T20 World Cup, Afg vs SA : ‘पहिल्या उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानलाच फायदा’ – जोनाथन ट्रॉट

T20 World Cup, Afg vs SA : अफगाणिस्तानच्या उपांत्य सामन्यापूर्वी संघाचे प्रशिक्षक प्रचंड आशावादी आहेत.

167
T20 World Cup, Afg vs SA : ‘पहिल्या उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानलाच फायदा’ - जोनाथन ट्रॉट
  • ऋजुता लुकतुके

टी-२० विश्वचषकातील (T20 World Cup) पहिला उपांत्य सामना गुरुवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी सहा वाजता अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान रंगणार आहे. अफगाणिस्तानने पहिल्यांदाच एखाद्या आयसीसी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. पण, हीच गोष्ट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी इंग्लिश खेळाडू जोनाथन ट्रॉट यांना फायद्याची वाटते. ‘घाबरायचं नाही,’ असा मंत्र त्यांनी संघाला दिला आहे आणि त्या जोरावर अफगाणिस्तान संघच सामन्याच्या सुरुवातीला फायद्यात असेल असं त्यांना वाटतंय. (T20 World Cup, Afg vs SA)

‘अफगाणिस्तानची पाटी कोरी आहे. त्यांच्यावर कुठलंही ऐतिहासिक ओझं नाही. गतलौकिक नाही. अशावेळी दडपण आफ्रिकन संघावर असेल. ते आतापर्यंत मोठ्या स्पर्धेत चोकर्स ठरले आहेत. त्यांनीही कधी अंतिम फेरी गाठलेली नाही. सामन्याच्या सुरुवातीला असे सगळे नकारात्मक विचार त्यांच्या डोक्यात असतील,’ असं ट्रॉट यांनी बोलून दाखवलं आहे. (T20 World Cup, Afg vs SA)

अफगाणिस्तान उपांत्य फेरीत उतरेल, तेव्हा त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नसेल, असं ट्रॉट यांना वाटतं. कागदावर तर आफ्रिकन संघ अनुभवी आणि मजबूत आहेच. शिवाय अफगाणिस्तान विरुद्धची संघाची कामगिरीही आतापर्यंत तगडी आहे. २०१० आणि २०१६ च्या विश्वचषकात आफ्रिकन संघाने अफगाणिस्तानला सहज नमवलंय. यंदाच्या विश्वचषकातही दक्षिण आफ्रिकन संघ सुपर ८ चे तीनही सामने जिंकून अव्वल आलाय. पण, तरीही त्यांची विश्वचषक मोहीम सोपी नव्हती. (T20 World Cup, Afg vs SA)

(हेही वाचा – मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या Jayakwadi Damची ड्रोनने रेकी!)

सगळे सातही सामने त्यांनी जिंकले असले तरी गटवार साखळीत नेदरलँड्स, बांगलादेश आणि अगदी नेपाळनेही त्यांना जेरीला आणलं होतं. तर सुपर ८ मध्ये इंग्लंड विरुद्धचा विजयही निसटता होता. त्यामुळे आफ्रिकन संघही नाही म्हटलं तरी स्पर्धेत अडखळतोय. उलट अफगाणिस्तानचा संघ गटवार साखळीतही नवखाच समजला जात होता. न्यूझीलंडला गटात नमवल्यामुळे त्यांना सुपर ८ मध्ये प्रवेश करता आला. पण, मोठ्या संघांना मोक्याच्या क्षणी हरवून त्यांनी ‘जायंट किलर्स’ अशी ओळख मिळवली आहे. सुपर ८ मध्येही ऑस्ट्रेलियाला हरवलं आणि आता उपांत्य लढतीत आणखी एक शिकार करायला ते उत्सुक आहेत. (T20 World Cup, Afg vs SA)

जोनाथन ट्रॉट यांनी जुलै २०२२ मध्ये अफगाणिस्तान संघाची धुरा हातात घेतल्यावर अफगाणिस्तानने लक्षणीय प्रगती केली आहे. खेळाडूंबरोबर त्यांचं एक नातंही तयार झालं आहे. ऑस्ट्रेलिया वरील विजयानंतर खेळाडूंनी ट्रॉटला खांद्यावर घेत मैदानात त्याची मिरवणूक काढली. (T20 World Cup, Afg vs SA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.