Gokhale Road Brige : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोखले पूल यांची जोडणी करण्यात यश; १ जुलै पासून वाहतूक खुली

2151
Gokhale Road Brige : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोखले पूल यांची जोडणी करण्यात यश; १ जुलै पासून वाहतूक खुली

अंधेरी पूर्व व पश्चिम यांना जोडणाऱ्या सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग उचलून गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या समांतर पातळीवर जुळवण्यासाठी हायड्रॉलिक जॅक आणि ‘एमएस स्टुल पॅकिंग’चा वापर करून जोडण्याचे अतिशय आव्हानात्मक काम मुंबई महानगरपालिकेद्वारे सुयोग्यप्रकारे नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. याअंतर्गत सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूलाचा भाग एका बाजुला १,३९७ मिलीमीटर आणि दुसऱ्या बाजुला ६५० मिमी वर उचलण्यात आला आहे. या जोडणीच्या कामासाठी जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असणारे सूक्ष्मस्तरीय नियोजन आणि अथक प्रयत्नांना या महत्वाच्या टप्प्यात यश आले आहे. काँक्रिट क्युरींगच्या कामानंतर आगामी १ जुलै २०२४ रोजी या दोन्ही पुलांवरील वाहतूक सुरू करण्याची तयारी महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. (Gokhale Road Brige)

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा असलेल्या गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपूल आणि सी.डी. बर्फीवाला उड्डाणपूल यांच्या जोडणीसाठीची कामे वेगाने करण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्या होत्या. तसेच ही कामे नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठीच्या सूचना अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही कामे सुरू आहेत. (Gokhale Road Brige)

दोन्ही पुलांच्या जोडणीसाठी आवश्यक असणाऱ्या स्टिचिंगच्या काँक्रिटीकरणाचे काम झाल्यानंतर त्यापुढील सलग सहा तास पाऊस न पडणे अपेक्षित व आवश्यक होते. विशेष म्हणजे हे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरात त्यापुढील १२ तासांपेक्षा अधिक कालावधीदरम्यान पाऊस न पडल्याने काँक्रिटीकरणाचे व स्टिचिंगचे काम विना अडथळा करणे शक्य झाले. त्यामुळे या कामाला निसर्गाचीही साथ लाभली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. (Gokhale Road Brige)

(हेही वाचा – Water Cut : पिसे पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड; शहर आणि पूर्व उपनगरामधील भागांमध्ये कमी दाबाने होणार पाणीपुरवठा)

असे जोडले गेले दोन उड्डाणपूल!

सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल एका बाजुला १,३९७ मिलीमीटर व दुसऱ्या बाजुला ६५० मिलीमीटर वरच्या दिशेने उचलण्यासाठी ‘हायड्रॉलिक जॅक’ आणि ‘एमएस स्टुल पॅकिंग’चा वापर करण्यात आला. त्याचबरोबर सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाखाली पेडेस्टल (आधार देणारे खांब) वापरण्यात आले आहेत. एकूण दोन पेडस्टलचा आधार देत जोडणी करावयाचा भाग हा १,३९७ मिमी या उड्डाणपुलाचा गर्डर वर उचलण्यात आला आहे. त्यासोबतच सहा नवीन बेअरींगही त्या साच्यात बसविण्यात आल्या. पेडस्टलला देण्यात आलेले ‘बोल्ट’ हे सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूलाच्या पिलरशी जुळणे हे अतिशय महत्त्वाचे आव्हान होते. अवघ्या २ मिमी जागेच्या अंतरामध्ये अतिशय अचुकपणे हे दोन्ही पेडेस्टल जुळवण्याचे आव्हान पूल विभागाचे अभियंता आणि सल्लागारांच्या तांत्रिक चमुने अतिशय नियोजनबद्धरीत्या व शास्त्रशुद्ध पद्धतीने जुळवून आणले. वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हिजेटीआय), आय.आय.टी. आणि स्ट्रक्ट्रॉनिक्स कन्सलटिंग इंजिनिअर्स या तांत्रिक सल्लागारांच्या देखरेखीखाली हे आव्हानात्मक काम पार पाडण्यात आले. (Gokhale Road Brige)

सी. डी. बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोखले उड्डाणपूल यांचे एकमेकांना जोडले जाणारे गर्डर जुळवण्यासाठी काँक्रिटिंगचे काम हे पावसाने उघडीप दिल्याच्या काळात करणे आवश्यक होते. तसेच सदर काम झाल्यानंतर सुमारे सहा तास पाऊस न येणे गरजेचे होते. ही बाब लक्षात घेऊन व सदर सहा तासांच्या काळात पाऊस आल्यास पर्जन्यरोधक शेडची विशेष व्यवस्थाही सदर ठिकाणी करण्यात आली होती. मात्र, सुर्देवाने या सहा तासांच्या कालावधीदरम्यानच नव्हे, तर त्यानंतरदेखील सुमारे १२ तास पाऊस आला नाही. परिणामी महानगरपालिकेच्या या कार्याला निसर्गानेदेखील साथ दिली. (Gokhale Road Brige)

गोखले पुलाला बर्फीवाला पुलाचा भाग जोडण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकीनुसार स्टिचिंग व काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. याअंतर्गत करण्यात आलेल्या स्टिचिंग दरम्यान दोन्ही ब्रीजची लोखंडी सळई ही तांत्रिक सल्लागाराने सुचवलेल्या संरचनेप्रमाणे ‘वेल्डिंग’ करण्यात आली आहे. याठिकाणी काँक्रिट भरण्याचे काम आता पूर्ण झाले आहे. यानंतर सुमारे १४ दिवसांचा कालावधी हा क्युरींगसाठी लागणे अपेक्षित आहे. वेगाने कॉंंक्रिटीकरणाचे काम पूर्ण व्हावे यासाठी उच्च दर्जाचे कॉंंक्रिट या कामासाठी वापरण्यात आले आहे. या कामानंतर पूलावर २४ तासांच्या कालावधीत ‘लोड टेस्ट’ करण्यात येईल. त्यासोबतचा पुलाच्या जोडणी सांध्याचे कामही लवकरच पूर्ण होणे अपेक्षित आहे. यानंतर पुलांवर वाहतूक सुरू होण्याच्या दृष्टीने आवश्यक ते कार्य यापूर्वी निर्धारित करण्यात आलेल्या टप्प्यांनुसार करण्यात येईल, असेही पूल विभागाद्वारे कळविण्यात आले आहे. (Gokhale Road Brige)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.