Street Food : मुंबईतील खाद्यपदार्थ विक्रेते महापालिकेच्या रडारवर, मुख्य टार्गेट असेल ‘हा’ भाग

मुंबईमध्ये मागील काही महिन्यांपासून खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात वाढले असून या वाढत्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याचे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

3176
Street Food : मुंबईतील खाद्यपदार्थ विक्रेते महापालिकेच्या रडारवर, मुख्य टार्गेट असेल 'हा' भाग

मुंबईत आता रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेते महापालिकेच्या रडारवर आले असून येत्या काही दिवसांमध्ये रेल्वे स्थानक परिसरांतील सर्वच खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेच्या विभागीय कार्यालयातर्फे दिवसा ही कारवाई करण्यात येणारच असून संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत परिमंडळनिहाय पथकाकडून ही कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी विभाग कार्यालयांना तसेच अतिक्रमण निर्मुलन पथकांना कारवाई करण्याचे निर्देश उपायुक्त विशेष यांनी दिले आहेत. (Street Food)

मुंबईमध्ये मागील काही महिन्यांपासून खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात वाढले असून या वाढत्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याचे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानक परिसरांतच खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल्स वाढल्याने नागरिकांसह विविध संस्थांकडून होणाऱ्या तक्रारींची दखल घेत महापालिकेने या स्टॉल्सवर कारवाई करण्याचे निर्देश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Street Food)

रेल्वे स्थानक परिसरात चायनीज पदार्थांसह शोरमा, वडापाव, शेवपुरी, डोसा, पावभाजी आदी खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. मात्र, पावसाळ्यात या उघड्यावरील खाद्यपदार्थांच्या सेवनामुळे साथीच्या आजारांचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने ही कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रत्येक विभागातील परवाना विभाग, अतिक्रमण विभाग आदींची पथके तयार करून ही कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे. (Street Food)

(हेही वाचा – Mumbai North West Lok Sabha Constituency : खासदार वायकरांनी केली पोतनीस यांच्या चौकशीची मागणी)

यासंदर्भात महापालिकेचे उपायुक्त (विशेष) किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पावसाळ्यातील साथीच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांच्या परिसरातील सर्वच खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे. खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल्स हे सायंकाळी सहानंतर लावले जातात. महापालिका कार्यालये बंद झाल्यानंतर हे स्टॉल्स लावले जात असल्याने दिवसा विभाग कार्यालयामार्फत कारवाई केली जाईल आणि सायंकाळी सहानंतर परिमंडळनिहाय पथकांमार्फत ही कारवाई केली जाईल. ज्यामुळे रात्रीच्या वेळी खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल्स लावण्यास अटकाव केला जावू शकतो. (Street Food)

शोरमा विक्रेतेही महापालिकेच्या रडारवर

शोरमा खाल्याने गोरेगाव आणि पूर्व उपनगरांतील काही भागांमध्ये विषबाधा होण्याचे प्रकार घडल्याने महापालिकेकडून शोरमा विक्रेत्यांनाही विशेष लक्ष्य केले आहे. शोरमा विक्रेत्यांकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नसून त्यासाठी वापरले जाणारे चिकन कोणत्या दर्जाचे याची माहिती मिळणे अशक्य असल्याने यापुढे शोरमा विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल, असे दिघावकर यांनी स्पष्ट केले. (Street Food)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.