मुंबई महापालिकेच्या १२ रुग्णालयांमध्ये १६ ते १७ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु हे काम अत्यंत तातडीचे असल्याने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लघु निविदा काढूनही मे महिना उलटून गेला आणि जूनचा पहिला आठवडा होत आला, तरी याबाबत कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही. त्यामुळे ऑक्सिजन प्लांटची गरज किती आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच दुसऱ्या लाटेत तर प्रकल्प कार्यान्वित झाले नाहीत, किमान तिसऱ्या लाटेतील रुग्णांना तरी याचा लाभ मिळणार की केवळ कंत्राटदारांच्या तिजोरी भरण्याकरताच हा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, असा प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे हेच काय ते मुंबई पॅटर्न असाही सवाल उपस्थित होत आहे.
प्रशासन वाटाघाटीत
कोविड १९ मुळे रुग्णसंख्येत झालेल्या वाढीनंतर मुख्यत्वाने ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत प्रचंड अडचणी येत आहेत. त्यामुळे यावर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून एकूण १२ रुग्णालयांमध्ये मिळून, १६ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. यामध्ये वातावरणातील हवेतून ऑक्सिजन निर्माण करुन, तो रुग्णांना पुरवण्यात येणार आहे. या सर्व १६ प्रकल्पांमधून दररोज एकूण ४३ मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा निर्माण करण्यासाठी, मेच्या पहिल्या आठवड्यात निविदा मागवली. ही कार्यवाही अत्यंत तातडीने करण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सहा दिवसांचा कालावधी निश्चित केला. पण त्यानंतर पुढील पाच ते सहा दिवसांमध्ये म्हणजे १५ मे पूर्वी याची कार्यवाही पूर्ण होऊन कार्यादेश देणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात आजही प्रशासन वाटाघाटीतच अकडून पडलेले आहे. त्यामुळे प्रशासनाला नेमकी तातडी कशात आहे, हाच प्रश्न निर्माण होत आहे.
(हेही वाचाः १२ रुग्णालयांत १६ ऑक्सिजन प्लांट : निविदेत नाही तेवढा छाननीत जातोय वेळ!)
प्रकल्पाच्या आडून कुठली समीकरणे?
या कामांसाठी एकमेव हाय वे कंपनी ही पात्र ठरलेली असून, त्यांचा हा प्रस्ताव तातडीने मंजुरीला पाठवून त्यांच्याकडून नियोजित एक महिन्यांच्या कालावधीत हा प्रकल्प उभारुन घेणे आवश्यक आहे. परंतु आजही प्रशासन वाटाघाटीच्या नावावर वेळकाढूपणा करत, या कंत्राटदाराला अधिक कालावधी कशाप्रकारे मिळू शकतो यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पात्र कंपनीचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर झाल्यानंतर, त्यांना कार्यादेश दिला जाईल.परंतु कार्यादेश दिल्यांनतर पुढील पंधरा दिवसांमध्ये यासाठी आवश्यक लागणारी प्रकल्प उभारण्याची सामग्री उपलब्ध होऊ शकते. परंतु प्रशासन ज्याप्रकारे याला विलंब करते यावरुन ऑक्सिजन प्रकल्पाच्या आडून वेगळीच समीकरणे आखली जात असल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचाः आता पेंग्विन कंत्राटदार उभारणार मुंबईतील ऑक्सिजन प्लांट!)
प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी सध्या आपली शक्ती या एकमेव कंपनीला काम मिळवून देण्यासाठी लावत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या या प्रयत्नांना यश येऊन लवकरच तिसऱ्या लाटेपूर्वी हे प्रकल्प कार्यान्वित होऊन रुग्णांना फायदा मिळो, अशाच प्रतिक्रिया राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून व्यक्त होताना दिसत आहेत.
Join Our WhatsApp Community