दुसऱ्या लाटेत उसंती मिळताच कोविड सेंटरची डागडुजी सुरु!

सध्या रुग्ण संख्या घटल्याने कोविड सेंटरची डागडुजी सुरु झाली असून पुढील १५ ते २० दिवसांमध्ये ते पुन्हा नव्या क्षमतेने सुरु होणार आहे.

120

मुंबई महापालिकेच्यावतीने कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या जंबो कोविड सेंटरची तोक्ते चक्रीवादळामुळे नासधूस झाली आहे. त्यामुळे सध्या कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोविड सेंटर बंद करून त्यांची डागडुजी करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यामध्ये प्रत्येक कोविड सेंटरची क्षमता वाढवण्याकडे भर दिला जात आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटरची दर्जोन्नती करण्यात येत असून याअंतर्गत विद्युत केबल्ससह ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची क्षमता वाढवणे तसेच आयसीयू बेडची क्षमताही वाढवण्यावर महापालिकेच्यावतीने भर दिला जात आहे.

६ रुग्णालयांमध्ये ८९ हजार २०६ रुग्णांवर उपचार!

‘कोविड – १९’ या संसर्गजन्य साथरोगाचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी सन २०२० मध्ये कोविडच्या सुरुवातीच्या काळात कोविड बाधित रुग्णांना रुग्णालयात ‘बेड’ मिळण्यात अडचणी येत असल्याने रुग्णालयांची क्षमता वाढविणे गरजेचे होते. मात्र, अत्यंत कमी कालावधीत नवीन रुग्णालय बांधून रुग्णशय्या अर्थात बेडची संख्या वाढविणे अशक्‍यच होते. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने उपलब्ध असलेल्या जागांचा उपयोग करून तात्पूरत्या स्वरूपातील कोविड समर्पित भव्य रुग्णालये म्हणजेच ‘जंबो कोविड रुग्णालय’ उभारण्याचा निर्णय घेतला. यानुसार पहिले रुग्णालय वरळी परिसरातील राष्ट्रीय क्रीडा संकुलामध्ये (एन.एस.सी.आय.) कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुल, गोरेगाव, भायखळा, मुलुंड आणि दहिसर या ठिकाणी देखील तात्पूरत्या स्वरूपातील कोविड समर्पित रुग्णालये कार्यान्वित करण्यात आली. या एकूण ८ हजार ९१५ खाटांच्या या ६ रुग्णालयांमध्ये आतापर्यंत तब्बल ८९ हजार २०६ रुग्णांवर परिणामकारक वैद्यकीय उपचार करण्यात आले. यासाठी १ हजार १५७ डॉक्टर्स, १ हजार १३७ परिचारिका, १ हजार १८० वॉर्डबॉय यांच्यासह साधारणपणे ४ हजार ६५८ इतके मनुष्यबळ कार्यरत आहे.

(हेही वाचा : झाडे पडण्यामागे वादळे निमित्त, वृक्ष रोपणाची पद्धत चुकीची!)

रुग्णसंख्या कमी झाल्याने नुतनीकरणाला सुरुवात!

मात्र, आता मुंबईमध्ये कोविड रुग्णांची संख्या कमी होत असून सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यातच तोक्ते चक्रीवादळामुळे काही जंबो कोविड सेंटरची वाट लागली आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कोविड सेंटरच्या काही भागांचे नुतनीकरण करण्यात येत आहे. यामध्ये दहिसर कांदरपाडा आणि दहिसर जकात नाका येथील कोविड सेंटरमधील काही भाग बंद करण्यात आला आहे. याप्रमाणेच बीकेसी तसेच नेस्कोच्या कोविड सेंटरचे नुतनीकरण करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

कोविड सेंटर १५ ते २० दिवसांत नव्या क्षमतेने सुरु होणार!

मुंबईतील पहिला कोविड सेंटर असलेल्या वरळीतील राष्ट्रीय क्रीडा संकुलातील कोविड सेंटर हे आता रिलायन्स यांना चालवण्यात दिले जात आहे. त्यामुळे त्याठिकाणी त्यांनी आयसीयू संख्या वाढवण्याच्या दृष्टीकोनातून नुतनीकरणाचे काम हाती घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सध्या काही प्रमाणात बंद असलेले कोविड सेंटर पुढील १५ ते २० दिवसांमध्ये पुन्हा नव्या क्षमतेने सुरु होणार असून तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना या सेंटरची क्षमताही अधिक वाढवण्यात आल्याने रुग्णांवर उपचार करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.