा हा उपक्रम सुरू राहणार आहे. (BMC)
पहिले पाऊल उपक्रमाचे उद्दिष्ट
विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आवडीचा कल शोधणे, हे पहिले पाऊल उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांची आवड आणि कल लक्षात घेऊन गट तयार करण्यात येतात. गटातील विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना आवडीचे शिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये शाळेची आवड निर्माण होणे, शिक्षणाची गोडी लागावी यादृष्टीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणे; त्यासोबतच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पालक वर्गाचा सहभाग करून घेणे हे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांची नाव नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, गणनपूर्व तयारी, समुपदेशक कक्ष आदीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा कल तपासण्यात येतो. पालकांसोबत विद्यार्थी विकास या उपक्रमात अपेक्षित आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community