नव्या सरकारचे लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवार, (२४जून)पासून सुरू होत आहे. लोकसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होईल. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री खासदार म्हणून शपथ घेतील. प्रोटेम स्पीकर भर्तृहरी महताब त्यांना शपथ देतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी शपथ घेणार आहेत. त्यानंतर मंत्री परिषदेचे इतर सदस्य खासदार म्हणून शपथ घेतील. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २८० नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील. दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ जून रोजी २६४ नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील. त्यानंतर २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
(हेही वाचा – PM Narendra Modi : ‘टीम मेलोडी’पासून सावधान!)
संसदेच्या या अधिवेशनात शून्य तास आणि प्रश्नोत्तराचा तास असणार नाही. या अधिवेशनात नीटच्या पेपरमधील अनियमितता, नेट परीक्षा रद्द होणे, पेपर फुटणे आदी मुद्द्यांवर विरोधकांकडून चर्चा होऊ शकते.
विरोधी पक्षनेत्याचा समावेश
यावेळी पहिल्यांदाच नरेंद्र मोदींसमोर विरोधी पक्षनेता असेल. सभागृहातील विरोधी पक्षनेत्याचा दर्जा सभागृह नेत्याइतकाच असतो. निवडणूक आयुक्तांसह अनेक महत्त्वाच्या नियुक्ती समित्यांमध्ये विरोधी पक्षनेत्याचा समावेश असतो. गेल्या दोन टर्ममध्ये नरेंद्र मोदींसमोर विरोधी पक्षनेता नव्हता.
नव्या सरकारच्या कामाची रूपरेषा
मिळालेल्या माहितीनुसार, या अधिवेशनाच्या पहिल्या ३ दिवसांत नवनिर्वाचित सदस्य शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. नव्या सरकारच्या ५ वर्षांच्या कामाची रूपरेषाही त्या सादर करणार आहेत. २७ जून रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान मोदी संसदेत त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांची ओळख करून देणार असल्याचं समजतं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान आक्रमक विरोधक विविध मुद्द्यांवर एनडीए सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू शकतात. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर संसदेच्या दोन्ही सभागृहात झालेल्या चर्चेला पंतप्रधान उत्तर देतील.
मंत्र्यांमध्ये राजनाथ सिंह सर्वात आधी शपथ घेणार
पॅनेल सदस्यांच्या शपथविधीनंतर कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी सुरू होईल. राजनाथ सिंह सर्वात आधी शपथ घेणार आहेत. त्यानंतर अमित शहा, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान आणि मनोहर लाल खट्टर आणि इतर कॅबिनेट मंत्री अनुक्रमे शपथ घेतील. कॅबिनेट मंत्र्यांनंतर राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि त्यानंतर राज्यमंत्री शपथ घेतील. मंत्र्यांच्या शपथेनंतर राज्यांचे खासदारांचा शपथविधी पार पडेल. सर्वात आधी, अंदमान आणि निकोबारचे खासदार विष्णू पद रे यांना शपथ दिली जाईल, त्यानंतर आंध्र प्रदेश, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार आणि इतर राज्यांच्या खासदारांना क्रमानुसार शपथ दिली जाईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community