राज्यात पसरतेय म्युकरमायकोसीसचे ‘काळे’ जाळे… वाढतोय रुग्णांचा आकडा

त्यामुळे या आजाराकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे.

115

राज्यात लॉकडाऊनमुळे एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना, दुसरीकडे म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या मात्र वाढत आहे. राज्यात आतापर्यंत 6 हजारपेक्षा जास्त लोकांना या आजाराची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राज्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब असल्याचे बोलले जात आहे.

तब्बल 503 रुग्णांचा मृत्यू

महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 6003 म्युकरमायकोसीसचे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 4 हजार 24 रुग्ण सक्रीय असून त्यांच्यावर विवध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 1 हजार 450 रुग्णांनी या आजारावर मात केली असून, एकूण 503 रुग्णांना यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे या आजाराकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे.

(हेही वाचाः म्युकरमायकोसिसवरील उपचाराचे किती आहेत दर? वाचा… )

राज्य सरकारकडून उपचारांसाठी दर निश्चित

राज्यात म्युकरमायकोसीसच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता त्यावरील उपचारासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. दर निश्चित करताना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून, निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत.

३१ जुलैपर्यंत लागू असणार दर

महात्मा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयातून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत. खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसीसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात आरोग्य मंत्री टोपे यांनी उपचाराबाबात खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली असून, ही अधिसूचना ३१ जुलै २०२१ पर्यंत राज्यभर लागू राहील. तसेच या दरांशिवाय जास्त दर आकारणा-या खासगी रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.