भारतामध्ये पाण्याचा मुख्य स्त्रोत म्हणून गावोगावी विहीरी खोदलेल्या आढळतात. काही आकाराने लहान तर काही अवाढव्य आकाराच्या. पण सर्वसाधारणपणे राजाश्रयातुन निर्माण केलेल्या विहीरी या पाण्याच्या स्त्रोत एवढ्याच हेतूने न बांधता धार्मिक आणि सांस्कृतिक ज्ञानाचा स्त्रोत म्हणुन बांधण्यात आल्या. जिथे पाण्याबरोबर ज्ञानार्जनाचे कार्य आपसूकच घडत होते. अशीच एक विहीर ‘रानी की वाव’ जी भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये सुप्रसिद्ध आहे. (Rani Ki Vav)
राणी की वाव ही भारतातील युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहे. तसेच १०० रु च्या नविन नोटेवर तिचा फोटो गौरवार्थ छापलेला आढळून येतो.
अकराव्या शतकात, तत्कालीन सोळंकी (चालुक्य) राणी उदयमती यांनी ही विहीर बांधली म्हणुन तिचे नाव हे ‘राणी की वाव’. तिचे पती सोळंकी वंशीय राजा भिमदेव (प्रथम) यांच्या स्मरणार्थ राणीने ही विहीर बांधली होती.
६०० वर्षांहून जास्त काळ ही विहिर अज्ञात होती. सरस्वती नदीच्या पुराने वाहुन आलेल्या गाळामुळे ती जमिनीखाली बऱ्यापैकी गाडली गेली. १९ व्या शतकात इंग्रज पुरातत्व तज्ञांनी (जेम्स बर्गेस आणि हेन्री काऊजेन्स) केलेल्या सर्वेक्षणातुन तसेच त्या वेळी प्रवाशांनी (आर्थर मॅलेट आणि कर्नल जेम्स कोड) केलेल्या नोंदीतुन या विहिरीचे अस्तित्व सिद्ध होते. नोंदीत फक्त मुख्य विहिरीचा वरचा भाग आणि तोरणद्वाराबद्दल माहिती मिळते. कर्नल जेम्स टोड यांच्यानुसार तिथले दगड/अवशेष पाटण मधील दुसरी विहिर ‘बरोत नी वाव’ बांधण्यासाठी वापरले गेले. इंग्रज अधिकारी एस. के. फोर्ब्स यांनी सुद्धा रानी की वावच्या अवशेषांबद्दल नोंदी केलेल्या होत्या. जवळील सरस्वती नदीच्या पुराने आणि जमिनीखाली गाडले गेल्याने ही विहिर मधल्या काळात मुस्लिम आक्रमकांपासुन सुरक्षित राहिली असे तज्ञांचे मत आहे.
१९३० ते १९६० पर्यंत प्राथमिक संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले होते. पण स्वातंत्र्यानंतर रानी की वावला गॅझेटद्वारे संरक्षित स्थळाचा दर्जा दिला आणि त्याचा ताबा भारतीय पुरातत्त्व विभागाकडे देण्यात आला. जेव्हा पुरातत्त्व विभागाने ताबा घेतला तेव्हा मुख्य विहिरीचा वरचा भाग भग्नावस्थेत होता तर इंग्रज पुरातत्व तज्ञांनी नोंद केलेले तोरणद्वाराचे अस्तित्वच नव्हते. १९६० नंतर खऱ्या अर्थाने खोदण्याचे, संवर्धनाचे काम पुरातत्त्व विभागाने हाती घेतले. वेगवेगळ्या कालखंडात केलेले हे काम पुरातत्त्व विभागाने २००८ पर्यंत पुर्ण केले. सर्व बाबींची पूर्तता करून २०१४ साली रानी की वावला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला. (Rani Ki Vav)
गुजरातमधील अहमदाबाद शहरापासून जवळपास १२५ किमी अंतरावर असलेलं पाटण हे जिल्ह्याचे शहर. पाटण ही पुरातन काळातील राजधानी होती जी लोप पावलेल्या पवित्र सरस्वती नदीकाठी वसलेली. हेच पाटण शहर “रानी की वाव” किंवा “रानी नी वाव” या अभुतपुर्व स्थापत्यशास्त्राच्या कलाविष्काराचे स्थान आहे. गुजरातमध्ये विहिरीला बावडी किंवा वाव म्हणुन संबोधले जाते. सर्व विहिरींची राणी असा काहिसा अर्थ लावता आला तरी तिला राणी की वाव म्हणण्यामागे एक ऐतिहासिक तथ्य आहे. अकराव्या शतकात, तत्कालीन सोळंकी (चालुक्य) राणी उदयमती यांनी ही विहीर बांधली म्हणुन तिचे हे नाव. त्यांचे पती सोळंकी वंशीय राजा भिमदेव (प्रथम) यांच्या स्मरणार्थ राणीने ही विहीर बांधली.
राणी की वाव जागतिक वारसा स्थळ असल्याने भारतीय पुरातत्त्व विभागाने ही जागा खुप छान पद्धतीने सुशोभित आणि स्वच्छ ठेवलेली आहे. वर्षभरात लाखो पर्यटक देशविदेशातुन येथे भेट देतात. तिथे जाताच सुरुवातीला छान बागबगीचा शिवाय काही दिसत नाही. थोडे पुढे जाता विहिरीच्या कठड्यावर लावलेले लाकडी कुंपण दिसायला लागते. जेव्हा तुम्ही विहीरीच्या प्रवेशद्वारावर जाता तेव्हा जमिनीखाली जे दिसते ते तुम्हाला अचंबित केल्याशिवाय रहात नाही. विहिरीपेक्षा जमिनीखाली बांधलेली काही मजली वास्तु म्हणा ना. हो सात मजली जमिनीखाली उलटे बांधलेल्या मंदिरासारखा आकार. प्रत्येक भिंत, खांब आणि कोपरा वेगवेगळ्या नक्षीकामांनी तसेच विविध देवीदेवतांच्या मुर्तींनी सुशोभित. खाली उतरणाऱ्या पायऱ्या सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने रचलेल्या. बराचसा भाग नष्ट होऊनही सद्यस्थितीत जे आहे त्यावरुन त्या काळातील या रचनेची कल्पना करता येईल.
रानी की वाव चे आकारमान
रानी की वाव हे उपयुक्त पाणीसाठ्याबरोबर धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्थान म्हणुन बांधण्यात आली. ढोबळमानाने तिचा आकार १६१० स्क्वेअर मीटर आहे. तिची लांबी प्रवेशद्वाराजवळच्या तोरणापासुन पलीकडे विहिरीच्या आतल्या बाजुपर्यंत ७० मीटर, रूंदी २३ मीटर आणि खोली २८ मीटर आहे. विहिरीचा आकार पाण्याची गरज आणि संवर्धन ओळखुन तसेच मांगल्याचा प्रतिकासारखा म्हणजे एका मंदिरासारखा (उलटे बांधलेल्या) आहे. विहिर मंदिराप्रमाणे पुर्व-पश्चिम अशी बांधली आहे.
राणी की वाव: स्थापत्य आणि नक्षीकलेचा आविष्कार
आधी सांगितल्याप्रमाणे ही वाव सात मजली आणि एका मंदिरासारखी आहे. ही वाव मरु-गुर्जर स्थापत्यशैलीची आहे. मरु-गुर्जर ही मंदिर स्थापत्य शैली असुन तिचा उगम पुरातन गुजरात आणि राजस्थानात झाला. आपण जसजसे खाली जातो तसतसे विहिरीचे ४ उंच भाग दिसतात मग त्यानंतर मुख्य विहिर. खाली घेतलेला फोटो पहिल्या भागावरुन घेतला आहे ज्यात आपण इतर ३ भाग पाहू शकता. पुर्वी विहिरीच्या तळापर्यंत (पाणी असेल तिथपर्यंत) म्हणजे खाली ७ मजल्यापर्यंत जाता येत असे. पण २००१ मध्ये भुज येथे झालेल्या भयंकर भुकंपाचे काही परिणाम आणि नुकसान इथेही झाले. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पहिले ४ मजलेच पर्यटकांसाठी खुले आहेत.खाली उतरताना दोन्ही बाजुंना भिंतींवर वेगवेगळ्या देवीदेवतांच्या मुर्ती कोरलेल्या दिसतात. पुराणातील काही घटनाही मुर्ती रुपात पहायला मिळतात. (Rani Ki Vav)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community