राज्यात सध्या काका-पुतण्याचा दबदबा असल्याचे सातत्याने विरोधकांकडून सांगितले जात असताना आता याच काका-पुतण्यासमोर काँग्रेसचे मंत्री फक्त माना हलवत असल्याचा आरोप भाजपचा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्यांचा हा आरोप इतक्यावरच थांबला नाही, तर ते थेट आता याची तक्रार काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांच्याकडे करणार आहेत. तुमचे मंत्री सत्तेसाठी लाचार असून काका-पुतण्यांपुढे माना डोलावत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
न्यायालयाच्या निर्णयाआधीच आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी या बहुजनद्वेष्ट्या सरकारची किती लगबग चाललीये आणि सत्तेची वेसन घातलेले कॉंग्रेसचे लाचार मंत्री मात्र काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलवतायेत. मी लवकरच माननीय सोनिया गांधींना तुमचे मंत्री pic.twitter.com/ZdCsgIe1Hx
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) June 4, 2021
नेमके काय म्हणाले पडळकर?
काँग्रेसचे मंत्री लाचार आहेत. सत्तेचे वेसन बांधले गेल्याने हे लाचार मंत्री राष्ट्रवादीच्या काका-पुतण्यापुढे फक्त माना डोलावण्याचे काम करत आहेत. तुमचे मंत्री फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराने किती काम करतात हे मी सोनिया गांधींना कळवणार आहे. शरद पवार यांच्या पुढाकाराने स्थापित झालेले आघाडी सरकार किती बहुजनद्वेष्टे आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या सरकारला मराठा आरक्षणाविषयी, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी व पदोन्नतीतील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात कुठलेही पाऊल उचलण्याची घाई नाही. पण न्यायालयाच्या निर्णयाआधीच आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची लगबग उडाली आहे. यावरून या सरकारची मानसिकता दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
(हेही वाचा : “योग्य वेळी ताकद दाखवून देऊ!” संभाजी राजेंच्या या इशाऱ्यामागे दडलंय काय? )
पडळकरांची याआधीही राष्ट्रवादीवर टीका
गोपीचंद पडळकर यांनी याआधीही राष्ट्रवादी आणि विशेषत: शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. गेल्यावर्षी तर त्यांनी शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील, असे गोपीचंद पडळकर म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार निषेध करण्यात आला होता.
तर कालच त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली होती. आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’, गावागावात कोरोनाने कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, अशा परिस्थितीत कोरोनामुक्त गावांची स्पर्धा कशी भरवता, असा सवाल विचारला होता.