‘श्री शिवराज्याभिषेक दिन’ हा हिंदुस्थानच्या इतिहासातील एक सुवर्ण दिन असून तो तुम्हा-आम्हा हिंदू देशवासियांसाठी उत्सव आणि सणच म्हणावा लागेल. समितीतर्फे गेली २६ वर्षे महाराष्ट्रातील हजारो शिवभक्त ‘ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी’ या तिथीला किल्ले रायगडावर हा सोहळा ‘हिंदवी स्वराज दिन’ म्हणून साजरा करीत आहेत. मात्र छत्रपति श्री शिवाजी महाराजांच्या ‘शिवराज्याभिषेक’ दिनाचे औचित्य साधून, या वर्षापासून, इंग्रजी तारखेप्रमाणे ६ जून हा दिवस ‘शिव स्वराज्य दिन’ म्हणून साजरा करावा. राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर गुढी उभारून साजरा होण्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभागातर्फे जाहीर केले गेले आहे. परंतु ‘शिव स्वराज्य दिन’ हा या इंग्रजीतारखे ऐवजी स्वतः छत्रपति शिवाजी महाराजांनी निवडलेल्या हिंदू तिथीप्रमाणे ‘ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी’ या दिवशी साजरा करावा, अशी मागणी ‘श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड’च्या वतीने करण्यात आली आहे.
शिवकाळात इंग्रजी कॅलेंडर नव्हते!
याबाबत अधिक माहिती देताना समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले कि, त्या काळी महाराष्ट्रामध्ये इंग्रजी कॅलेंडरच अस्तित्वात नव्हते. सर्व व्यवहार हे तिथीनुसारच होत असत. ‘ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी’ ह्या शुभ मुहूर्तावर छत्रपति श्री शिवरायांनी आपला शिवराज्याभिषेक करून घेतला. या तिथीचे अनेक संदर्भ ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहेत. शिवराज्याभिषेकाचे औचित्य साधून छत्रपति शिवाजी महाराजांनी हिंदू तिथी कालगणनेप्रमाणे “श्री शिवराज्याभिषेक शक” सुरु केले. जे कधीही तारखेला सुरु होऊ शकत नाही. आजही हिंदुस्थानातील सर्वच प्रमुख सण गुढीपाडवा, दसरा, दिवाळी हे हिंदू तिथीने साजरे केले जातात. तसेच महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी ह्या सुद्धा तिथीप्रमाणेच साजऱ्या केल्या जातात. छत्रपति शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांची जयंती आणि राज्याभिषेक सोहळा हे तिथीप्रमाणेच साजरे व्हायला हवेत. ज्या शिवरायांनी सदैव परकीय इंग्रजांविरोधात युद्ध करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्याच राजाचा राज्याभिषेक सोहळा हा इंग्रजी तारखेनुसार व्हावा यापेक्षा दु:खद गोष्ट ती कोणती. इंग्रजी तारखेनुसार राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी ‘शिव स्वराज्य दिन’ साजरा करणे म्हणजे हिंदू तिथींचे महत्व कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही शंका त्यांनी उपस्थित केली.
(हेही वाचा : धक्कादायक! केरळमध्ये लसीकरणासाठी मुसलमानांना ‘फ्रंट लाईन वर्कर’ घोषित!)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली!
त्यामुळे ऐतिहासिक संदर्भाचा आधार असलेल्या ‘ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी’ याच शुभ मुहूर्तावर ‘शिव स्वराज्य दिन’ साजरा व्हावा, अशी महाराष्ट्रातील अनेक शिवप्रेमी संघटना, दुर्गसंवर्धक संघटना, इतिहासप्रेमी व इतिहास अभ्यासकांची मागणी आहे. स्वतः हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे छत्रपतींचा शिवराज्याभिषेक हा तिथीलाच व्हावा, याचे ठाम पुरस्कर्ते होते. परंतु या सरकारने त्यांच्या विचारांना सुद्धा पायदळी तुडवले, असे सुनील पवार म्हणाले. त्यामुळे उपरोक्त सर्व बाबींचा विचार करता सरकारने ‘शिव स्वराज्य दिन’ इंग्रजी ६ जून तारखेला न करता हा ‘ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी’ या शुभ मुहूर्तावरच साजरा करावा, अशी मागणी सुनील पवार यांनी हिंदुस्थानातील समस्त हिंदू आणि शिवप्रेमी संघटनांच्यावतीने केली आहे.
Join Our WhatsApp Community