विमानतळाच्या धावपट्टीसंदर्भात (Airport Runways) अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा ओएलएस (ऑब्स्टॅकल लिमिटेशन सरफेस) सर्व्हे आता पुणे विमानतळासाठी होण्याची शक्यता आहे; कारण नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे मागणी केली आहे. या संदर्भात सोमवारी (ता. २४) मोहोळ राजनाथ सिंह यांची भेट घेऊन धावपट्टी वाढविण्यासंदर्भात चर्चा करणार आहेत.
पुणे विमानतळाच्या धावपट्टीची लांबी आणि रुंदी वाढविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. नुकतेच राज्य सरकारने धावपट्टी वाढविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सद्यस्थितीत धावपट्टीची लांबी २ हजार ५३५ मीटर (८,३१६ फूट) इतकी आहे; तर रुंदी ४५ मीटर आहे. धावपट्टीच्या पूर्वेला ५०० मीटर व पश्चिमेला ३०० मीटर जागेची आवश्यकता आहे. सुमारे ८०० मीटरने धावपट्टी वाढली; तर लांबी सुमारे १० हजार ९४० फूट इतकी होणार आहे. सुमारे ११ हजार फूट धावपट्टी झाल्यास मोठे विमानही पुणे विमानतळावर उतरू शकतील. जागेच्या संपादनासाठी सुमारे १६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
(हेही वाचा – T20 World Cup, Ind vs Afg : अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव करत भारताची सुपर ८ मध्ये दणक्यात सुरुवात )
अपघातग्रस्त विमान हवाई दलाच्या जागेत ठेवण्याची मागणी
दरम्यान, विमानतळाच्या ‘पार्किंग बे क्रमांक-१’वर गेल्या महिन्यापासून एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान बंद अवस्थेत आहे. त्याचा फटका अन्य प्रवासी विमानांना बसला आहे. विमानतळावर उतरणाऱ्या विमानांना उशीर होत आहे. या प्रश्नासंदर्भातही मोहोळ चर्चा करणार आहेत. अपघातग्रस्त विमान हवाई दलाच्या जागेत ठेवण्याची मागणी ते करणार आहेत.
धावपट्टीचे ओएलएस सर्व्हे होणे आवश्यक
पुणे विमानतळाची धावपट्टी वाढल्यावर मोठ्या विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग होईल. परिणामी पुण्याहून अमेरिका, युरोपसारख्या देशात विमानसेवा सुरू होऊ शकते. त्याकरिता धावपट्टीचे ‘ओएलएस’ सर्व्हे होणे गरजेचे आहे, असे नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले.
‘ओएलएस’ सर्व्हे म्हणजे काय?
‘ओएलएस’ म्हणजे ‘ऑब्स्टॅकल लिमिटेशन सरफेस सर्व्हे’ विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग सुरक्षितपणे होण्यासाठी सर्व्हे केला जातो. हा प्राथमिक स्तराचा सर्व्हे आहे. धावपट्टी वाढविताना अथवा नवी धावपट्टी तयार करताना सर्व्हे केला जातो. यात प्रामुख्याने विमानतळाच्या परिसरात असलेल्या इमारती, टेकडी, उंच झाडे याचा विचार केला जातो. विमानाच्या टेक ऑफ आणि लँडिंगला काही अडथळा ठरू शकतो का? याची पडताळणी केली जाते. जर कोणताही अडथळा नसेल, तर विमानसेवेला मंजुरी दिली जाते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community