हार्बर मार्गावरील (Harbor Local) प्रवाशांचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. मध्य रेल्वेने (Mumbai Local) टिळकनगर ते पनवेलदरम्यान लोकल फेऱ्यांच्या वेगवाढीला मंजुरी दिली आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल प्रवास ७६ मिनिटांत होणार आहे, तर सीएसएमटी ते बेलापूर प्रवासाला ६१ मिनिटे लागणार आहेत. सध्याच्या तुलनेत प्रवाशांची तीन ते चार मिनिटे वाचणार आहेत. (Mumbai Local)
लोकलची वेगमर्यादा १०५ किमी प्रतितास करण्याचा प्रस्ताव
टिळकनगर ते पनवेलदरम्यान लोकल फेऱ्यांचा वेग वाढवण्यासाठी रुळांचे बळकटीकरण आणि ओव्हर हेड वायर यंत्रणेच्या सुधारणेसह अन्य यांत्रिक कामे करण्यात आली होती. रेल्वेच्या जमिनीवरील काही अनधिकृत बांधकामे हटवण्याचे कामही रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले होते. ही कामे पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर चाचणी घेऊन लोकलची वेगमर्यादा १०५ किमी प्रतितास करण्याचा प्रस्ताव मुंबई विभागाकडून मध्य रेल्वे मुख्यालयाला पाठवला होता. त्यानुसार हार्बर मार्गावरील टिळकनगर ते वडाळा रोडदरम्यान रुळांलगत वसलेली झोपडपट्टी, चुनाभट्टी-कुर्ल्यादरम्यान असलेले रेल्वे फाटक यांमुळे प्रवासी सुरक्षिततेच्या कारणास्तव ताशी ९५ किमी वेगाने लोकल चालवण्याची मुभा देण्यात आली आहे. सध्या हार्बरवरील लोकल फेऱ्या ताशी ८० किमी वेगाने धावत आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Mumbai Local)
रूळ ओलांडण्याच्या सर्वाधिक घटनांची नोंद
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून सीएसएमटी ते पनवेलदरम्यान रोज १८८ आणि सीएसएमटी ते बेलापूरदरम्यान रोज ७९ लोकल फेऱ्या धावतात. सीएसएमटी ते टिळकनगरदरम्यान रेल्वे स्थानकांतील अंतर कमी आहे. यामुळे या स्थानकांदरम्यान वेग वाढवण्यात आलेला नाही. तसेच रेल्वे पोलिसांच्या आकडेवारीनुसार, कुर्ला ते टिळकनगरदरम्यान रूळ ओलांडण्याच्या सर्वाधिक घटनांची नोंद आहे. यामुळे या स्थानकांदरम्यान वेग वाढवण्यात आलेला नाही, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Mumbai Local)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community