भारतीय संस्कृतीमध्ये विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. विवाह म्हणजे दोन व्यक्तींचे, दोन कुटुंबांचे मिलन; परंतु प्रेमाचे व आपुलकीचे हे नाते कधी-कधी योग्य ती चौकशी आणि काळजी न घेतल्याने मानसिक व शारीरिक छळाचे कारण होते. विवाह करताना कायदेशीर तरतुदींचे पालन न केल्याने विवाह अवैध मानला जातो व पुढे खूप अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळेच, विवाह करताना कुठली काळजी घ्यावी, कायदा (Hindu Marriage Act) काय सांगतो हे जाणून घेण्यासाठी पुढील माहिती उपयुक्त ठरेल.
भारतामध्ये अनेक जाती – धर्मांचे लोक राहत असल्यामुळे, प्रत्येक धर्माचे वेगळे विवाह (hindu wedding) कायदे इथे अस्तित्वात आहेत. हिंदू व्यक्ती हिंदू विवाह कायदा, १९५५ अथवा विशेष विवाह कायदा, १९५४ अनुसार विवाह करू शकते. हिंदू विवाह कायदा अनुसार कायदेशीर विवाह बंधनासाठी खालील गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
कायदेशीर विवाह बंधनासाठीचे निकष
कोणत्याही दोन हिंदू व्यक्ती या कायद्या अंतर्गत विवाह करू शकतात. ‘हिंदू’ या शब्दाच्या व्याखे मध्ये शीख, जैन व बौद्ध लोकांचा देखील अंतर्भाव होतो. हिंदू विवाह कायदा अनुसार अंतर-धर्मीय विवाह करता येत नाही. अंतर धर्मीय विवाह, विशेष विवाह कायदा, १९५४ अंतर्गत करता येतो.
- दोन्ही व्यक्ती विवाहाच्या वेळेस विवाहित नसाव्या, म्हणजेच त्या अविवाहित, घटस्फोटीत अथवा विधुर असाव्या.
- आपल्या जोडीदारापासून घटस्फोट घेतल्यावर अथवा त्याच्या/तिच्या मृत्युनंतर दुसरा विवाह करता येतो.
- पती व पत्नी दोघंही मानसिक रित्या विवाह करण्यास व संमती देण्यास समर्थ असणे गरजेचे आहे.
- पतीचे लग्नाच्या वेळेस वय कमीत कमी २१ व पत्नीचे कमीत कमी १८ असावे.
- पती व पत्नी हे कायद्यामध्ये दिलेल्या प्रतिबंधित नातेसंबंधांमधील नसावेत. उदा. भाऊ – बहीण, आत्ते भाऊ – मामे बहीण, मामा – भाची, आत्या – भाचा अश्या नात्यांमधील दोन व्यक्तींच्या विवाहास कायदा मान्यता देत नाही. परंतु, अशा प्रकारचा विवाह करण्याची रूढी – परंपरा संबंधित पती पत्नींच्या समुदायांमध्ये प्रचलित असेल, तर मात्र असा विवाह करता येतो.
- पती – पत्नी एकमेकांचे सपिंड नसावेत. अशा प्रकारचा विवाह देखील करण्याची रूढी – परंपरा संबंधित पती पत्नींच्या समुदायांमध्ये प्रचलित असेल, तर मात्र असा विवाह करता येतो.
- विवाह हिंदू रिती रिवाजाप्रमाणे होणे गरजेचे आहे. जर पती – पत्नी च्या कुटुंब अथवा समुदाया मध्ये सप्तपदीची पद्धत असेल, तर सप्तपदी पूर्ण केल्याशिवाय विवाह संपन्न झाल्याचे मानले जात नाही.
वरील अटीं बघून आपल्या लक्षात येईल की, हिंदू विवाह कायदा, काही बाबींमध्ये आपल्याला रूढी, परंपरा, रिती, रिवाज पाळण्याची मुभा देतो. मात्र सदर रूढी, परंपरा रिती, रिवाज हे पूर्वापार चालत आलेले व कायद्याला मान्य असणारे असावेत. तसेच ते कुठलाही खंड न पडता आजही संबंधित समुदयामध्ये पाळले जाणारे असावेत.
वर नमूद गोष्टींची पूर्तता करून संपन्न झालेला विवाह कायद्याने वैध मानला जातो.
हिंदू विवाह अवैध कधी होतो ?
विवाहासाठी आवश्यक तरतुदींची पूर्तता झाली नाही, तर विवाह अवैध मानला जातो. खालील परिस्थितींमध्ये विवाह अवैध होतो –
- पती अथवा पत्नी विवाहित असताना जर दुसरा विवाह केला असेल, तर असा दुसरा विवाह अवैध मानला जातो.
- पती-पत्नी कायद्यामध्ये दिलेल्या प्रतिबंधित नातेसंबंधांमधील असल्यास त्यांच्यामधील विवाह अवैध मानला जातो.
पती-पत्नी सपिंड असल्यास त्यांच्यामधील विवाह अवैध मानला जातो.
हिंदू विवाह रद्द बातल कधी करता येतो ?
विवाह करताना काही तरतुदींची पूर्तता न झाल्यास विवाह जरी अवैध नसला, तरी तो कोर्टातून रद्द बातल करून घेता येतो.
- विवाहाच्या वेळेस पती अथवा पत्नी मानसिक दृष्ट्या सक्षम नसल्यास.
- विवाह करताना फसवणूक करण्याच्या उद्देशाने महत्त्वाची माहिती लपवली असल्यास
- विवाह जोर – जबरदस्तीने झाला असल्यास
- पती अथवा पत्नी विवाह संबंध ठेवण्यास सक्षम नसल्यास.
- पत्नी विवाहाच्या वेळेस त्रयस्थ व्यक्ती पासून गर्भवती असल्यास व ही माहिती पतीपासून लपवली असल्यास, विवाह झाल्यापासून १ वर्षाच्या आत पती कोर्टात दावा दाखल करून विवाह रद्द बातल करून घेऊ शकतो.
वरील सर्व विवाह मुळात अवैध नसून त्याला कोर्टात अर्ज करून रद्द बातल करून घेता येते. कोर्टात दावा हा ठराविक मुदतीत करावा लागतो. (Hindu Marriage Act)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community