MNS : मनसेच्या इंजिनात कार्यकर्त्यांचे इंधन पडते कमी

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) भाजपाप्रणित महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, यात आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात कोणतीही बोलणी झाली नव्हती, असे सांगण्यात येते.

875
MNS : मनसेच्या इंजिनात कार्यकर्त्यांचे इंधन पडते कमी
MNS : मनसेच्या इंजिनात कार्यकर्त्यांचे इंधन पडते कमी
सचिन धानजी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अधिवेशन गुरुवारी रंगशारदा सभागृहात पार पडले आणि या बैठकीनंतर मी कुणाकडे जागा मागायला जाणार नाही, आपण २२५ ते २५० विधानसभेच्या जागा लढवण्याची तयारी करतोय असे सांगत त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले. लोकसभा निवडणुकीत भाजपाला अर्थात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेला जागा वाटपाची तयारीच झालेली नसताना अशा प्रकारची घोषणा का करावी लागते, असा प्रश्न याद्वारे उपस्थित होऊ लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत आणि आपल्या देशाचा विकास व्हावा या एकाच हेतूने राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) भाजपाप्रणित महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, यात आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात कोणतीही बोलणी झाली नव्हती, असे सांगण्यात येते. मनसेने ही घोषणा केली असली तरी विधानसभेत ते आपल्या या भूमिकेवर ठाम असतीलच असे नाही. कदाचित त्यांची भूमिका बदलेली आपल्याला पहायला मिळेल. मुंबईतील सहा जागांसह राज्यातील लोकसभेच्या काही जागा आम्ही लढवणार अशा प्रकारची घोषणा करणाऱ्या मनसेने शेवटपर्यंत ना स्वबळावर ही निवडणूक लढवली ना महायुतीत सामील होऊन. पण मागील सप्टेंबर महिन्यात मनसेने स्वबळाचा नारा देत मावळ, दक्षिण मुंबई, ठाणे-पालघर- भिवंडी, कल्याण, रायगड, बारामती, संभाजी नगर आणि पुणे आदी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी अनुक्रमे अमेय खोपकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, राजू पाटील, संदीप देशपांडे, वसंत मोरे, बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरे या नेत्यांवर सोपवली हाती. पण संपर्कप्रमुख तसेच निरीक्षक बनून प्रत्यक्षात त्यांनी या मतदारसंघात काय बांधणी केली? कार्यकर्त्यांमध्ये स्वबळाच्या नावावर स्फुर्ती आणण्याचे काम केले असले तरी प्रत्यक्ष मतदानात इंजिन ऐवजी कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हावरच त्यांना मतदान करावे लागले. त्यामुळे कुठे तरी पक्षाच्या कामांत झोकून देणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झालेला आहे.

(हेही वाचा – Pune Car Accident: मुलाला निबंध लिहिण्याची शिक्षा; ‘बाल न्याय’ मंडळाच्या ३ सदस्यांना कारणे दाखवा नाेटीस)

राज ठाकरे यांनी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला दिलेला बिनशर्त पाठिंबा त्यांच्या कार्यकर्त्यांना आवडला का? तर याबाबत संमिश्र प्रतिक्रिया आहे. कार्यकर्ता गोंधळात आहे. मतदारही गोंधळात आहे. तर मग ज्या बाळासाहेबांची शैली आपल्या रुपात जनता जनार्दन पाहत आहे, त्या जनतेला मनसे एकप्रकारे गृहीत धरून चालली आहे, हे जनतेला मान्य नसेल. सन २०१९ची लोकसभा निवडणूक आपण लढत नाही, त्यानंतर काय झाले तर पुढील विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकमेव आमदार राजू पाटील यांच्या रुपात निवडून आला. त्या आधी सन २०१७च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत मुंबईत सात नगरसेवक निवडून आलेत. त्यातील सहा नगरसेवक सोडून शिवसेनेत गेले. उरला होता फक्त संजय तुर्डेच्या रुपात एकमेव नगरसेवक. अशा स्थितीत पक्ष जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक लढवणे ही आवश्यक असते. आणि निवडणुकीच्या माध्यमातून आपला जनाधार किती आहे हे पक्षाला समजत असते. नेमकी हीच चूक मनसेने केली आणि जिथे सन २००९मध्ये मनसेचे मुंबई, पुणे, नाशिक आणि ठाण्यातून १३ आमदार निवडून आले होते आणि १३ जागांवर मनसेचे उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते आणि २९ जागांवर मनसेचे उमेदवार तिसऱ्या जागांवर होते. पण या मिळालेल्या यशानंतर पुढे अपयशच मिळत आले आहे. सन २०१४च्या निवडणुकीत मनसेचा जुन्नरमधील एकमेव आमदार निवडून आला.

तर सन २०१२च्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत नाशिकमध्ये ४० नगरसेवक आणि मुंबईत २८ नगरसेवक निवडून आले होते, तसेच पुणे महापालिकेत २९ नगरसेवक निवडून आले होते. ही आकडेवारी मनसे पक्ष आज कुठे असायला हवा आणि कुठे दिसतोय. मुळात पक्ष हा कायम संघटनात्मक बांधणीवरच उभा असतो. मनसे पक्ष हा मुळातच या संघटनात्मक बांधणीवर सक्षमपणे उभा होता म्हणूनच सन २०१४च्या विधानसभा निवडणूक असो वा सन २०१२च्या सार्वत्रिक महापालिका  निवडणूक असो, यात त्यांना यश मिळवता आले. पण जेव्हा मनसेची संघटनात्मक बांधणी कमजोर झाली तेव्हापासून या पक्षाची वाताहात सुरु झाली. खरंतर पक्ष चालवणे हे खायचे काम नाही असे राज ठाकरे हे वारंवार सांगत असतात. ज्याचे जळतं त्यालाच कळतं, हे जरी खरी असले तरी पाण्यात उडी मारल्यानंतर हात हलवावेच लागतात, नाही तर बुडून मरण्याची वेळ येते हेही समजून घ्यायला हवे.

राज ठाकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग मुंबई महाराष्ट्रात आहे. पण त्यांची वारंवार निराशाच होणार असेल तर मानणारा वर्गही चलबिचल होतो. पक्षाची भूमिका एकतर त्या पदाधिकारी, कार्यकर्ता तथा समर्थकांना कळत नाही आणि त्यांना कळत नसल्याने ते जनतेला सांगू शकत नाही. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गोरेगावमध्ये प्रथमच गटप्रमुखांचा मेळावा घेतला. आजवर केवळ नेत्यांना जवळ करणाऱ्या उध्दव ठाकरे यांना गटप्रमुखांना धीर द्यावा लागला, त्यानंतर राज ठाकरे यांनीही गटाध्यक्षांचा मेळावा घेतला. कारण गटप्रमुख असो वा गटाध्यक्ष ही पक्षाची प्रमुख ताकद आहे, नव्हे तर तो पक्षाला भक्कम करणारा मजबूत पाया आहे. भले कोणी स्थानिक मोठा पदाधिकारी  नसला तरी गटप्रमुख तसेच गटाध्यक्ष हा पक्षाचे काम अविरत करत राहतो आणि त्यांच्या जनसंपर्कांमुळेच मतदारांना तो आपल्या पक्षाकडे आकर्षित करू घेत असतो. त्यामुळे मनसेला आधी पुरुष आणि महिला गटाध्यक्षांची बांधणी मजबूत करणे आवश्यक राहिल. यांचे नेतृत्व करणारा शाखाध्यक्ष आणि महिला शाखाध्यक्ष व त्यानंतर वरील विभाग अध्यक्षापर्यंतची बांधणी ही मजबूत असेल तर मनसेला निवडणूक लढवताना कुठेच अडचण येणार नाही.

पण मनसेची आजची स्थिती अशी आहे की विभाग अध्यक्ष हा आपल्या तोऱ्यात वावरत असतो आणि शाखाध्यक्ष आपल्या तोऱ्यात, गटाध्यक्षाला विचारले तर विचारले. त्यामुळे मनसेच्या शाखाध्यक्षाने मिळेल तर मोकळ्या जागेत दोन चार खुर्च्या टाकून लोकांचे प्रश्न ऐकण्यासाठी बोलले पाहिजे, गटाध्यक्षांचा तिथे बोलावून त्यांना पक्षाची भूमिका पटवून सांगितली पाहिजे, विभागातील समस्या गटाध्यक्षांकडून समजून घेतल्या पाहिजे. परंतु शाखाध्यक्षच जर गटाध्यक्षांना महिनोंमहिने भेटत नसेल आणि तो गटाध्यक्षांच्या संपर्कात नसेल तर मग ही संघटनात्मक बांधणी मजबूत कशी होईल. त्यामुळे आजच्या स्थितीला मनसेने २२५ ते २५० जागा लढवण्याची तयारी दर्शवली असली तरी सध्याची पक्षाची बांधणी विचारात घेता हे शिवधनुष्य पेलणे कठिण वाटते. जर २०१९च्या निवडणुकीत सुमारे  १२५ जागा लढवून एक आमदार निवडून येवू शकतो, तिथेच पक्षाची स्थिती लक्षात येते.

आज राज ठाकरे यांच्यासाठी अनुकूल वातावरण आहे. शिवसेनेची दोन छकले पडलेली आहे. त्याचा फायदा मनसेला होऊ शकते. पण विस्कटलेल्या घडीमध्ये त्यांना यश येईल याबाबत साशंकता आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह कोकणातही काही भागांमध्येच पहिल्या टप्प्यात लक्ष केंद्रीत करून स्वत: शाखाशाखांना भेटी देऊन कार्यकर्त्यांमधील मरगळ आणि निरुत्साह झटकून टाकून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून झेप घेण्याचे बळ कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या पंखात भरल्यास ते शक्य आहे. शिवसेनेचे दोन पक्ष स्वत:चे अस्तित्व सिध्द करण्याचा प्रयत्न करत आहे. पण राज ठाकरे हे व्यक्तीमत्व असे आहे की ते राज्याचे नेतृत्व करु शकते. त्यासाठी त्यांना मनापासून आणि कोणत्याही पदाची लालसा न ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे. कारण आज पक्षात अनेक नेते, पदाधिकारी आहेत. त्यांचे कुणाना कुणाशी पटत नाही. मुळात राज ठाकरे यांना प्रथम नेत्यांमधील एकमेकांप्रती असलेले हेवेदावे, समज गैरसमज हे समोरासमोर बसवून दूर करायला हवे. कारण हेच नेते खाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांप्रती गैरसमज पसरवत असतात. त्यातून पक्षाचे नुकसान होते, हे टाळणे आता खूप गरजेच आहे. संधी आली आहे पण संधीचे सोने जर करता आले नाही तर यापुढे ही संधी पुन्हा येणार नाही.

मनसेने आपले इंजिन उलटे होते ते सुलटे करूनही पाहिले. पण यार्डमधील इंजिन काही बाहेर आले नाही. परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंजिन जोरात धावले पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांच्या इंधनाची गरज आहे. मुंबईमध्ये भांडुप, विक्रोळी, चांदिवली, माहिम, शिवडी, भायखळा, चारकोप, कांदिवली, दहिसर, मागाठाणे आदी भागांमध्ये मनसेचे चांगले प्रस्थ होते, त्याची आजही केवळ इतिहासातील नोंद आहे. त्यामुळे हा इतिहास पुन्हा सुवर्ण अक्षरात मनसेच्या नावे लिहिला गेला पाहिजे यासाठी प्रथम या सर्व विधानसभा मतदारसंघाची बांधणी मजबूत करणे आवश्यक आहे. तरच मनसेला मुंबईसह राज्यात दोन आकडी संख्या गाठता येईल. एकटा सेनापती काही करू शकत नाही. युध्दाला सामोरे जाण्यासाठी सैनिक हा हवाच आहे आणि सैनिकाशिवाय सेनापतीला नेतृत्व केल्याचे समाधान मिळत नाही. त्यामुळे मनसे किती जागा लढते हे महत्वाचे नसून सैनिकांची फौज किती मजबूत करते यावर लढवल्या जाणाऱ्या जागांचे भवितव्य अवलंबून आहे. सुमारे १२५ जागा लढून जर एक जागा जिंकली जाणार असेल तर केवळ ५० जागा लढून १० ते १२ जागा निवडून आणणे हे केव्हाही चांगले. त्यामुळे पक्षाने या सर्वांचा आधी विचार करणे गरजेचे असून माझी मनसे, मी मनसेचा असा अभिमान बाळगून जेव्हा मनसैनिक काम करेल तेव्हाच मनसेचे आणि पर्यायाने राज ठाकरे यांचे स्वप्न साकार होईल, असे वाटते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.