OBC Meeting : ओबीसी नेत्यांची सरकारसोबत बैठक; भुजबळ आक्रमक, म्हणाले…

173
OBC Meeting : ओबीसी नेत्यांची सरकारसोबत बैठक; भुजबळ आक्रमक, म्हणाले...
OBC Meeting : ओबीसी नेत्यांची सरकारसोबत बैठक; भुजबळ आक्रमक, म्हणाले...

महाराष्ट्रातील ओबीसी (OBC Meeting) समाजाच्या प्रमुख 10 नेत्यांची शुक्रवारी राज्य सरकारसोबत महत्त्वाची बैठक झाली. मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथे ही बैठक झाली. या बैठकीतील इनसाईड स्टोरी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या बैठकीत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा चांगलाच पारा चढला. मराठा समाजाच्या अनेक नागरिकांना खोट्या नोंदींच्या आधारावर ओबीसी जात प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप या नेत्यांनी केला. ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांची भूमिका मांडण्यासाठी मृणाल ढोले पाटील हे देखील या बैठकीत उपस्थित होते. त्यांनीदेखील आपली भूमिका मांडली. सगेसोयरे अध्यादेश रद्द करा, अशी मोठी मागणी त्यांनी केली. तसेच दिलेल्या कुणबी नोंदींवर श्वेतपत्रिका काढा, अशी देखील मागणी त्यांनी केली. (OBC Meeting)

प्रकाश शेंडगे काय म्हणाले?

या बैठकीत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे हे चांगलेच आक्रमक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. “सगेसोयरेंचा अध्यादेश रद्द करा. ओबीसीतून आरक्षण देऊ नका. सगेसोयरेंच्या मुद्द्यावर 8 लाख हरकती आल्या आहेत. सरकारचा हरकतींवर आतापर्यंत निर्णय का आला नाही? मराठ्यांना दिलेल्या कुणबी नोंदी बोगस आणि खोट्या आहेत. प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने तात्काळ नोंदी थांबवा. सगेसोयऱ्यांवर 27 तारखेला सुनावणी आहे. तोपर्यंत नोंदी थांबवा”, अशी भूमिका प्रकाश शेंडगे यांनी मांडली. (OBC Meeting)

छगन भुजबळ काय म्हणाले?

या बैठकीत छगन भुजबळ यांचादेखील चांगलाच पारा चढल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. “सगेसोयरेंवर आलेल्या हरकतींवर सरकारने काय केलं ते सांगा. 8 लाखांहून अधिक हरकती आल्या. त्यापुढे काय झालं? जातीचे खोटे दाखले दिले जात आहेत. त्यावर कारवाई करा. खोट्या नोंदी दाखवून खोटे दाखले दिले जात असतील तर कारवाई करा. दिशाभूल केली जात आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध नाही, मात्र दुसऱ्यांवर अन्याय नको. सरसकट दाखले दिले तर सगळे मराठा कुणबी होतील. त्यामुळे ओबीसींवर अन्याय होईल. खोटी वंशावळ दाखवून कुणबी दाखले दिले जात आहेत”, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला. (OBC Meeting)

हाकेंचे प्रतिनिधी काय म्हणाले?

लक्ष्मण हाके यांचे प्रतिनिधी मृणाल ढोले पाटील यांनी बैठकीत भूमिका मांडली. “सगेसोयरे अध्यादेश रद्द करा”, अशी मागणी त्यांनी केली. तसेच “दिलेल्या कुणबी नोंदींवर श्वेतपत्रिका काढा”, अशी मागणी लक्ष्मण हाकेंच्या प्रतिनिधी मृणाल ढोले पाटील यांनी केली. “ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका. नोदीं या आधारकार्ड आणि पॅनकार्डशी लिंक करा”, अशी देखील मागणी मृणाल ढोले पाटील यांनी बैठकीत केली. (OBC Meeting)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.