बेकायदेशीर बोर्डिंग सुविधा म्हणून वापरल्या जाणाऱ्या डंप यार्डमध्ये काल एका छाप्यात आठ कुत्री अत्यंत वाईट अवस्थेत आढळून आली. पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (PETA) इंडिया संस्थेच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी डंप यार्ड येथे बंदिस्त ठेवण्यात आलेल्या आठ कुत्र्यांची सुटका केली. या कुत्र्यांना आता रायगडमधील कलोटे ॲनिमल ट्रस्ट आणि ठाण्यातील सिटिझन्स फॉर ॲनिमल प्रोटेक्शन फाऊंडेशनकडे ठेवण्यात आले आहेत.
अन्न-पाण्याशिवाय राहत होते कुत्रे
‘गार्ड’ म्हणून हे कुत्रे भाड्याने देण्यात येत होते. हे कुत्रे वायुविजन नसलेल्या बंद खोलीत ठेवण्यात आले होते. त्यातील काही कुत्रे छोट्या दोरीला बांधून ठेवण्यात आले होते. या कुत्र्यांना पुरेसे अन्न किंवा पाणीही उपलब्ध करून देण्यात आले नव्हते. या ठिकाणी अतिशय अस्वच्छता होती. विशेष म्हणजे या कुत्र्यांची देखरेख करण्यासाठी त्यांचा मालकही उपस्थित नव्हता. त्यामुळे याठिकाणी एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा NIA: दाऊद टोळीच्या आरिफ भाईजानचा जे.जे. रुग्णालयात मृत्यू , तुरुंगातच आला हार्ड अॅटॅक; वाचा पुढे काय झालं…)
PETA च्या तक्रारीनंतर पोलीस कारवाई
PETA India ने येथील कुत्र्यांना चोवीस तास बांधून ठेवून त्यांच्याप्रती क्रूरतेची वागणूक दिल्याबद्दल तसेच मूलभूत गरजा असलेल्या अन्न, निवारा आणि स्वच्छता उपलब्ध करून देण्यात कुचराई केल्याबद्दल मालकाच्या विरोधात नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर मालकाने स्वेच्छेने कुत्र्यांना PETA इंडियाकडे सुपूर्द केले, जेणेकरून या कुत्र्यांचे पुनर्वसन होण्यापूर्वी त्यांना पशुवैद्यकीय विभागाकडून उपचारही मिळू शकतील.
PETA इंडिया क्रुएल्टी रिस्पॉन्स कोऑर्डिनेटर सलोनी साकारिया म्हणतात, प्राण्यांवरील क्रूरता खपवून घेतली जाणार नाही, या कुत्र्यांवर किती मानसिक आघात आणि शारीरिक छळ सहन करावा लागला असेल याची कल्पना करणे कठीण आहे. आम्ही पोलिसांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानतो. सध्या सुरक्षा व्यवस्थेतही आलेले आधुनिक तंत्रज्ञान, त्यायोगे निर्माण झालेल्या तांत्रिक यंत्रणा पाहता आता कुत्र्यांना विविध ठिकाणी पाळत ठेवण्यासाठी ‘गार्ड’ म्हणून वापरण्याची आवश्यकता नाही. यासाठी वापरण्यात येणाऱ्या कुत्र्यांकडे अनेकदा दुर्लक्ष होते, त्यांच्यावर अत्याचार होतात. त्यांना दीर्घ कालावधीसाठी एकटे सोडले जाते. लहान दोरीने बांधून ठेवले जाते. ‘गार्ड’ म्हणून वापरण्यात येणाऱ्या कुत्र्यांना सहसा पुरेसे प्रशिक्षण दिलेले नसते. ज्यामुळे त्यांच्या वर्तणुकीत अनेकदा विविध समस्या उद्भवतात. त्यांना योग्य पशुवैद्यकीय उपचार दिले जात नाही, पुरेसे अन्न दिले जात नाही. कुत्रे हे प्राणी आहेत, सुरक्षा साधने नाहीत. त्यांच्यामध्ये भाव भावना असतात त्यामुळे ते प्रेमळपणे मानवी कुटुंबांमध्ये राहू शकतात, अशी भूमिका PETA ने मांडली.
Join Our WhatsApp Community