चोरीला गेलेले २५० मोबाईल CEIR Portal च्या माध्यमातून मिळाले परत

222
चोरीला गेलेले २५० मोबाईल CEIR Portal च्या माध्यमातून मिळाले परत

‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्री’ (CEIR) या पोर्टलच्या माध्यमातून मागील दोन वर्षांत चोरीला आणि गहाळ झालेले जवळपास २५० मोबाईल फोन्स घाटकोपर पोलिसांनी उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांतून हस्तगत केले आहेत. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन्स जवळपास ४० लाख रुपयांचे आहेत. चोरीला आणि गहाळ झाल्याची तक्रार दाखल करणाऱ्यांना ओळख पटवून हे मोबाईल फोन गुरुवारी त्यांना परत करण्यात आले. (CEIR Portal)

घाटकोपर पोलीस ठाण्यात मागील दोन वर्षांत मोबाईल फोन चोरी आणि गहाळ झाल्याच्या शेकडो तक्रारी दाखल झालेल्या होत्या. २०२२ ते २४ या दोन वर्षांच्या कालावधीत गहाळ आणि चोरीला गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख, पोलीस निरीक्षक मनीषा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग साळुंखे यांच्या विशेष पथकातील पोलीस हवालदार दीपक भारती, निलेश पवार, अमोल सूर्यवंशी, अजय अहिरे, बाळासाहेब गव्हाणे आणि रुपाली हाडवले या पथकाने ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्री’ (CEIR) या पोर्टलच्या मदतीने २५० महागड्या मोबाईल फोनचा शोध घेतला. (CEIR Portal)

हे मोबाईल फोन उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहार राज्यात विकण्यात आले होते. विशेष पोलीस पथकाने विविध राज्यात जाऊन जवळपास ४० लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन हस्तगत करून मुंबईत आणले. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन हे चालू स्थितीत असून तक्रारदारांना हे मोबाईल फोन गुरुवारी परत करण्यात आले. मोबाईल फोन परत करण्याचा कार्यक्रम घाटकोपर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आला होता. पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या हस्ते हे मोबाईल फोन तक्रारदारांना परत करण्यात आले. (CEIR Portal)

(हेही वाचा – T20 World Cup, Ind vs SA : आतापर्यंत फ्लॉप ठरलेल्या विराट कोहलीची रोहित आणि द्रविडकडून पाठराखण)

एकट्या मुंबईत वर्षाला ५० हजार मोबाईल होतात गहाळ

एका आरटीआयनुसार, २०१९ मध्ये, मुंबई शहरात चोरीला गेलेल्या किंवा हरवल्या गेलेल्या ४३,३९७ मोबाईल हँडसेटपैकी फक्त २,०८८ फोन्स परत मिळाले. २०२० मध्ये ३९,८१९ फोन गहाळ किंवा चोरीला गेल्याची नोंद झाली, त्यापैकी १,९१६ फोन परत मिळाले. २०२१ मध्ये ५१,३०२ हरवलेल्या फोनपैकी फक्त ३,२३० फोन परत मिळाले आहेत. मात्र ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्री’ या पोर्टलच्या माध्यमातून चोरीला अथवा गहाळ झालेल्या मोबाईल हँडसेट परत मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. (CEIR Portal)

काय आहे ‘सीईआयआर’ पोर्टल

‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्ट्री’ (CEIR) हे वेब पोर्टल’ केंद्रीय दूरसंचार विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर तुमचा चोरीला अथवा गहाळ झालेल्या मोबाईल फोनची माहिती टाकल्यावर तुमचा मोबाईल फोन कुठल्या मोबाईल क्रमांकावर वापरला जात आहे याची माहिती तुम्हाला उपलब्ध होते. या माहितीच्या आधारे स्थानिक पोलिसांची मदत घेऊन तुम्ही तुमचा चोरीला अथवा गहाळ झालेला मोबाईल फोन मिळवू शकता. (CEIR Portal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.